दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.३,
करदाते जीव मुठीत धरून जगत आहेत,
हा प्रभाग देखील दाटीवाटीच्या चाळी,अनधिकृत इमारती व पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे भररस्त्यावर मोठ्याप्रमाणात होणारी वाहतूककोंडी,इ.कारणामुळे या प्रभागातील नागरिक गेली अनेक वर्षे त्रस्त आहेत.अनधिकृत फेरीवाले व रिक्षावाल्यांच्या दादागिरीमुळे येथील व्यापाऱ्यांना खूप आर्थिक झळ सोसावी लागते.स्थानिक नगरसेवक,वाहतूक पोलीस व मनपा अधिकारी यांचे अशा अपप्रवृत्तीना पाठबळ मिळत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना दररोज विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या प्रभागाची ओळखच ” समस्याग्रस्त प्रभाग,” अशी असून महानगरपालिकेची प्रभाग समिती असून नसल्यासारखी आहे.या प्रभागात करदात्यांचे प्रश्न,अडचणी व समस्यांना येथील मनपा अधिकारी काडीची किंमत देत नाहीत.त्यामुळे या प्रभागात गेल्या पंधरा वर्षात प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली.हजारो नागरिक,या अशा अनधिकृत इमारती व चाळीत जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
या प्रभागात मतदारांची संख्या ४५ हजार २३२ त्यापैकी २ हजार २६८ अनु.जाती तर ९३५ अनु.जमाती.चे मतदार आहेत.याही प्रभागाचे क्षेत्र दूरवर पसरले आहे.यामध्ये पाचपायरी,जुने पोस्ट ऑफिस,गोपचरपाडा, कोकणनगर,ओम शांती नगर,येसूबाई कंपाऊंड,साईदत्त झोपडपट्टी,काळा हनुमान लेन,मकवाना कॉम्लेक्स,जी.एम.ब्रेवरीज,सिराज वाडी,जी.एम.हॉटेल,
परांजपे कॉलोनी,डी.जी.-१,
वैष्णवी नगर,नवजीवन नगर व चामुंडा नगर इ. परिसराचा समावेश आहे.या प्रभागात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे उभारण्यात कोणाचा सहभाग आहे,हे या प्रभागातील नागरिकांनाही ठाऊक आहे.आज अनेक अनधिकृत इमारती धोकादायक स्थितीत उभ्या आहेत.गेल्याच आठवड्यात एक अनधिकृत इमारत कोसळून सतरा रहिवाश्यांचा बळी गेला.हा इमारत बांधणारा समाजकंटक हा कोणाचा नातेवाईक आहे,हे मनपा अधिकाऱ्यांना देखील माहित आहे.पण त्याच्यावर कारवाई होत नाही.त्यामुळे आगरी सेनेने संबंधित नेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.अशा दुर्घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे.कारण या प्रभागाची अवस्था ” अधिकृत बांधकामे कमी व अनधिकृत बांधकामाचे पीक, ” अशी झाली आहे.या प्रभागात सर्वात मोठी समस्या अनधिकृत बांधकामे ही आहेच,पण स्वच्छतेची समस्या देखील लोकांच्या आरोग्याची ऐसी तैसी करणारी आहे.परिसरात दररोज दुपारपर्यंत सर्वत्र कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात.महानगरपालिका कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांना वर्षाकाठी शेकडो कोटी रु.अदा करत असते.पण अस्वच्छता नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे.कर देऊनही येथील करदात्यांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत.या भागातील नालेसफाई कधी व कशी होते ? याचा शोध घेतल्यास भयानक वास्तव नजरेस पडते.कचऱ्यातून पैसा मिळतो,हे जरी खरे असले तरी तो किती मिळवायचा ? यालाही काही मर्यादा आहेत,पण येथे नगरसेवक,मनपा अधिकारी व ठेकेदार यांनी मनपाची तिजोरी लुटली नाही,तर तिजोरीच नाहीशी केली.या प्रभागात जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट ही समस्या अक्राळ विक्राळ स्वरूप धारण करत आहे,पण कोणालाही त्याची चाड नाही.
असो,या अशा परिस्थितीत या प्रभागातील मतदार आता परिवर्तन करण्याच्या मानसिकतेत आले आहेत.मतदार काहीही चुकीचे करत नाहीत,किती दिवस मरणयातना सोसायच्या ? असा प्रश्न ते स्वतःलाच विचारत आहेत.आज या प्रभागातील मुख्य व अंतर्गत रस्त्याची अवस्था पाहिल्यास आपण अश्मयुगात वावरत आहोत की काय असा प्रश्न आपल्याला पडतो.अस्वच्छतेचे बक्षीस द्यायचे झाल्यास हा प्रभाग अव्वल क्रमांक नक्कीच पटकावेल.या प्रभागात मरण स्वस्त झाले आहे.आरोग्याचा पत्ता नाही,नागरी सुविधांचा दुष्काळ,अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट,मच्छरांचे थैमान,गुंडाचा मुक्त वावर,अनधिकृत रिक्षाचालकांचा धुमाकुळ व अनधिकृत फेरीवाल्याचे पदपथ काबीज करणे,अशा गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे मतदार आता या निवडणुकीत आपला इंगा दाखवण्याच्या तयारीत आहेत.

