दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण हवे,” या मागणीचे काय झाले ?
मराठ्यांच्या आरक्षण प्रश्नी गेले पाच दिवस सुरू असलेल्या लढ्याला न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर पूर्णविराम मिळाला.या लढ्यात कोण जिंकले व कोण हरले ? हा आज ना उद्या वादाचा मुद्दा ठरू शकतो.कारण,मराठ्यांचे नेते मनोज जरांगे यांनी आम्हाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावे,यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून धरली होती.ती मागणी पूर्ण झाली नाही,त्यामुळे जरांगे पाटील जिंकले,असे म्हणता येणार नाही.
मुंबई उच्च न्यायालयाने या प्रश्नी हस्तक्षेप करावा,यासाठी सरकारने पडद्याआड ज्या हालचाली केल्या,त्या यशस्वी ठरल्या. हे आंदोलन बेकायदेशीर ठरवण्यासाठी ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या,त्यांच्या नावावरून नजर टाकल्यास या प्रकरणी नक्की काय घडले असणार ? याविषयी संशयाची पाल चुकल्याशिवाय राहत नाही.” मुंबईची सुरक्षितता,” ” कायदा व सुव्यवस्थेची स्थिती,” मुंबईचे जनजीवन विस्कळीत होण्याची भिती, अशा तीन कारणामुळे सरकार व जरांगे पाटील यांनी हैद्राबाद गॅझेटचा आधार घेत,हे आंदोलन संपुष्टात आणले.जरांगे पाटील यांनी केलेल्या सात मागण्यांपैकी पाच मागण्या मान्य झाल्या,असा ढोल आता दोन्ही बाजूनी वाजवण्यात येत आहे.त्यामध्ये हैद्राबाद गॅझेटियरला मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी,आंदोलकावरील सर्व गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेणे,महिन्याभरात सातारा गॅझेटियर लागू करणे,आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य सरकार १५ कोटी रु.ची मदत देणे व ५८ लाख कुणबी नोंदीच्या याद्या ग्रामपंचायतीमध्ये लावणे,अशा पाच मागण्याचा समावेश आहे.ज्या मागणीसाठी जरांगे पाटील गेली तीन ते चार वर्षे सरकारला जंग जंग पछाडले,त्या ” ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळावे,” या प्रमुख मागणीला सरकारकडून पाने पुसण्यात आली.” आम्ही ओबीसीच आहोत, आम्हाला ओबीसीच्या कोट्यातून सरसकट आरक्षण मिळावे,यासाठी हट्टाला पेटलेले जरांगे पाटील,आता आंदोलन मागे घेऊन मोकळे झाले आहेत.उलट,” ही मागणी पूर्ण व्हायला खूप अवधी लागणार असून याविषयी सुमारे ८ लाख हरकती आल्या आहेत.त्यावर होणारी सुनावणी दीर्घकालीन चालणार आहे,असे सरकारने नव्हे तर जरांगे पाटील यांनी स्वतःच काल जाहीर केले.इतक्या मोठ्याप्रमाणात हरकती दाखल होणे,ही साधी गोष्ट नाही,सरकारचे पाठबळ असल्याशिवाय हे शक्य होऊच शकत नाही.त्यामुळे सरकार व जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीमध्ये नक्की काय घडले ? हे मराठ्यांना कळायला हवे.गेली तीन वर्षे “आम्हाला ओबीसींच्या कोट्यातून सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे,आणि ते घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी जाणार नाही,” अशी ताठर भूमिका घेणाऱ्या जरांगे पाटलांचा या आंदोलनातही देवाभाऊंनी अक्षरशः पोपट केला,हे उघड आहे.यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी येथे जाऊन प्रचंड जनसागराच्या साक्षीने जरांगे पाटलांची फसवणूक केली होती.तशीच चाल देवभाऊनी खेळली असून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये,हैद्राबाद गॅझेटियर गाजर दाखवत देवाभाऊंने जरांगे पाटलांना चारीमुंड्या चित केले.देवाभाऊ,हे राज्याच्या राजकारणात आपल्या कायम पाठीशी असणाऱ्या ओबीसी समाजाला कदापी दुखावणार नाहीत,याचा अनुभव यानिमित्ताने पुन्हा एकदा आला आहे.
या सर्व घडामोडी घडत असताना राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या आंदोलनाला कोणी रसद पुरवली,त्यांची नांवे सरकारकडे असुन त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सरकार येणाऱ्या काळात आपली ताठर भूमिका सोडेल,असे वाटत नाही. तसेच सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात किती याचिका दाखल होतात,हे देखील मराठ्यांना पाहावे लागणार आहे.तोवर या लढाईत नक्की कोण जिंकले ? हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. मराठ्यांना एकच सांगणे आहे कि, ” अर्ध्या हळकुंडीने पिवळे होऊ नका, “

