दीपक मोहिते,
” विचारमंथन,”
स्व.आ.गणपतराव देशमुख ; असा लोकप्रतिनिधी आता होणे नाही,
गणपतराव देशमुख,हे शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते होते.ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२ पासून पाच दशके निवडून गेले.चार वर्षांपूर्वी ३० जुलै २०२१ रोजी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
स्व.आ.गणपतराव देशमुख हे राज्यातील सर्वात वयस्कर आमदार होते.निधन समयी गणपतराव देशमुख ९४ वर्षांचे होते.गणपतराव देशमुख यांनी बारा वेळा विधानसभा निवडणूका जिंकल्या.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाकडून निवडून येत असत.तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करूणानिधी हे देखिल बारा वेळा विजयी झाले होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला मतदारसंघातून त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून,करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख,हे देशातील दुसरे आमदार ठरले होते.अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले.गेल्या निवडणुकीत त्यांनी ९४ हजार ३७४ मते मिळवून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा २५ हजार २२४ मतांनी पराभव केला होता.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने गणपतराव देशमुख यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता. देशमुख हे सांगोल्यात सर्वप्रथम १९६२ च्या निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली.२०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा यथोचित गौरव केला होता.
गणपतराव देशमुख हे प्रदीर्घ काळ विरोधी बाकांवरच होते,मात्र १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले, तेव्हा आणि १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा,असे दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता
सर्वसामान्य कष्टकरी,गोरगरीब जनतेच्या प्रश्नाशी नाळ जुळलेले नेते,अशी त्यांची ओळख,ती मरेपर्यंत त्यांनी कायम ठेवली.एकीकडे मर्सिडीझ,ऑडी,बीएमडब्ल्यू मधून फिरणारे सध्याचे लोकप्रतिनिधी तर दुसरीकडे कायम एस.टी.मधून प्रवास करणारे गणपतराव देशमुख,किती हा विरोधाभास….
दररोज सकाळी लोकांचे प्रश्न व समस्या ऐकणे व त्या सोडवणे,हा दिनक्रम त्यांनी शेवटपर्यंत सुरू ठेवला होता.त्यांच्या जाण्याने जुन्या पिढीतील अभ्यासू, लोकांच्या दैनंदिन अडचणी व समस्याशी नाळ जुळलेला तपस्वी आपण गमावल्याचे शल्य आपल्याला कायम बोचत राहणार आहे.
” तेथे कर माझे जुळती “,

