दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आता ती वेळ निघून गेली आहे…
आज अखेर अपेक्षेनुसार बहुजन विकास आघाडी व शिवसेना ( उबाठा ) गटाला गळती लागली.ही केवळ सुरुवात आहे,पुढे फार मोठे महाभारत घडणार आहे.माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्याला का सोडून जाताहेत,याचा विचार आता करून काहीही साध्य होणार नाही.मी या विषयावर दोन वर्षांपासून लिहीत होतो.पण नेतेमंडळीनी त्याची दखल घेतली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षाला भाजपने अस्मान दाखवले.पण त्यानंतरही या दोन्ही पक्षात पराभवाची कारणमीमांसा व आत्मचिंतन झाले नाही.पूर्वीकाळी लोकांसमोर पर्याय नव्हता,त्यामुळे राजकीय समीकरणे बदलू शकली नाहीत.पण भाजपने विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली व या दोन्ही पक्षाच्या नेत्याच्या पायाखालची जमीन सरकली.आजपर्यंत नेतेमंडळी आम्ही ५० हजार मतांनी विजयी होणार,आम्ही पैकीच्या पैकी जागा जिंकणार,असे छातीठोकपणे सांगत असायचे.कारण लोकांसमोर अन्य पर्याय नव्हता.पण भाजपच्या रूपाने तो उपलब्ध झाला व भाजपवाल्याना देखील अपेक्षित नसताना त्यांनी बाजी मारली.त्यानंतरही काही जण आपल्या नेत्यांचे व लोकांची दिशाभूल करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करत होते.तो एक राजकारणाचा भाग होता.त्यावर पुढेमागे कधीतरी वेगळा अध्याय लिहिता येईल.
विधानसभेतील पराभवानंतर तरी पदाधिकाऱ्यांच्या वागण्यात बदल होईल,संघटना बांधणीकडे लक्ष दिले जाईल,असे कार्यकर्त्याना वाटत होते.पण कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला.आपल्या पक्षाच्या उभारणीमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग आहे,हे वास्तव पक्षात कधीच मान्य केले गेले नाही.पण देश व राज्यात जे वादळ २०१४ पासून घोंगावू लागले,त्याचवेळी पक्षाला जाग यायला हवी होती.पण तशी ती जाग आली नाही.नायगाव पूर्व भागातील कार्यकर्ते धरेंद्र कुळकर्णी व आता पश्चिम भागातील कट्टर कार्यकर्ते नितीन ठाकूर,त्यांचा मुलगा यशोधन ठाकूर यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकणे,हे आगामी काळात पक्षाला सेटबॅक बसणारे आहे.गेली अनेक वर्षे या गटाला सतत दाबण्यात येत होते.दोन दिवसानंतर पुन्हा ” दे धक्का,” चा प्रयोग होण्याची शक्यता आहे.अनेक कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असल्याची प्रतिक्रिया वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी आज माध्यमांना दिली.त्यामुळे परवा शुक्र.काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना उबाठा गटाचे दोन माजी नगरसेवक,१६ विभागप्रमुख व कार्यकर्ते देखील भाजपमध्ये सामील झाले.त्यांच्या भाजप प्रवेशाने फारसा काही फरक पडणार नाही.शहराचे नेतृत्व करण्याइतपत त्यांची क्षमता नाही.त्यामुळे आ.राजन नाईक यांना भविष्यात फारशी डोकेदुखी होणार नाही.गेल्या दोन वर्षात दोनदा पक्षबदल करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेला किंमत नसते.त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने फारसा काही फरक पडणार नाही.आजच्या घडामोडीमुळे आकाश फाटत चालले आहे,हे स्पष्ट झाले आहे.किती आणि कुठे कुठे ठिगळं लावणार ? कारण,ती वेळ आता निघून गेली आहे.

