दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.७,
” ओरबाडून खाणे,” हा एकमेव एककलमी कार्यक्रम राबवण्यात आला,
काल निवडणूक शाखेने प्रभाग रचनेवर आलेल्या १६० हरकतीवर सुनावणी नुकतीच पार पाडली.या सूनावणीमध्ये किती हरकतीचा निपटारा करण्यात आला. याविषयीची माहिती अद्याप प्रसिद्ध झाली नाही.मात्र तिचा रीतसर अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्राने सांगितले.प्रभाग रचना व आरक्षण,ही महत्वाची कामे हातावेगळी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.मात्र हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे असून या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.तसे झाल्यास या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतील.अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता जरी असली तरी राज्य निवडणूक आयोगाने आपली यंत्रणा सक्रिय केली आहे.तसेच राजकीय पक्ष देखील या निवडणुका साधारणपणे डिसें.महिन्यात होतील,असे गृहीत धरून कामाला लागले आहेत.राज्यातील महत्वाच्या महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी राज्यातील तमाम राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत.शिवसेनेचे ( शिंदे गट ) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,प्रताप सरनाईक,उदय सामंत व भरत गोगावले हे चार नेते आज पालघर व वसईच्या दौऱ्यावर येत आहेत.मनोर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यासोबत चर्चा व वसई विरार शहर महानगरपालिकेत लोकदरबार अशा दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या लोकदरबार कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार आहेत.
असो,सहा प्रभागाची रचना,प्रलंबित विकासकामे,अनधिकृत बांधकामांचा
सुळसुळाट,नगरसेवकांची अकार्यक्षमता व त्यांची खाबूगिरी यावर आपण प्रकाशझोत टाकला.आज आपण प्रभाग क्र.७ चा आढावा घेणार आहोत.
या प्रभागात ४६ हजार ७३५ मतदार असून अनु.जातीचे २ हजार ४४३ तर अनु.जमाती – १ हजार २४३ मतदार आहेत.अगोदरच्या प्रभागात सरासरी ४४ हजार मतदार आहेत,या प्रभागात मात्र ही सरासरी दोन हजारहुन अधिक आहे.या प्रभागात नाना – नानी पार्क,रानाळे तलाव, वावटेवाडी,जाळबाववाडी,फुलपाडा,सहकार नगर,प्रथमेश नगर,नारायण नगर,फुलपाडा,डॅम परिसर,स्वामी समर्थ नगर,आर.जे.नगर,यशोदा हॉस्पिटल व धवलगिरी अपार्टमेंट,या परिसराचा समावेश आहे.आश्चर्याची बाब म्हणजे या प्रभागाच्या प्रत्येक परिसरात असंख्य अनधिकृत इमारती आहेत.नाना – नानी पार्क येथे ज्या समाजकंटकानी सरकारी जमिनी लुटून अनधिकृत इमारती उभारल्या.त्या साऱ्यांना जेलची हवा खायला लागली होती.त्यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या( शिवसेना,उबाठा ) पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.विद्यमान आयुक्त सूर्यवंशी यांनी नाना – नानी पार्कच्या जमीन लुटीची फाईल ओपन केल्यास समाजकंटकांनी सरकारी जमिनी कशा लुटल्या हे लोकांसमोर येऊ शकेल.
आजवर या प्रभागावर बहुजन विकास आघाडीचे कायम वर्चस्व राहिले,पण यंदा ते वर्चस्व मोडीत निघण्याची शक्यता आहे.प्रभागात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे.गेल्या दहा वर्षात येथून निवडून आलेल्या नगरसेवकांनी अनधिकृत बांधकामे करणे,हा एकमेव विषय कायम हाताळला.अनेक आरक्षित जमिनीची लूट कशी झाली,यावर एक प्रबंध लिहिता येईल,इतकी अनधिकृत बांधकामे या प्रभागात झाली.आग लागण्याची एखादी घटना घडल्यास साधी रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाची गाडी देखील आत जाऊ शकणार नाही,अशा पद्धतीने एकमेकांना खेटून या इमारती उभारण्यात आल्या आहेत.या इमारतीच्या सीसी व ओसी प्रमाणपत्राची तपासणी केल्यास सर्वसामान्य नागरिकांना चुना लावण्यात समाजकंटक कसे यशस्वी झाले हे स्पष्ट होऊ शकेल.तसेच त्यांना मदत करणारे नगरसेवक व मनपा अधिकारी यांचे काळे धंदे देखील उजागर होऊ शकतील.ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा एक पदाधिकारी संबंधित फाईल ओपन करण्याच्या तयारीत आहे.या गोरखधंद्यात कोण कोण सहभागी आहेत,हे कळल्यानंतर आयुक्त देखील अचंबित होतील.सरकारने या प्रभागातील गेल्या तीन दशकातील अनधिकृत बांधकामांची सखोल चौकशी करायला हवी.” सिडकोची परवानगी,” या दोन गोंडस शब्दाखाली गरजू लोकांची कशी फसवणूक झाली,हे उघड होईल.सिडकोच्या बोगस परवानग्या कोण तयार करत होते ? त्याला ताब्यात घेतल्यास ही साखळी नक्कीच जेलची हवा खाऊ शकेल.रस्त्यावर बसवण्यात आलेल्या अनधिकृत फेरीवाल्याकडून होणारी वसुली,हा प्रकार देखील उघड व्हायला हवा.येथील नगरसेवकांच्या पंटर्सने हा प्रभाग जेवढा लुटला,तसा तो कोणी लुटला नसावा.” तळे राखी,तो पाणी चाखे,” ही म्हण प्रचलित असली तरी या पंटर्स लोकांनी तळ्यातील पाणी ओरबाडून आपली तहान भागवली.

