दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ; भाजप खेळतोय तिरक्या चाली,
महायुतीमधील भाजपसह शिवसेनेने ( एकनाथ शिंदे ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.मुंबई,ठाणे,कल्याण – डोंबिवली,नवी मुंबई व वसई – विरार शहर महानगरपालिका निवडणुका भाजपने स्वबळावर लढवण्याचे संकेत दिल्यानंतर शिंदे गटानेही आता कंबर कसली आहे.या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला आपली वेगळी चूल मांडायला भाग पाडले तर मात्र या निवडणुकीत शिंदे गटाचे काही खरे नाही.वरील पाचही महानगरपालिकेच्या सत्तेत इतर कोणालाही भागीदार करून घेण्यास भाजपचे राज्यनेते तयार नाहीत.तसेच ठाणे व कल्याण – डोंबिवली या दोन महानगरपालिकेत शिंदे गटाचे असलेले वर्चस्व नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपची यंत्रणा सध्या जोरात कामाला लागली आहे.भाजपचे नवी मुंबई – ठाण्याचे नेते गणेश नाईक, ठाण्यातील आ.संजय केळकर व आ.निरंजन डावखरे हे तिघेही अधून मधून शिंदे गटाला टार्गेट करत असतात.कल्याण – डोंबिवलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा.श्रीकांत शिंदे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,या दोघांमधून विस्तव जात नाही.त्यामुळे ही महानगरपालिका आपल्या ताब्यात यावी,यासाठी चव्हाण व भाजपचे स्थानिक पदाधिकारी सध्या चांगलेच सक्रिय झाले आहेत.ही महानगरपालिका शिंदे गटाच्या ताब्यात जाणे,चव्हाण यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही.त्यामुळे ठाणे व या महानगरपालिका निवडणुकीत या दोघांमध्ये तीव्र स्वरूपाचा संघर्ष होण्याची शक्यता आहे.गणेश नाईक यांना मंत्रिपद देऊन फडणवीस यांनी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या अंगावर सोडण्याची खेळी खेळली आहे.त्यामुळे गणेश नाईक हे थेट नाव न घेता शिंदे यांच्यावर अधून मधून तोंडसुख घेताना पाहायला मिळत आहेत.काल भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी आपल्या भाषणात ” आपल्या आड येणाऱ्यांना आडवे करा,” असे पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.
दुसरीकडे वसई – विरार भागात शिंदे गटाची ताकद अगदी नगण्य आहे.आजच्या घडीला त्यांच्याकडे प्रगल्भ व अभ्यासू नेतृत्वाचा अभाव आहे.त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या काळात पक्ष बाळसे धरू शकला नाही.
वसई तालुका वगळता इतर तालुक्यात शिंदे गटाची ताकद भाजपपेक्षा अधिक मजबूत असल्यामुळे भाजपने या गटाचे पदाधिकारी व त्यांचे कार्यकर्ते फोडण्यास सुरुवात केली आहे.पालघर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांनी आपल्या पंचवीस ते तीस समर्थकासह नुकताच प्रवेश केला.त्यामुळे शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या या फोडाफोडीच्या राजकारणाचा जोरदार निषेध व्यक्त केला.शिंदे गटाचे आणखी काही पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत.अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे,प्रताप सरनाईक,उदय सामंत व भरत गोगावले हे मनोर व विरार येथे येत आहेत.परंतु पालकमंत्री गणेश नाईक यांनीही शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.वसई – विरार महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी – भाजप तर उर्वरित पालघर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गट व भाजपमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

