दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.- ४ ,
या निवडणुकीतही गेल्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती होणार..
प्रभाग क्र.४ हा अनधिकृत इमारती व चाळींनी व्यापलेला असा हा प्रभाग असून गेली अनेक वर्षे या प्रभागावर बहुजन विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे.ते मोडून काढण्यासाठी भाजप सध्या जोरदार तयारी करत आहे.या प्रभागातील आघाडीच्या माजी नगरसेविका या स्थानिक नेतृत्वावर प्रचंड नाराज आहेत.आमची कामे होत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून सतत होत असतो.स्थानिक नेतृत्व हे केवळ दहीहंडी व अन्य उत्सव साजरे करण्यात धन्यता मानत आली आहे.लोकांच्या दैनंदिन अडचणी व समस्यांची उकल करणे,इ.कामाना प्राधान्य दिले जात नाही,त्यामुळे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाची जबर पीछेहाट झाली.हीच पीछेहाट भाजपचा विश्वास दुण्यावण्यास कारणीभूत ठरला आहे.पक्षाचे स्थानिक नेतृत्व,नगरसेवक व नगरसेविकांच्या अकार्यक्षमतेमुळे येथील मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.ही नाराजी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष पाहायला मिळाली.त्याचीच पुनरावृत्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत होणार आहे.तसेच पक्षाचे कार्यकर्ते व नगरसेवक/ नगरसेविका यांच्यामध्ये समन्वय व एकजीनसी पणाचा असलेला अभाव हा भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.या प्रभागावर असलेले बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपचा एक गट चांगलाच सक्रिय झाला आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत हॉटेल विवांता हॉटेलमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना झालेली मारहाण व महिलांना कोंडून ठेवण्याचा जो प्रकार झाला,या अशा दोन कारणांमुळे त्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला जबर फटका बसला.त्यातून त्यांच्या वागण्यात सुधारणा होईल,अशी मतदारांची सर्वसाधारण अपेक्षा होती,पण प्रभाग आमचीच जागीर,अशी जी मानसिकता त्यांच्यामध्ये तयार झाली आहे,त्यामधून ही मंडळी बाहेर येण्यास तयार नाहीत.त्यामुळे या निवडणुकीत देखील लोकसभा व विधानसभेची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.पूर्वी लोकांसमोर पर्याय नव्हता,म्हणून लोक दबून असायचे,आता तशी स्थिती उरली नाही.गेल्या दोन निवडणुकीत भाजपने जशास तशी लढत दिली व प्रत्येक प्रभागात सरस कामगिरी केली.त्यामुळे नगरसेवक व नगरसेविका यांच्यामध्ये सध्या प्रचंड तणावाचे वातावरण आहे.या निवडणुकीत आपला टिकाव लागेल का ? या एकाच प्रश्नाने त्यांना घेरले आहे.
असो,या प्रभागात देखील १,२,३ प्रमाणे सुमारे ४५ हजार ७७८ मतदार आहेत.त्यापैकी अनु.जाती – १ हजार ७१८ तर अनु. जमाती – १ हजार २७० मतदार आहेत.मतदारसंख्या सोबत प्रभागाचे क्षेत्र देखील मोठे आहे.विरार रेल्वे स्थानक परिसर,टोटाळे तलाव,बलोच नगर,भोईरपाडा,जीवदानीपाडा,राक्षसीपाडा,
जीवदानी मंदिर,तारवाडी, सहकारनगर,सेंट पीटर स्कुल परिसर,मोरया नगर,हिलपार्क,मोतीबा राईस मिल परिसर,गावडेवाडी व पिंपळवाडी या नागरी वसाहतीचा त्यामध्ये समावेश आहे.या प्रभागात बाहेरून आलेल्यांचा सर्वाधिक भरणा आहे.हा मतदार गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन विकास आघाडीला मतदान करत आला.मतदारांसमोर गेल्या तीस वर्षात अन्य कोणत्याही पक्षाचा पर्याय उपलब्ध नव्हता,त्यामुळे बहुजन विकास आघाडीला प्रत्येक निवडणुकीत भरघोस मतदान होत असे.पण गेल्या दोन वर्षात भाजपच्या राज्य नेतृत्वाने बहुजन विकास आघाडीचे हे वर्चस्व मोडून काढण्याची रणनीती आखली.त्यानंतर भाजप व त्यांच्या सहयोगी हिंदू संघटना ( विश्व हिंदू परिषद,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,बजरंग दल ) मैदानात उतरल्या व त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचे ” होत्याचे नव्हते,” करून टाकले.वर्षानुवर्षे सत्तेत असलेले बहुजन विकास आघाडीचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते सत्तेच्या नशेत इतके धुंद राहिले कीआपल्या पायाखालील सतरंजीला आगीची झळ लागल्याचे त्यांच्या लक्षातही आले नाही. अखेर जे व्हायचे होते ते
होऊन गेले.मतदार हा कायम पर्याय शोधत असतो.त्याला पर्याय उपलब्ध झाला की तो आपल्या मनातील खदखद ओकून टाकतो.या अनुभवातून पराभुतानी बोध घ्यायचा असतो,पण ज्यांना सतत हवेत राहण्याची सवय लागलेली असते,ते आपले विमान जमिनीवर लँड करण्यास तयार नसतात,शेवटी मतदार त्यांचे विमान दणक्यात जमिनीवर आदळवतात,असा इतिहास आहे,तो आजवर कोणालाही टाळता आला नाही व येणार नाही.
हळदीकुंकू,दहीहंडी अशा कार्यक्रमाला हजेरी लावणारे लोक हे मतदान करणारे नसतात,त्यांचा एकमेव उद्देश असतो,केवळ मनोरंजन असा असतो.राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेला तुफान गर्दी होत असते,पण ही गर्दी त्यांच्या पक्षाला मतदान करत नाही.तसेच येथील मतदारांचे आहे.पूर्वी पर्याय नव्हता,त्यामुळे ते चालून जायचे.आता तशी स्थिती उरली नाही.पर्याय उपलब्ध झाला कि लोक उट्टे काढतातच.

