दीपक मोहिते,
निवडणूक पर्व,- प्रभाग क्र.१,
प्रभाग क्र.१ हा विकासाच्या बाबतीत अजूनही अंधारातच….
वसई-विरार शहर महानगरपालिकेची प्रभाग रचना गेल्या महिन्याच्या अखेरीस जाहीर झाली.त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या,काल तिची मुदत संपली.या सर्व प्रक्रियेनंतर राज्य निवडणूक आयोग,निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करतो,याकडे आपले सर्वांचे लक्ष लागले आहे.सुमारे २९ प्रभागातील ११५ जागांसाठी या निवडणुका होत आहेत.त्यासाठी ११ लाख ५६ हजार २०९ मतदार आपल्या हक्काचे ५८ नगरसेवक व ५७ नगरसेविका,असे आपले एकूण ११५ लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.प्रत्येक प्रभागात सरासरी ४० हजार मतदार आहेत.या निवडणुकीची प्रभाग रचना,प्रभागनिहाय मतदारसंख्या,अनु.जाती व जमाती किती मतदार आहेत.तसेच प्रभागात झालेली विकासकामे,राजकीय स्थिती,प्रलंबित नागरी समस्या व मतदारराजाचे म्हणणे,अर्थात त्यांच्या प्रतिक्रिया,याचा समावेश असेल.ही जी सलग ३० भागाची लेखमाला ” news27.in media,” च्या माध्यमातून प्रसिद्ध करत आहोत,ती तुमच्या पसंतीला उतरेल,अशी अपेक्षा आहे.आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
प्रभाग क्र.१,हा विरार शहराच्या पूर्व भागात सर्वदूर असा वसलेला आहे.त्यामध्ये कोपरी,गास कोपरी,काशिद कोपर,चांदीप,चंदनसार,
भाटपाडा,कसराळी,मांडवी,शिरासाड,खैरपाडा, केशवनगर,जयश्री नगर व वैतरणा या ग्रामीण परिसराचा समावेश आहे.या प्रभागात एकूण ४५ हजार ९५२ मतदार असून त्यापैकी अनु.जाती – १ हजार ९४२ तर अनु.जमाती – ७ हजार ६१३ मतदार आहेत.गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या प्रभागात मतदारांच्या संख्येत बऱ्यापैकी वाढ झाली आहे.२०१० साली या परिसराचा महानगरपालिकेमध्ये समावेश झाल्यानंतर या भागात शेकडो अनधिकृत चाळींचे भरघोस पीक आले.या चाळींतील खोल्या स्वस्त दरात मिळत असल्यामुळे परप्रांतियांचे लोंढेच्या लोंढे या भागात स्थिरावले.या अनधिकृत चाळींना पाणी व वीज इ.नागरी सुविधा मिळाल्यामुळे अल्पावधीत आदिवासी व वनविभागाच्या जमिनीवर सरसकट अनधिकृत बांधकामे उभी राहत गेली.या गोरखधंद्यात चाळमाफियाना वन कर्मचाऱ्यांची चांगली साथ मिळाली.तर दुसरीकडे महावितरण व महानगरपालिकेचे अधिकारी यांनी वीज व पाणी देऊन आपले खिसे भरण्यात धन्यता मानली.भाटपाडा,खैरपाडा, केशवनगर भागात अनधिकृत चाळी तर चंदनसार,कोपरी,गास कोपरी भागात अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांनी थेट अनधिकृत इमारतीच उभारल्या.या कामात मनपाच्या अधिकाऱ्यांनी आपले हात चांगलेच धुवून घेतले.” कुंपणच शेत कसे खाते,” याचे उदाहरण द्यायचे झाल्यास या प्रभागाकडे बोट दाखवता येईल.मनपा अधिकारी,स्थानिक नगरसेवक,पोलीस व महसूल अधिकारी या प्रक्रियेत चांगलेच मालामाल झाले.मात्र या भागात आजही अनेक नागरी सुविधाचा अभाव आहे.चालायला धड रस्ते नाहीत,या चाळीत राहायला आलेल्या लोकांना दर पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.या चाळींना वीज व पाणी मिळते,मग अंतर्गत रस्ते का मिळू शकत नाहीत.हा संपूर्ण परिसर हा अविकसित परिसर म्हणून ओळखला जातो.पण ” स्वस्त व मस्त,” अशा स्वरूपात खोल्या मिळत असल्यामुळे येथील रहिवाशी हालअपेष्टा सहन करत जीवन जगताहेत.या अशा अविकसित प्रभागात सुमारे अर्धा लाख मतदार आहेत,तर प्रभागाची लोकसंख्या नक्कीच एक लाखाच्या घरात असली पाहिजे.प्रभागाच्या नियोजनबद्ध विकासासाठी स्थानिक नगरसेवकांनी गेल्या पंधरा वर्षात प्रयत्नच केले नाहीत.त्यामुळे हा प्रभाग आजही विकासाच्या बाबतीत अंधारात चाचपडत आहे.आगामी निवडणुकीत मतदार परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत आले आहेत.या प्रभागात भाजप बहुजन विकास आघाडीचे असलेले वर्चस्व मोडून काढण्यासाठी सज्ज झाला आहे.भाजपला कायम साथ देणाऱ्या परप्रांतीयांचे वाढते प्रस्थ हे बहुजन विकास आघाडीला त्रासदायक ठरणारे आहे.या निवडणुकीत भाजपच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी बहुजन विकास आघाडीला या निवडणुकीत नवीन चेहरे द्यावे लागणार आहेत,अन्यथा त्यांचा कपाळमोक्ष ठरलेला आहे.
क्रमश:

