दिपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.६,
प्रभाग क्र.६ हा अनधिकृत बांधकामे,अनधिकृत फेरीवाले व अवैध पार्किंग वसुलीमुळे बदनाम,
विरार शहराच्या पूर्वेस असलेला हा प्रभाग चाकरमान्यांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो.सकाळी कामावर जायचे व रात्री घरी परतायचे,असे या चाकरमान्यांचे दैनंदिन जीवन,अनेक समस्यांचे आगर,अशीही एक वेगळी ओळख आहे.येथे होणारे हे मतदान हे कायम नकारात्मक स्वरूपाचे होत असते.या प्रभागात गुंडगिरी ही कायम सुप्तावस्थेत पाहायला मिळते.एका महिला नगरसेविकेच्या पतीने आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याला चांगलेच बदडून काढले होते.यावरून आपल्या लक्षात आले पाहिजे की या भागातील गुंडगिरी कोणत्या थराला पोहोचली आहे.आपापसातील मतभेद हे येथील नगरसेवकांच्या पाचवीला पुजले आहे.यावर नियंत्रण आणण्याकामी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत.त्यामुळे गुंडगिरीला राजाश्रय मिळत गेला.
त्याचा विपरीत परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला.याच प्रभागात असलेल्या हॉटेल विवांतामध्ये घडलेल्या धुमश्चक्रीने तालुक्याचे राजकीय चित्रच पार बदलून टाकले.पण त्यानंतरही सत्ताधारी पक्षाने आत्मपरीक्षण केले नाही.तसेच दोन गटात असलेल्या मतभेदामुळे गेली तीन दशके अभेद्य असलेली तटबंदी पार कोसळली.हॉटेल विवांता प्रकरण हा भाजपसाठी टर्निंग पॉईंट ठरला.या हाणामारीमध्ये जे सक्रिय होते,ते आता भाजपच्या रडारवर आले आहेत.महानगरपालिका निवडणुकीनंतर ” सबका हिसाब होगा,” असे बोलले जात आहे.जी मंडळी या घटनेत आघाडीवर होते,त्यांची प्रभागात अनेक अनधिकृत बांधकामे असून त्यांच्या सारख्यानी भाजप नेते विनोद तावडे यांच्या अंगावर धावून जाणे,त्यांना घेराव घालणे व त्यांना भेटायला आलेल्या महिलांना कोंडून ठेवणे,असे उपद्व्याप केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व विशेषकरून महिला वर्गाने विधानसभा निवडणुकीत आपला चांगलाच इंगा दाखवला.नारीशक्तीची ताकद काय असते,हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले.या घटनेचे पडसाद अद्याप उमटत आहेत,आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.ही निवडणूक पार पडल्यानंतर या भागातील अनधिकृत बांधकामावर भलामोठा हातोडा चालणार आहे.त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांच्या जीवाची आतापासून घालमेल सुरू झाली आहे.
या प्रभागात सर्व जातीधर्माचे प्राबल्य आहे.बाहेरून आलेल्या चाकरमान्यांची लोकसंख्या प्रचंड प्रमाणावर आहे.लोडबेरिंग इमारती म्हणजेच अनधिकृत इमारतीमध्ये हे चाकरमानी वास्तव्याला आहेत.दररोज अनेक नागरी समस्यांना तोंड देत जगत आहेत.पण येथील लोकप्रतिनिधींना त्याची चाड नाही.दहीहंडी,हळदीकुंकू व अन्य इव्हेंटस करणे,म्हणजे आपली जबाबदारी संपली, अशा आविर्भवात वावरणाऱ्या नगरसेवकांचे विमान विधानसभा निवडणुकीनंतर बरेचसे खाली आले आहे.तरीही काही नगरसेवक मतदारांना गृहीत धरून आपला मनमानीपणा करतच आहेत.एकाच पक्षाचे नगरसेवक / नगरसेविका असूनही त्यांच्यातून विस्तव जात नाही.
असो,या प्रभागात असलेल्या ४५ हजार ३३६ मतदारांपैकी २ हजार १९३ अनु.जाती तर अनु.जमातीचे ९१३ मतदार आहेत.तारवाडी,मौर्यानगर,संतनगर,मोहक सिटी,मनवेलपाडा लेक परिसर,मनवेलपाडा व्हिलेज,कारगिल नगर,टेपाचा पाडा,भुजडपाडा,डी-मार्ट परिसर,आश्रय हॉटेल,स्वामी समर्थ मठ,यशविद्या निकेतन स्कुल,सह्याद्री नगर व खदानीपाडा इ.परिसराचा या प्रभागात समावेश आहे.कारगिलनगर,संतनगर,मनवेलपाडा,टेपाचा पाडा व भुजडपाडा हे सारे परिसर अनधिकृत बांधकामाचे माहेर म्हणून ओळखले जातात.या परिसरातील अनधिकृत बांधकामे बेनामी नावावर उभारण्यात आली आहेत.ज्यांच्या नावावर ही अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत,ते परप्रांतीय कोण आहेत,व त्यांच्या पाठीशी असलेला ” आका,” महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांना पाहायला मिळणार आहे.या गोरखधंद्यात शिवसेनेच्या स्थानिक काही पदाधिकाऱ्यांचाही सहभाग आहे.त्यांनाही या निवडणुकीत चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.हा प्रभागच मुळात बदनाम असून या प्रभागात अनधिकृत फेरीवाल्यांना कोण बसवतो,खाजगी बसवाल्यांना बसेस पार्किंगच्या करण्याच्या बदल्यात कोण वसुली करतो,हे देखील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात स्पष्ट होणार आहे.

