दिपक मोहिते,
असे काय घडले महेश पाटील बाहेर पडले ?
काल सांयकाळी साडेसातच्या सुमारास अचानक माझा मोबाईल खणखणला,संध्याकाळी ५.०० ते ८.०० दरम्यान माझे दुसऱ्या दिवसाच्या कामाचे नियोजन सुरू असते.त्यामुळे मला या दरम्यान कोणाचे सहसा कॉल येत नसतात.पण काल याच दरम्यान मला कॉल आला.मी वैतागलेल्या चेहऱ्याने कॉल उचलला.पलीकडून आवाज आला.” मोहिते साहेब,तुमच्या वेबपोर्टलसाठी ब्रेकिंग आहे.” ते ऐकल्यावर माझी उत्सुकता एका क्षणात टिपेला पोहोचली.तो कॉल माझ्या एका जवळच्या मित्राचा होता, त्याने जे काही सांगितले ते ऐकल्यानंतर मी चक्क उडालो,त्याची ब्रेकिंग होती,बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक व माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्तीय,त्यांच्या सुखदुःखात सतत त्यांना साथ देणारे प्रसिद्ध उद्योजक व माजी नगरसेवक महेश पाटील हे लवकरच भाजपमध्ये दाखल होत आहेत.महेश पाटील व माझी मैत्री ही जवळपास ३० ते ३५ वर्षाची.राजकारणातील सुशील व्यक्तिमत्व,सतत आनंदी असणारे,कोणालाही न दुखावणारे पण आपले मत ठामपणे मांडणारे,असे हे व्यक्तिमत्व,दररोज आमचे बोलणे होत असते,त्यामुळे आता आलेला हा कॉल अत्यंत महत्वाचा आहे,हे माझ्यातील चाणाक्ष पत्रकाराने झटकन ओळखले व मी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी या ब्रेकिंग न्यूजला दुजोरा दिला.
आज ना उद्या त्यांचा भाजप प्रवेश होणार ही काळ्या दगडावरची रेख होती.अखेर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.आज सांयकाळी ७.०० वाजता भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी त्यांनी प्रवेशावर शिक्कामोर्तब केल्याचेअजय मित्राने सांगितले.त्यांच्यासोबत आणखीही काही कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत.
त्यांचा हा निर्णय अचानक घेण्यात आलेला निर्णय नाही.कारण,पाटील गेले सहा ते सात वर्षे पक्षात नाराज होते.एकदा तर त्यांनी राजीनामाही दिला होता.पण त्यावेळी पक्षनेतृत्वाने त्यांची समजूत काढली होती आणि त त्यांनीही मोठ्या मनाने घरवापसी केली होती.पक्षात कुचंबणा होत असल्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला होता.मग हल्लीच्या काळात असे काय घडले ? की त्यांना पुन्हा असा निर्णय घ्यावा लागला ?
गेल्या सात ते आठ वर्षात पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्याना किंमत उरली नव्हती.पक्षाच्या बैठकीत प्रामाणिक कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते,सर्वत्र हवशे – नवशे,अशी ओळख असलेल्या कार्यकर्त्यांचा सुळसुळाट झाला होता.शासकीय अधिकारी व बडवे अक्षरशः बेफाम झाले होते.आजही तशीच परिस्थिती कायम आहे.त्यांच्यासारख्या मूठभर जवळच्या लोकांनी अनेकदा याविषयी वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.पण त्यांनाच टार्गेट करणे,सुरू झाले होते.त्यांच्या विकासकामांत अडथळे आणणे,अधिकाऱ्यांना त्यांची कामे करू न देणे,तसेच त्यांच्या मताला काडीची किंमत देखील दिली जात नव्हती.नव्याने पक्षात दाखल झालेल्या तरुणांचा सर्वत्र झालेला सुळसुळाट हा पक्षाच्या अधोगतीला कारणीभूत ठरत होता,पण त्यावर लगाम घालण्याऐवजी त्यांना मोकळे रान दिले गेले.त्यामुळे ते पक्षकार्यापासून लांब होत गेले.दरम्यान भाजपचे अनेक नेते त्यांना भेटत होते.पण त्यांचे मन तयार होत नव्हते.अखेर गेल्या आठवड्यात त्यांनी अपमानास्पद जीणे जगण्याऐवजी स्वाभिमानाने जगणे कधीही चांगले,म्हणून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.त्यांच्या कुटुंबाने देखील त्यांच्यामागे सतत तगादा लावला होता,की बस्स झाले राजकारण,आता राजीनामा देऊन बाजूला व्हा..आपला व्यवसाय सांभाळा,पण संपूर्ण आयुष्य राजकारणात गेल्यानंतर आपण राजकारणापासून अलिप्त राहू शकत नाही,त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
या सगळ्या घडामोडीना नेमके कोण जबाबदार आहेत,याचा शोध घेण्याचा आमच्या टीमने गेल्या दिवसापासून प्रयत्न सूरू केला होता.
पक्षाचे नेतृत्व व त्यांचे नाते हे गेली अनेक वर्षे मैत्रीचे आहे.हे दोघेही एकमेकांच्या सुखदुःखात सामील होत असत.पण अवतीभवती वावरणाऱ्या बडव्यांनी त्यामध्ये मिठाचा खडा टाकला.खालच्या स्तरावर पक्षात काय चालले आहे,हे नेतृत्वाला कधीच कळू दिले नाही आणि नेतृत्वानेही कधी कळून घेण्याचा प्रयत्न केला नाही.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तिन्ही जागांवर पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला.या पराभवानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला,या घटनेला चार महिने उलटून गेल्यानंतरही साधी विचारपूसही कोणी केली नाही.पक्षनेतृत्वाने त्यांचा राजीनामा व पराभवाविषयी आत्मपरीक्षण करायला हवे होते.पण त्यानंतरही ” ये रे माझ्या मागल्या,” असेच होत राहिले.त्यामुळे आता पक्षात ओहोटी सुरू झाली आहे.त्यांच्या जाण्याने पक्षाची प्रचंड हानी झाली आहे.पण हल्ली प्रामाणिक कार्यकर्त्यांची किमत शून्य झाली आहे. कोणाच्या जाण्याने पक्षाला काही फरक पडत नाही,अशी आधुनिक विचारधारा आता जन्माला आली आहे.

