दीपक मोहिते,
” निवडणूक रणसंग्राम,”
भाजप चांगलाच सक्रिय ; अनेक नाराज गळाला लागण्याची शक्यता…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येत्या चार महिन्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून भाजपची यंत्रणा आता सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.विधानसभा निवडणुकीत
मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप आता वसई विरार महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहेत.
दोन दिवसापूर्वी झालेल्या घाऊक इनकमिंगमुळे भाजप चांगलाच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.शिवसेनेचे पंकज
देशमुख व किशोर पाटील हे दोघे पूर्वाश्रमीचे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते होते.लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेमध्ये ( उबाठा ) प्रवेश केला.पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी त्यांना पक्षात आल्या आल्या जिल्हाप्रमुखपद दिले.त्यामुळे पक्षात प्रचंड नाराजी निर्माण झाली व त्यांना विरोध होण्यास सुरुवात झाली.सेनेचे नवघर- माणिकपूर शहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी सर्वप्रथम बंडाचे निशाण फडकावले.त्यानंतर माज जिल्हाप्रमुख व सेनेचे वरिष्ठ नेते शिरीष चव्हाण यांनीही नेत्यांच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. त्यामुळे पंकज देशमुख यांची पक्षात चांगलीच कोंडी झाली.त्यांची अवस्था ” आगीतून फुफाट्यात,” अशी झाली.त्यानंतर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या देशमुख यांनीआपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले,पण नालासोपारा विधानसभा ही जागा महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला गेली.त्यामुळे पंकज देशमुख निराश झाले व त्यांनी वेगळा विचार करण्यास सुरुवात केली.त्यानंतर दोन। दिवसांपूर्वी त्यांचा भाजप प्रवेश झाला.त्यांच्या जाण्यानंतर सेनेत प्रचंड जल्लोष झाला.सेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यानी त्यांच्यावर अत्यंत कडवट
भाषेत टीका केली.माजी विरोधी पक्ष नेते विनायक
निकम व पदाधिकारी प्रमोद दळवी यांनी देशमुख याने पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप केला.पक्षात आपल्या विषयी असलेली नाराजी व होणारा विरोध लक्षात घेऊन त्यानी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार दोन दिवसापूर्वी प्रवेश सोहोळा पार पडला.प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यासह बविआचे नगरसेवक व असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले.पण भाजपमध्येही पंकज देशमुख यांची डाळ शिजणे कठीण आहे. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात आ.राजन नाईक यांनी पक्षावर चांगली पकड राखली आहे.पक्षात त्यांनी आपल्या समर्थकांची विविध पदावर वर्णी लावली आहे.त्यामुळे देशमुख यांना पक्षकार्य करताना अडथळ्याची शर्यत पार करावी लागणार आहे.माजी जिल्हाप्रमुख महेंद्र पाटील,विद्यमान जिल्हाप्रमुख प्रज्ञा पाटील,मनोज बारोट,हे आ.नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यामुळे त्यांची व कृष्णा पाटील यांची डाळ शिजणे कठीण आहे.
दुसरीकडे बविआचे नितीन. ठाकूर यांचे आपल्या शेकडो समर्थकासह पक्षाला सोडचिट्ठी देणे,पक्षाला चांगलीच डोकेदुखी ठरणार आहे.नितीन ठाकूर हे आपल्या भागातील निवडणुका बिनविरोध करणारे नेते म्हणून ओळखले जातात.पक्षासाठी त्यांनी गेल्या तीस वर्षात अनेक संकटे आपल्या अंगावर ओढवून घेतली.पण पक्षातील एका गटाने त्यांची अनेक स्तरावर सतत उपेक्षा केली व त्यांना प्रत्येक वेळी रोखण्याचा प्रयत्न
केला.नितीन ठाकूर व या गटामध्ये असलेली दरी सतत रुंदावत चालली होती.पण पक्षाच्या वरिष्ठांनी ती कमी करण्याचा प्रयत्न केला नाही,उलट दुसऱ्या गटालाम सतत झुकते माप दिले.तरीही नितीन ठाकूर पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले.पण काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला व दोन दिवसापूर्वी त्यांच आपल्या समर्थकासह भाजप प्रवेश झाला.यापूर्वी धरेंद्र कुलकर्णी व आता नितीन ठाकूर हे दोघे भाजपवासी झाल्यामुळे बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व व पश्चिम भागामध्ये क्षीण झाली आहे.त्याचा फटका महानगरपालिका निवडणुकीत या शहरात पक्षाला बसू शकतो.

