दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” मुन्नी बदनाम हुई,” बलात्कार आता थांबायला हवेत…
” मुन्नी बदनाम हुई,” हे गाणे जसे सिने रसिकांच्या पसंतीला उतरले,त्या पार्श्वभूमीवर ” हमारी मनपा हुई बदनाम,करदाते हुए कंगाल,बाकी सारे हुए मालामाल,” हे नवीन गाणे लवकरच प्रकाशित होण्याची शक्यता आहे.
आमची ही ” मुन्नी,” जन्माला आल्यापासून बिचारी बदनाम होत आली.राजकारणी,अधिकारी,ठेकेदार यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केले. त्यामुळे ती सध्या व्हेंटिलेटर
पोहोचली आहे.तिची प्रकृती सुधारण्याच्या मार्गावर असताना अनिलकुमार पवार नावाचा व्हायरस दाखल झाला.या व्हायरसने मुन्नीला छीन्नविछिन्न करण्याचा जणू विडाच उचलला.त्यापूर्वी जे काही लहान मोठे व्हायरस सक्रिय होते,त्याची मोलाची साथ या व्हायरसला मिळाली आणि आमची मुन्नी आज अत्यावस्थेत व्हेंटिलेटरवर पोहोचली आहे.तिला मरण येणार नाही,पण तिची प्रकृती सुधारायला एक तप
लागण्याची शक्यता आहे.चांगला डॉक्टर आला तरच आपली मुन्नी पुन्हा उठून बसेल,अन्यथा ती कायम कुपोषित होऊन आपले जिणे जगेल..
आज नगरसेवक,मनपाचे वरिष्ठ अधिकारी,ठेकेदार,बिल्डर्स व दलाल यांनी वसई विरार शहर महानगरपालिका अक्षरशः लुटून खाल्ली. लायकी नसताना आपण ज्यांना निवडून दिले,त्यांनीच आपला घात केला.ही महानगरपालिका केवळ लुटण्यासाठीच स्थापन झाली,असा गैरसमज करून घेऊन या लोकांनी गेल्या १५ वर्षात आपल्या मुन्नीचे कपडे टराटरा फाडले.या १५ वर्षात या समाजविघातक लोकांनी तुमच्या आमच्या पैश्याची किती लूट केली,याचा तपास कॅगने केला पाहिजे.तसेच ज्या लोकांकडे अमाप पैसा आला ? तो कुठून आला ?याची कसून चौकशी करून त्यांना गजाआड करणे,ही काळाची गरज ठरली आहे.पंधरा वर्षांपूर्वी स्कुटी व मळकट सायकलीवरून फिरणारे आज इनोव्हातुन कसे फिरू लागले ? याची चौकशी व्हायला हवी.रामप्रहरी लंगोटावर टमरेल घेऊन शेतात जाणाऱ्या लोकांच्या अंगावर सुटबुट कसे व कोठून आले ? कोणी अनधिकृत इमले उभे केले, कोण महानगरपालिकेचे पाणी चोरून विकतो,कोण शहरातील नाल्यात स्वच्छंदपणे पोहतो ? कोण कचरा चिवडतो ? कोण गटारात यथेच्छ लोळतो ?कोण सरकारच्या नाकावर टिच्चून आरक्षित जमिनीवर अनधिकृत इमले उभारतो ?या सगळ्याचा छडा,तपास यंत्रणांनी लावायला हवा.आज अधिकारी चौकशीच्या जात्याखाली आले आहेत.पण इतरांचे काय ? त्यासाठी तपास यंत्रणांनी झाडाच्या केवळ फांद्या तोडून थांबता कामा नये,तर झाडाच्या बुंध्यावर घाव घालायला हवा,तरच मुन्नी पुन्हा ताजीतवानी परिसर विकासासाठी सज्ज होऊ शकेल.अन्यथा ” येरे माझ्या मागल्या,” असेच होत राहणार…

