दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,प्रभाग क्र.५
या प्रभागात भाजप वरचढ ठरण्याची शक्यता अधिक,
प्रभाग क्र.५ हा समाज रचनेच्या दृष्टीने सर्वसमावेशक असा प्रभाग आहे.या प्रभागात बाहेरून येणाऱ्यांचे मोठे प्राबल्य आहे.सध्या या प्रभागात स्थानिक भूमीपुत्रांचा मागमूस देखील पाहायला मिळत नाही.स्थानिक भूमीपुत्रांनी आपल्या वाडवडलांनी जतन करून ठेवलेल्या आपल्या जमिनी बिल्डरांना विकल्या व स्वतःच्या अस्तित्वाला धोका निर्माण करून घेतला.आता या प्रभागात स्थानिक भूमिपुत्र औषधालाही सापडत नाही.अशाप्रकारचे अस्मानी संकट त्यांनी स्वतःहून ओढवून घेतले आहे.आज या भूमीपुत्रांच्या कुटुंबातील तरुण मुले रिक्षा व्यवसायात स्थिरावलेली पाहायला मिळतात.१९७० ते १९८० च्या दशकात वसई – विरार शहरात नागरीकरणाला वेग आला.तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नागरी सुविधांची उपलब्धता लक्षात न घेता,येथील जमिनी बांधकामासाठी मोकळ्या केल्या व अनेक हवशे – नवशे बांधकाम व्यवसायात उतरले व तालुक्याचा निसर्गरम्य चेहरा छिन्नविच्छिन्न होत गेला.परप्रांतीय शेठजीचा वावर वाढला व लाख मोलाच्या जमिनी त्यांच्या घश्यात गेल्या व मराठी माणूस या प्रक्रियेत नाहीसा झाला.अगरवाल,मेहता,
चोप्रा,पारेख व अशा बिल्डर्सचे होर्डिंग झळकू लागले.या लोकांनी उभारलेल्या नागरी संकुलात राहायला आलेल्या रहिवाश्यांचे हाल मात्र कुत्रे खाईनासे झाले.आजही अनेक नागरी संकुलातील नागरिकांना टँकरचे घाणेरडे पाणी प्यावे लागत आहे आणि त्यासाठी महिनाकाठी हजारो रु.ची पदरमोड करावी लागत आहे.
असो,या प्रभागाचे क्षेत्रही फार मोठे आहे.त्यामध्ये एम.बी.इस्टेट,विरार पश्चिम स्थानक परिसर,विराट नगर,खाऊ गल्ली,गावठण,एस.टी आगार परिसर,पुष्पा नगर,डोंगरी,श्रीपाल कॉम्प्लेक्स,विठ्ठल मंदिर,नॅशनल इंग्लिश स्कुल,वसई विरार महानगरपालिका मुख्यालय,बुद्धविहार व बंजारा हॉटेल,इ.भागाचा समावेश आहे.वास्तविक या प्रभागाचा पसारा लक्षात घेता येथेही मतदारसंख्या ४४ हजार ७१० इतकी आहे,त्यामध्ये अनु.जमाती – १ हजार ९१४ तर अनु.जाती – ६२१ मतदारांचा समावेश आहे.येथे मराठी थोड्याफार प्रमाणात तर गुजराती समाजाचे चांगले प्राबल्य आहे.या प्रभागातून गेली अनेक वर्षे बहूजन विकास आघाडीचे नगरसेवक निवडून येत होते.मात्र गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने हे वर्चस्व मोडून काढले.गेली तीन ते चार दशके जो मतदार बहुजन विकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभा राहत होता,तो अचानक भाजपकडे का वळला ? याविषयी आघाडीच्या नेत्यानी आत्मपरीक्षण करायला हवे होते.पण बहुजन विकास आघाडीच्या शब्दकोशात आत्मचिंतन,आत्मपरिक्षण व विचारमंथन,हे तीन शब्द शोधूनही सापडत नाहीत.त्यामुळे या निवडणुकीतही या प्रभागातील सुशिक्षित मतदार,भाजपला साथ देतील,कारण मराठी माणसाची मते शिवसेना व बहुजन विकास आघाडीमध्ये विभागली जातील व गुजराती समाजाची एकगठ्ठा मते मात्र भाजपकडे वळतील.बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांशी युतीसंदर्भात बोलणी सुरू आहेत.पण,एकमेकांवर विश्वास नसलेले हे तीन पक्ष भाजपला पर्याय उभा करू शकणार नाहीत.काँग्रेस पक्षातील एक मोठा गट बहुजन विकास आघाडीची ” संगत नको रे बाबा,” अशी मानसिकता बाळगून आहे.तशीच परिस्थिती शिवसेनेची ( उबाठा ) आहे.” या प्रभागात शिवसेना व काँग्रेसची ताकद अगदी नगण्य आहे.त्यामुळे बहुजन विकास आघाडीला नव्याने होणाऱ्या युतीचा फायदा होईल असे वाटत नाही.
या प्रभागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून किमान तीन दिवस जनजीवन विस्कळीत होत असते.गेली अनेक वर्षे ही अशी स्थिती निर्माण होत असते.मुख्य रस्त्यावर कंबरेइतके पाणी असते,लहान वाहनांची येजा बंद होत असल्यामुळे नागरिक ट्रॅक्टरने प्रवास करतात,अशा बिकट प्रसंगी माजी नगरसेवक फोटोसेशन करणे व सेल्फी काढण्यात आघाडीवर असतात,करदात्यांवर ट्रॅक्टरने प्रवास करण्याची पाळी येते, ही खर तर नामुष्कीची गोष्ट आहे,पण या लोकांना सांगणार कोण ?

