दीपक मोहिते,
चिंचोटी – भिंवडी राज्यमार्गाच्या दुरूस्तीचा प्रश्न लागला मार्गी…
वसई आणि भिवंडी तालुक्याला जोडणाऱ्या चिंचोटी ते भिवंडी हा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधा-वापरा-हस्तांतरीत या तत्वावर मे.सुप्रीम वसई भिवंडी टोलवेज प्रा.लि.या कंपनीला देण्यात आला होता.सदर कंपनीकडून या रस्त्याची नियमित देखभाल व दुरूस्ती न झाल्यामुळे या राज्यमार्गाची पार दुरावस्था झाली असून तो वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असा बनला आहे.वसई तसेच भिवंडी परिसरातील मोठ्याप्रमाणात असलेल्या कारखान्याच्या मालाच्या दैनंदिन वाहतूकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा असा आहे.
तसेच चिंचोटी-पोमण-कामण या परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासीपाडे असून दैनंदिन वाहतूकीसाठी त्यांना हा एकमेव रस्ता आहे.गेल्या काही वर्षात या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे तेथील नागरिकांना चालणे देखील कठीण झाले आहे. वाहतूकीमध्ये सतत येणाऱ्या अडथळ्यांमुळे उद्योगधंद्यावर मोठा परिणाम होत आहे.
सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत.वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी निवडून आल्यानंतर विधानसभेच्या डिसें.२०२४ च्या हिवाळी अधिवेशनात या रस्त्याच्या दुरूस्तीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते व शासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती.चिंचोटी- भिवंडी रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रकिया सुरू केली होती. तथापि मे.सुप्रीम वसई भिवंडी टोलवेज प्रा.लि.या कंपनीने शासनाच्या या निविदा प्रक्रियेबाबत न्यायालयात धाव घेतल्यानमुळे गेल्या वर्षांपासून या रस्त्याच्या दुरूस्ती अथवा काँक्रीटीकरणाचे काम करता येत नव्हते.
यासंदर्भात आ.स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दिलेल्या आदेशानुसार शिवेंद्रराजे भोसले मंत्री,सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मंत्रालयामध्ये बैठका घेण्यात आल्या.
या सर्व बैठकामध्ये, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सुप्रिम कंपनी यांच्यामध्ये समन्वय न झाल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली असून नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत.सदर बाब न्यायालयासमोर मांडून कोणत्याही परिस्थितीत या रस्त्याच्या कामाला सुरूवात करावी, अशी मागणी आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केली.
उपरोक्त बैठकीत सार्व. बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले,यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले निर्देश व त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई उच्च न्यायालय मुंबई,यांच्यासमोर मांडलेली बाजू याचा परिणाम होऊन न्यायालयाने २६ ऑगस्ट रोजी या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यास परवानगी दिली.त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.येत्या काही दिवसात रस्त्याच्या कामाला सुरूवात होणार आहे.
वसईकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अशा महत्वाच्या आणि बऱ्याच काळापासून रखडलेल्या प्रश्नावर वैयक्तिक लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ.स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्व.बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत.

