दीपक मोहिते,
स्वातंत्र्याची दुसरी लढण्यासाठी पत्रकारांनी तयारी ठेवावी….
पत्रकारीताहा लोकशाही व्यवस्थेत चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो.गेली अनेक वर्षे या विषयावर खुप काही बोलले व लिहिले गेले.पत्रकारिता हा समाजमनाचा आरसा असतो व समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या व वाईट घडामोडीचे प्रतिबिंब,या आरशात उमटत असते.पण हल्ली या आरशाला तडे पडू लागले आहेत.एकेकाळी आदर्श पत्रकारिता म्हणून ओळख असलेले हे माध्यम आता ” गोदी मिडिया,” म्हणून नावारूपाला आले आहे.बदलत्या काळानुसार पत्रकारानीही आपली चौकट पार बदलून टाकली आहे.वृत्तवाहिनी व वृत्तपत्र समुहाच्या मालकानी आपल्या उद्योगाला अर्थकारणाची जोड देण्यास सुरुवात केल्यानंतर पत्रकार देखील बेफाम होत गेले.पत्रकारांचे लगाम मालकाच्या हातून राजकारण्याच्या हाती कधी गेले ते कळले देखील नाही.आता काळाच्या ओघात पत्रकार हे पोलीस अधिकारी व नेतेमंडळीच्या वाढदिवसाचे केक कापू लागले आहेत.हा बदल धोकादायक असला तरी तो आता अनिवार्य ठरला आहे.
पूर्वीकाळी पुरेशा संसाधना अभावी प्रसिद्धि माध्यमे तितकी वेगवान नव्हती जितकी ती हल्लीच्या युगात आहेत.जगभरातील कोणत्याही शहरात काहीही घडले तर क्षणार्धात घरात बसून त्या घडामोडी आपण पाहू शकतो.इतकी ही सर्व माध्यमे प्रभाव व वेगवान झाली आहेत.त्याचा समाजसुधारणा प्रक्रियेत देखील चांगला परिणाम जाणवू लागला आहे.पण या बदलत्या पत्रकारितेविषयी फारसे चांगले बोलले जात नाही.स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्रसिद्धि माध्यमे अक्षरशः आग ओकत असायची.आज पुन्हा स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरु झाली आहे.पण आमची लेखणी मोडून पडली आहे व वृत्तवाहीनीचे कॅमेरे निशब्द झाले आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तवाहिन्या नव्हत्या. वर्तमानपत्रे सरकारच्या दमनशाही,डिवाइड अँड रुल, या धोरणाविरोधात ब्रिटिश सरकारला धारेवर धरत असत.हे येथे नमूद करण्याचे कारण असे की हल्ली पत्रकार सत्तेतील लोकांना प्रश्न विचारण्याऐवजी विरोधकांना विचारण्यात धन्यता मानू लागले आहेत.त्यामुळे आपल्या देशातील पत्रकारीतेची वाटचाल आता वेगळ्या दिशेने सुरु आहे,अशी सर्वत्र ओरड सुरु झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिश सरकारशी झालेल्या लढ्यात स्वातंत्र्य सैनिकांसोबत पत्रकारांनी स्वतःला झोकून दिले होते. सत्तेचा माज ब्रिटिश सरकारलाही होता,पण त्यावेळचे नेते व पत्रकार यांच्या सजगतेमुळे ब्रिटिश सम्राज्याचे होत्याचे नव्हते झाले.कदाचित आज ना उद्या आपणा सर्वावर स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायची पाळी येणार आहे.त्यावेळी राजकारण्यासह पत्रकारांना देखील या जीवन मरणाच्या लढाईत स्वतःला झोकून द्यावे लागणार आहे.आपल्याकडून सध्या होत असलेल्या चूका त्यांना त्यावेळी नक्कीच आठवतील,त्या दुरुस्त करून त्यांना आपल्या कर्तूत्वाला योग्य दिशा द्यावी लागणार आहे…

