दीपक मोहिते,
विरोधकांच्या टीकेला उत्तर देत बसू नका,भाजपकडून कार्यकर्त्यांना टिप्स,
वसईतील राजकीय घडामोडीसंदर्भातील माहिती घेण्यासाठी मी दोन दिवसांपूर्वी दोन राजकीय पक्षाच्या मुंबईस्थित मुख्यालयात गेलो होतो.यावेळी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या.अनेक नेत्यांशी चर्चा झाली असता चर्चेच्या ओघात मंत्रिमंडळाच्या गमती जमती देखील ऐकायला मिळाल्या.त्यामध्ये शिंदे गटाच्या परतीच्या सुरस कथांचा समावेश होता.पण वसईत घडणाऱ्या राजकीय घडामोडीसंदर्भात काही हाती लागत नव्हते.आपली ही मुंबई फेरी वाया जाते की काय ? असे वाटू लागले.त्यामुळे येथे काही मिळणे शक्य नाही,असे समजून बॅलॉर्ड इस्टेट येथील सक्तवसुली संचालनालयाचे कार्यालय गाठूया,असे मनोमनी ठरवून निघत असताना एका पदाधिकाऱ्याने शिपायाला पाठवून मला बोलावून घेतले.तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियममंत्री राम नाईक यांच्या जनसंपर्काचे काम करणारा माझा वर्गमित्र स्व.विकास आगवेकर यांचा तो मित्र निघाला.मी माझी ओळख दिल्यानंतर त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले व त्यांना सांगितले की ही व्यक्ती पत्रकार आहे,त्यांना जी माहिती हवी ती त्यांना दे जरा.. तुला पालघर जिल्ह्यातील राजकारणाची चांगली माहिती आहे,त्यांना सहकार्य कर..त्यांनी होकार दिला.त्यांनी मला कार्यालय परिसरात चर्चा नको,आपण चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या जवळ असलेल्या कॅफेटरीयामध्ये बसून बोलू.त्याला मीही संमती दिली.आम्ही तेथे आलो,तेथे पोहोचल्यानंतर आम्ही कॉफीची ऑर्डर दिली.चर्चा सुरू होण्यापूर्वी आपण मुलाखतीच्या माध्यमातून चर्चा केली तर चालेल का ? अशी मी त्यांच्याकडे विचारणा केली असता,त्यांनी हरकत नाही,पण माझे नाव नमूद करू नका,अशी विनंती केली,ती मी तत्काळ मान्य केली व आम्ही चर्चेस सुरुवात केली.
मी – तुम्ही पक्षाच्या कोणत्या पदावर आहात ?
सदर व्यक्ती – मी कोणत्याही पदावर नाही. एका विचारधारेशी निगडित असा मी कार्यकर्ता आहे.त्याकाळी भाजप नव्हे तर भारतीय जनसंघ होता.१९८० साली राम नाईक प्रथम बोरिवली विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले.त्यानंतर जनसंघाचे भारतीय जनता पार्टी,असे नामकरण झाले.त्यानंतर ते उत्तर मुंबईचे खासदार झाले.त्यावेळी तत्कालीन ठाणे जिल्ह्यात भाजपचा फारसा प्रभाव नव्हता.पण हळूहळू पक्ष हातपाय पसरू लागला होता.तेव्हापासून मी पक्षासोबत जोडलो गेलो होतो.हा सगळा इतिहास सांगण्याचे कारण असे की तुमचा मित्र स्व.विकास आगवेकर व माझे नाते लहानमोठ्या भावासारखे होते.सध्या मी पालघर जिल्ह्यातील राजकीय घडामोडीचा अभ्यासक म्हणून सक्रिय आहे.आम्ही मंडळी सक्रिय असलो तरी प्रसिद्धीच्या झोतात कधीच नसतो.असो,आपण मूळ विषयाकडे वळूया.
मी – लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या विजयाची पुनरावृत्ती होईल का ?
