दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – भाग क्र,२,
प्रभाग क्र २ ; अनेक समस्या ” जैसे थे,” स्थितीत,मतदारांमध्ये प्रचंड नाराजी…
कालच्या लेखात आपण प्रभाग क्र.१ ची रचना कशी असेल,तसेच या प्रभागामधील समाजरचना व प्रलंबित विकासकामे यावर प्रकाशझोत टाकला.या आपल्या पहिल्या वहिल्या लेखाला वसई- विरारकर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या लेखमालेला सुरुवात करत असताना निवडणूक आयोगाने काल प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांची संख्या एका पत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली.लवकरच त्याचा निपटारा करण्याचा आयोगाकडून प्रयत्न सुरू होणार आहे.या सर्व घडामोडी लक्षात घेता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर होतील,असे संकेत मिळू लागले आहेत.
वसई – विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात एकूण १६० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.त्यावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यात येणार आहे.या निवडणुका अधिक काळ लांबणीवर पडू नये,असे मतदारांचे म्हणणे आहे.त्यामुळे हरकती व सूचना दाखल करणाऱ्यांना तसेच न्यायालयात दाद मागणाऱ्या याचिकाकर्त्यांचे लोकशाही मार्गाने समाधान व त्यांच्या शंकाकुशंकाचे निरसन करणे,हे संबधित महानगरपालिका प्रशासन व आयोगाची जबाबदारी आहे.
असो,आज आपण प्रभाग क्र.२ वर प्रकाशझोत टाकणार आहोत.या प्रभागात मतदारांची संख्या आहे,४१ हजार ४८६,त्यापैकी अनु.जाती – १२०० तर अनु.जमाती – ३९३ इतकी आहे.हा प्रभाग मध्यमवर्गीय व सुशिक्षित म्हणून ओळखला जातो.ग्लोबल सिटी,वाय.के.नगर,तिरुपती नगर फेज १ व २,चिखलडोंगरी,नारिंगी,
मारंबळपाडा,डोंगरपाडा,
सेन्ट्रल पार्क,न्यू विवा कॉलेज,गोकुळ टाऊनशिप,सुंदरनगर,जुने विवा कॉलेज,विवा गोकुळ कॉम्प्लेक्स,गोकुळ गार्डन,आदी परिसराचा त्यामध्ये समावेश आहे.या प्रभागाची रचना विचित्र अशी असून या प्रभाग रचनेसंदर्भात हरकती आल्या असाव्यात,कारण प्रभागाचे क्षेत्र फार मोठे आहे.प्रभागात आगरी,कोळी,व बाहेरून स्थायिक झालेले गुजराती,मारवाडी व इतर समाजाचे चांगले प्राबल्य आहे.या तालुक्यात भाजपने गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत,प्रचंड मताधिक्य मिळवले होते.याही प्रभागात त्यांना भरीव मतदान झाले होते. विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेल्या वर्षात या प्रभागात चांगले बस्तान बसवले आहे.या दोन्ही हिंदू संघटना सध्या चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत.लोकसभा व विधानसभा निवडणुका मागोमाग भाजप महानगरपालिका निवडणुकीतही भाजप चमकदार कामगिरी करण्याची शक्यता आहे.दुसरीकडे गेल्या काही वर्षात बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ,आपापसात असलेले मतभेद व पक्ष बांधणीकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष आदी कारणामुळे या पक्षासमोर ही जागा टिकवण्याचे आव्हान आहे.महानगरपालिकेचा भ्रष्ट व अंदाधुंद कारभाराला विरारकर जनता पार विटली आहे.त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
दर पावसाळ्यात गोकुळ टाऊनशिप,विरार – आगाशी मुख्य रस्ता पाण्याखाली जातो,त्यामुळे हा परिसर किमान तीन दिवस जलमय होतो.या काळात लोकांचे अतोनात हाल होतात.हे गेली अनेक वर्षे सुरू आहे.यंदा हा रोष ईव्हीएम मशीनमधून उफाळून वर येण्याची शक्यता आहे.या परिसरात गेल्या काही वर्षात हजारो नागरी संकुले उभी राहिली,पण पाणी,सांडपाणी व पावसाळी पाणी निचरा, खारलँड आउटलेटच्या माध्यमातून खाडीला जाणारे पाणी अनेक ठिकाणी अडले जाऊन परिसरात हाहाकार उडत असतो,पण यावर उपाययोजना करण्यासंदर्भात स्थानिक नगरसेवक,मनपा व खारलँड विभागाच्या अधिकाऱ्यांची निष्क्रियता इ.कारणामुळे येथील मतदार प्रचंड नाराज आहे.त्यामुळे मतदार यंदा परिवर्तनाच्या तयारीत आहेत.

