दिपक मोहिते,
भान असायला हवे,
…अन्यथा कपाळमोक्ष ठरलेला आहे,
गेल्या आठवड्यात वसई तालुक्यात अतिवृष्टी होऊन वसई,विरार व नालासोपारा या तीन महानगरात हाहाकार उडाला.अनेकांच्या घरात,दुकानात पाणी शिरले व सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान व हाल झाले.या दुर्देवी प्रसंगात तालुक्याचे जनजीवन तीन ते चार दिवस पार विस्कळीत झाले.सध्या पावसाचा जोर ओसरल्यामुळे या महानगरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

अशा या अस्मानी संकटात सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले असताना सोशल मिडियावर एक व्हिडियो क्लिप व्हायरल झाली व लोकांच्या मनात एक ना अनेक प्रश्न उभे ठाकले.नालासोपारा पूर्व भागात असलेल्या एका गटारामधून सांडपाणी निचरा न झाल्यामुळे लोकांच्या घराघरात पाणी शिरल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते.स्थानिक पातळीवर काम करणारी गाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते लोकांची या संकटातून सुटका व्हावी,यासाठी प्रयत्न करत होते.त्यावेळी नालासोपाऱ्याचे माजी आ.क्षितिज ठाकूर हे आपले स्थानिक माजी नगरसेवक सचिन देसाई व आपल्या समर्थकांसह घटनास्थळी आले.त्यावेळी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष गणेश बाळकृष्ण पाटील ( सध्या भाजपमध्ये सक्रिय ) तेथे आले आणि ते व क्षितिज ठाकूर या दोघांमध्ये पराकोटीचा वाद झाला.वास्तविक गणेश पाटील यांनी याविषयी स्थानिक आ.विलास तरे,माजी नगरसेवक सचिन देसाई व प्रभाग समितीच्या प्रभारी सहा.आयुक्तांना जाब विचारायला हवा होता.पण त्यांनी क्षितिज ठाकूर यांना याप्रश्नी घेरण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे वादाची ठिणगी पडली.क्षितिज ठाकूर यांचा पारा चढला व त्यांनी अरे तुरेची भाषा करत गणेश पाटील यांना चांगलेच झापले.गणेश पाटील यांची ही खेळी चांगलीच यशस्वी ठरली.अशाप्रसंगी क्षितिज ठाकूर यांचा संयम सुटतो व जनमानसात चुकीचे संकेत जातो.असे आजवर अनेकदा घडले आहे.त्याचा फटका कायम त्यांनाच बसत आला आहे.सार्वजनिक जीवनात वावरताना डोके शांत ठेवावे लागते.आपली भूमिका ही जनसेवकाची आहे,हे आपण विसरता कामा नये.पण,त्यांना ते सहन होत नाही आणि मग पुढे महाभारत घडते.भाजप अशाप्रकारचे सापळे रचण्यात माहीर आहे.त्यांच्या अशा ट्रॅपमध्ये त्यांनी आजवर अनेक दिग्गजांना अडकवले आहे.त्यामुळे या घटनेतही भाजपला जे हवे होते,ते साध्य झाले आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी हॉटेल विवांतामध्ये जो प्रकार घडला,तेथे अडकलेल्या महिला,विरोधी लोकांना झालेली मारहाण व त्यामध्ये क्षितिज ठाकूर यांचा सहभाग,या सर्व कारणांमुळे विधानसभा निवडणुकीत ” होत्याचे नव्हते,” झाले.त्यामुळे राजकीय जीवनात वावरताना संयम,सबुरी व समजूतदारपणा या तीन बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत,याचा विसर पडू देता कामा नये.भाजप हा एक ” स्लो पॉयझन,” देणारा पक्ष आहे.त्याचे विष आपल्या शरीरात कधी भिनते,हे आपल्याला कळत देखील नाही.हॉटेल विवांता व नुकतीच घडलेल्या घटनेच्या व्हिडियो क्लिपने समाजात चुकीचे संकेत गेले.वास्तविक हॉटेल विवांता येथे बापलेकाने जाणेच मुळात चुकीचे होते.लाडक्या बहिणी योजनेने विरोधी पक्षाच्या तोंडचे पाणी पळाले असताना ५०० ते ६०० महिला जीवाच्या भितीने कोपऱ्यात बसून असलेल्या क्लिप्स व्हायरल झाल्या व भाजपने आपला हेतू साध्य केला.समाजात वावरताना स्वतःला खूप सांभाळायला लागते.आपल्याला भेटणारी व्यक्ती,ही तुमच्या म्हणण्यानुसार वागेल,असे होत नाही.हा सर्व अनुभव गाठीला बांधून क्षितिज ठाकूर यांनी निदान आता तरी आपल्या वागण्यात बदल करायला हवा.भाजप महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तुमच्या वाटेवर असे अनेक सापळे लावणार आहे,हे गृहीत धरून तुमची वाटचाल व्हायला हवी.अन्यथा येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत तुमच्या पक्षाचा कपाळमोक्ष हा ठरलेला आहे.