सदर व्यक्ती – नक्कीच होऊ शकते.मुंबई,ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व निवडणुका महायुती हमखास जिंकेल.या तिन्ही जिल्ह्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.मुंबई व ठाणे येथे पक्षाला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.वसई – विरार शहर महानगरपालिकेत तशी मेहनत करावी लागणार नाही.कारण पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी गेली पंधरा वर्षे जो कारभार केला,त्यावर येथील मतदार प्रचंड नाराज आहे.या महानगरपालिका क्षेत्रात प्रचंड आर्थिक निधी खर्च होऊनही पाणी,शिक्षण,आरोग्य,वैद्यकीय सेवा,रस्ते,सांडपाणी निचरा,डंपिंग ग्राउंड हॉस्पिटल्स व उद्याने इ. सोयी सुविधा करदात्यांना मिळू शकल्या नाहीत,त्यामुळे या निवडणुकीत मतदार पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना संधी देणार नाहीत.त्यामुळे भाजप सध्या चांगलाच सक्रिय झाला आहे.
मी – हे सारे ठीक आहे,पण दुसऱ्या पक्षातील बदनाम लोकाना भाजपमध्ये घेण्याचे धोरण पक्षाला हानिकारक ठरणार नाही का ?
सदर व्यक्ती – दुसऱ्या पक्षातील नाराज लोकांना आपल्या पक्षात घेणे,हे चुकीचे नाही.आता आपल्या पक्षाला भवितव्य नाही,हे लक्षात घेऊन अनेकजण भाजपमध्ये सामील होत आहेत,यामध्ये गैर काहीही नाही.त्यामुळे गेल्या महिन्यापासून इनकमिंगला वेग आला आहे.याविषयी तुम्ही माहिती घेतली तर ८० % लोक भाजपच्या संपर्कात असल्याचे दिसून येईल.राजकारणात सतत तडजोडी कराव्या लागतात,त्यामुळे इनकमिंग हा त्याचाच एक भाग आहे.
मी – या अशा धोरणामुळे विरोधी पक्ष नामशेष होणार नाही का ? विरोधी पक्षाचे अशाप्रकारे नामशेष होणे,आपल्या लोकशाही व्यवस्थेला मारक ठरणारे नाही का ?
सदर व्यक्ती – बिलकुल नाही,कारण,हे इनकमिंग कोणत्याही प्रकारचा दबाव टाकून घडवण्यात येत नाही.जर कोणी स्वखुशीने येत असेल तर त्याला अडवता येत नाही.तसं अडवल्यास ती लोकशाहीशी प्रतारणा ठरू शकते.
मी – याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात घाऊक स्वरूपात इनकमिंग होण्याची शक्यता आहे.याविषयी तुम्हाला काय वाटते ?
सदर व्यक्ती – या महिन्यात इनकमिंगला प्रचंड वेग येण्याची शक्यता आहे. अनेक माजी नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहेत.तसेच येत्या मंगळवारी वसईतील ख्रिस्ती समाजातील ६० ते ७० तरुण हे भाजपमध्ये सामील होत आहेत.
मी – विरोधी पक्षाला अशाप्रकारे संपवणे,तुम्हाला योग्य वाटते का ?
सदर व्यक्ती – लोक तुम्हाला कंटाळले असतील तर कोण काय करू शकतो.बदल,हा निसर्गाचा नियम आहे.संपूर्ण जग त्याच नियमानुसार चालते.त्यामुळे ते गैर नाही,असे मला वाटते.पालघर जिल्ह्यात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,गणेश नाईक व विवेक पंडित आता चांगलेच सक्रिय झाले असून अनेकजण या तिघांच्या संपर्कात आहेत.पक्षात येणाऱ्यांना हे तिघेही पक्षात दाखल होताना ” कोणावरही टीका करू नका,आपल्या विकासाचा अजेंडा लोकांसमोर मांडा, विरोधकांना आपल्यावर हवी तेवढी टीका करू द्या,तुम्ही त्याला उत्तर देत बसू नका,आपण करत असलेल्या विकासकामांचे श्रेय ते घेत असले तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.आपली कामे कोण करतो ? याची मतदारांना चांगली जाण आहे.त्या लोकांनी जर विकासकामे केली असती तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना नाकारले असते का ? म्हणून त्यांना उत्तर देण्यात आपला वेळ दवडू नका,अशा टिप्स त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्याना दिल्या आहेत.त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहेत.
मी – धन्यवाद, निवडणुकीनंतर पुन्हा भेटू,
सदर व्यक्ती – नक्कीच भेटू,मला वेबपोर्टलची क्लिप पाठवा,न विसरता..

