दीपक मोहिते,
हल्लाबोल,
आता सर्वसामान्य करदात्यानी एकत्र येऊन लढायला हवे…
वसई तालुक्यात अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.१७ निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर आता महानगरपालिकेला जाग आली आहे.पण या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अधिकारी,स्थानिक नगरसेवक,प्रभाग समितीचा सभापती,सहा.प्रभारी आयुक्त इतकी वर्षे झोपले होते का ? हा खरा प्रश्न आहे.आज या महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामाची संख्या सुमारे एक लाखाच्या घरात पोहोचली आहे.या प्रकरणी सरकारने सखोल चौकशी करून या समाजकंटकाच्या पाठीशी असलेले खरे चेहरे लोकांसमोर आणले पाहिजेत.एरवी समाजात व्हाईट कॉलर म्हणून वावरत असलेल्या लोकप्रतिनिधींचीही तपास यंत्रणेद्वारा चौकशी झाली पाहिजे.
सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिलकुमार पवार याने एकट्याने शिक्षा भोगू नये,त्यांनी या लुटीमध्ये सामील असलेल्या व्हाईट कॉलर लोकांच्या नावाची यादी संबधित तपास यंत्रणेकडे दिली पाहिजे.ज्या ज्या समाजकंटकांनी महानगरपालिकेची तिजोरी लुटली,आपल्याला ज्या यातना भोगाव्या लागल्या,तशाच त्या भोगणे,त्यांच्याही नशिबी आले पाहिजे,यासाठी तपास अधिकाऱ्यांसमोर आपले तोंड उघडले पाहिजे.गुजराती भाषेत एक म्हण आहे,” हूं तो मरीस,पण तमने भी रांड बनावने मरीस,” या म्हणीनुसार त्यांनी या सर्व प्रकरणी वागायला हवे.तसे झाल्यास समाजात उजळमाथ्याने फिरणारे अनेक जण आत जातील.हे जेंव्हा होईल,त्याचवेळी तालुक्यातील कचऱ्याची खऱ्या अर्थाने साफसफाई होऊ शकते.या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्य करदात्यांनीही आता सक्रिय सहभागी झाले पाहिजे.आपल्या भागात अनधिकृत बांधकामास समाजकंटकाने सुरुवात केली की सर्वांनी एकत्र येऊन ते बांधकाम बंद पाडले पाहिजे.ते बांधकाम सुरू होण्यापूर्वी त्याला अडवले,तरच लोकांचे बळी जाण्याचे थांबू शकेल.हे समाजकंटक व गुंड प्रवृत्तीचे लोक भित्रे असतात,त्यामुळे त्यांना भिण्याची गरज नाही.दुर्देवाने तालुक्यात असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते देखील वसुलीच्या प्रक्रियेत चांगलेच गुंतून पडले आहेत,त्यामुळे त्यांच्याकडून फारशा अपेक्षा करू नका.हा लढा तुम्हालाच लढावा लागणार आहे.

