दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अजित पवार,त्या महिलेची सरळ जाहीर माफी मागा…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालिशपणा काल उभ्या महाराष्ट्राने अनुभवला.सोलापूरच्या पोलीस अधिक्षका अंजली कृष्णा यांना ” आपण जो फोन केला तो गावात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये,यासाठी होता,असा हास्यास्पद खुलासा करताना अजित पवार पाहायला मिळाले.त्यांचा हा खुलासा कोणालाच पटला नाही.अजित पवार हे आपल्या राजकीय जीवनात कधीही सामंजस्य व समजूतदारपणा दाखवत वावरले नाही.काकांच्या उपकारामुळे मिळालेली सत्ता,ही आपलीच जागीर आहे,अशा गुर्मीत ते सतत वावरत असतात.त्यांच्या या अशा वागण्यामुळे ते अनेकदा अडचणीत देखील आले.धरणात मुतु का ? असा सवाल शेतकऱ्यांना विचारणाऱ्या अजित पवार यांना कृष्णेकाठी दिवसभर फतकल मारून बसायला लागले होते.त्यांच्या या कथित आमक्लेश आंदोलनानंतरही त्यांच्या वागण्यात सुधारणा झाली नाही.त्यानंतरही त्यांनी अनेकदा महिलांच्या बाबतीत बेताल वक्तव्ये केली.त्यामुळे त्यांच्यावर प्रत्येकवेळी दिलगिरी व्यक्त करण्याची पाळी आली.एवढे सारे रामायण घडल्यानंतर त्यांच्या पक्षाचे वाचाळवीर प्रवक्ते अमोल मिटकरी हे दिवटे प्रवक्ते आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांची डिग्रीची तपासणी करा,अशी मागणी करताना दिसले.आपली पात्रता काय ? आपण मागणी काय करतोय ? याचा जराही विचार न करता ” उचलली जीभ लावली टाळ्याला,” अशा पद्धतीने वागणे,हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही.अजित पवार यांच्या पक्षाची ओळखच मुळी गुंडाचा पक्ष अशी आहे,७० हजार कोटी रु.चा सिंचन घोटाळा कोणी केला ? अशी विचारणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे केली होती.वास्तविक लायकी नसताना त्यांच्या काकांनी त्यांना भरभरून दिले.त्यामुळे हे दिवटे पोर वाहत गेले.या पोराने सत्तेच्या हव्यासापोटी आपल्या काकाचीच चड्डी काढून घेतली.लाडक्या बहिणीच्या टाळूवरील लोणी खाल्यानंतर तरी त्यांच्या या बिघडलेल्या भावाच्या स्वभावात बदल घडून येईल,अशी लाडक्या बहिणींना अपेक्षा होत्या.पण कसले काय ? ” जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही,” या म्हणीनुसार हा वाया गेलेला त्यांचा भाऊ काही सुधारला नाही.एका महिलेला धमकी देतो की ” मी तुझ्यावर कारवाई करेन,” वा रे अजित पवार,तुमच्या या मर्दुमकीला सलाम…
ज्या शिवाजी महाराजांच्या सैन्याने कल्याणची लूट केली व सुभेदाराच्या सुनेला पळवून आणले.महाराजांनी तीला तिच्या नवऱ्यासोबत सन्मानाने,वस्त्रे व बक्षीस देऊन परत पाठवले.शिवाजी महाराज हे परस्त्रीला मातेसमान मानत असत.त्यामुळे महाराजांनी शत्रूच्या स्त्रियांचे संरक्षण हा स्वराज्याचा नियम आहे,हे आपल्या वागण्यातून दाखवून दिले.ज्या अजित पवार यांना धड मराठी बोलता येत नाही,त्यांना मराठा साम्राज्य व आपल्या राजाचे महत्व कसे कळणार ? मराठा समाजात तुमचा जन्म झाला,यावर आम्हा मराठ्यांचा विश्वास देखील बसत नाही.होय,आम्हाला,आम्ही मराठा असल्याची आता लाज वाटू लागली आहे.मराठा हा असा कधीच नव्हता.आता तुम्ही कितीही कोलांट्या उड्या मारल्या तरी तुमच्यामुळे आमच्या समाजाची लाज रसातळाला गेली आहे.” जनाची नाहीतर,मनाची लाज,” बाळगून त्या महिलेची जाहीर माफी मागा,अन्यथा स्वतःला मराठा म्हणवून घेऊ नका.

