दीपक मोहिते,
” जिल्हा वर्धापनदिन विशेष,”
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थ आजही उपेक्षित जीवन जगताहेत,
काल पालघर जिल्ह्याचा ११ वा वर्धापन दिन होता,पण जिल्ह्यात कुठेही उत्साह व आनंदाचे वातावरण नव्हते.कारण गेल्या ११ वर्षाच्या प्रदीर्घ काळात जिल्ह्यात विकासाची गंगा अवतरली नाही.नव्याने जिल्हानिर्मिती होऊनही लोकांच्या जीवनमानात तसूभरही फरक पडला नाही.गेल्या अनेक वर्षांपासून ज्या समस्या प्रलंबित होत्या,त्या आजही ” जैसे थे,” स्थितीत आहेत.रोजगार,कुपोषण,
रोजगारासाठी स्थलांतरण,चालायला धड रस्ते नाहीत,आरोग्य सेवा व शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा, जिल्हावासीयांच्या पाचवीला पूजलेलाच आहे.अशा परिस्थितीत नागरिक जिल्ह्याचा वर्धापन दिन तरी कसा साजरा करणार ?

या जिल्ह्याला आदिवासी दर्जा मिळाल्यामुळे दरवर्षी प्रचंड प्रमाणात आर्थिक निधी मिळत असतो.पण तो लोककल्याण व जिल्हाविकास कामी खर्च होत नाही.रुपयामधील ८० पैसे कुठे जातात ? याचा थांगपत्ता लागत नाही.अठरापगड दारिद्र्यात असलेला आदिवासी समाज आजही अंधारात चाचपडत आहे.शिक्षण,आरोग्य व रोजगारापासून वंचित आहे.पावसाळ्यानंतर शेतीची कामे संपली की आदिवासी मजूर आपल्या कुटुंबासह रोजगाराच्या शोधात शहराकडे स्थलांतरित होत असतो.पण जिल्हा प्रशासनाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही.गेल्या ९ वर्षात लोकप्रतिनिधी व सनदी अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष दिले नाही.लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणापायी व्यवस्था पूर्णपणे नोकरशाहीच्या ताब्यात गेली आहे.जिल्हा परिषदेच्या शाळा एकामागोमाग बंद पडत नाही.विद्यार्थ्यांची गळती होण्यामागची नेमकी काय कारणे आहेत,ते शोधायचा प्रयत्न ना लोकप्रतिनिधींनी केला ना अधिकाऱ्यांनी केला.त्यामुळे जिल्हा साक्षरतेच्या प्रकाशात न्हाऊन निघण्याऐवजी जिल्हा निरक्षरतेच्या अंधारातच चाचपडत राहिला.बालमृत्यू व गरोदर महिलांचे मृत्यू,रोखण्यातही प्रशासन कमी पडले असून दिवसागणिक मृत्यू होत असतात.पण अधिकारी व लोकप्रतिनिधींना त्याची चाड नाही.अशा परिस्थितीत जिल्ह्याने काल अकराव्या वर्षात पदार्पण केले,पण आम्ही जिल्ह्याचा वर्धापनदिन कसा साजरा करायचा ? या प्रश्नाचे उत्तर एकाही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींकडे नाही.

पालकमंत्री गणेश नाईक व जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड,हे दोघेही दररोज नवनव्या विकास योजनाच्या घोषणा करत असतात.मात्र प्रत्यक्षात या जिल्ह्यातील आदिवासी जनता आजही दारिद्रातच वावरत आहेत. वास्तविक नवनव्या घोषणा करण्याऐवजी गेल्या अकरा वर्षात हजारो कोटी रु.खर्ची पडूनही जिल्हा विकासाच्या वाटेवर का जाऊ शकला नाही ? जिल्ह्याच्या विकासासाठी देण्यात आलेला प्रचंड निधी कुठे खर्ची पडला ? याचा लेखाजोगा जिल्हावासियांसमोर मांडायला हवा.त्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी श्वेतपत्रिका काढावी,अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे.

