दीपक मोहिते,
आणखी एका अति. आयुक्तांचा गळा आवळला जाणार….
अखेर आज वसई विरार शहर महानगरपालिकेत दुसरी महत्वाची विकेट पडली.आयुक्त अनिलकुमार पवार यांची नुकतीच बदली झाली होती.त्यानिमित्ताने काल त्यांना मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला.या समारंभाच्या दुसऱ्याच दिवशी भले पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा गळा आवळला.यापूर्वी आयुक्त राठोड यांचीही पवार यांच्यासारखीच सत्कार सोहळ्याच्या दिवशीच नगरविकास विभागाने गळा आवळला होता.त्यांचा निरोपसंमारभ ज्या दिवशी आयोजित करण्यात आला होता,त्याच दिवशी त्यांच्या हाती निलंबनाची नोटीस पडली.त्यामुळे ते समारंभ स्थळी फिरकले नाहीत.बिचारे त्यांचे चाहते कित्येक तास ताटकळत उभे राहून अक्षरशः कंटाळून गेले होते.त्यानंतर मनपा प्रशासनाने तो कार्यक्रम सरळ गुंडाळून टाकला होता.वास्तविक अनिल पवार या महाभागाने गेल्या तीन वर्षात ज्या उचापती केल्या,त्या त्यांच्या पदाला
शोभेशा नव्हत्या.या महानगरपालिकेतील भ्रष्टाचार व गैरप्रकाराने करदाते पार विटले होते.” केवळ ओरबाडणे,” हा
एकमेव कार्यक्रम गेली तीन वर्षे राबवण्यात येत होता.यापूर्वी एक ईडीच्या रडारवर आपण असल्याचे कळल्यानंतर एका अति.आयुक्ताने पळ काढला होता.
काही वर्षांपूर्वी याच अति.आयुक्तांची बदली झाली होती,पण नगरविकास खात्यातील एका अधिकाऱ्याला मॅनेज करून या महाशयाने पुन्हा वसई विरार गाठले होते.पण गेल्या वर्षी या महाशयाला आपण तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचे कळल्यानंतर त्याने पुन्हा पळ काढला.सध्या कार्यरत असलेला आणखी एक अति.आयुक्त हा देखील बदली होऊन दुसरीकडे गेला होता.तो वशिले लावून परत आला आहे.या महाभागाची कसून चौकशी झाल्यास खूप काही बाहेर येऊ शकेल.सत्ताधारी पक्षाच्या एका अनधिकृत बांधकामाला नोटीस देण्यासाठी या महाभागाने एका महिला अधिकाऱ्यावर प्रचंड दबाव टाकला होता.पण त्या महिलेने ” मी ती कारवाई करणार नाही,” असे बजावले.त्यानंतर त्या महिलेला खूप काही सोसावे लागले.कोरोना काळातही या दळभद्री अधिकाऱ्याने आपले हात चांगलेच धुवुन घेतले.या महाशयाची कसून चौकशी व्हायलाच हवी.ईडी व आयकर विभागाने त्याच्या संपत्तीची चौकशी केल्यास शेकडो कोटी रु.चा भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो.आयुक्त पवार यांच्यासोबत या अति.आयुक्ताला ताब्यात घेतल्यास या दोघांचे अनेक कारनामे उजागर होऊ
शकतात.आयुक्तांची बदली झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसात झालेली हजारो कोटी रु.च्या वसुलीची चर्चा महानगरपालिका आवारात सध्या सुरू आहे.या आयुक्तांची चौकशी सोबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी येथे होणाऱ्या चर्चेचा मागोवा घ्यायला हवा.तर बरेच काही त्यांच्या हाती लागू शकते.या दोघांना मंत्रालयातील अधिकारी व स्थानिक नगरसेवकांचीही मोलाची साथ मिळत होती.या सर्व पार्श्वभूमीवर संबधित माजी नगरसेवकांचीही चौकशी ईडीने करावी.आजवर वसई विरारकर नागरिकांनी इतका बदमाश अधिकारी कधी पाहिला नव्हता. एकाची विकेट पडली आहे, आता प्रतीक्षा आहे,दुसऱ्याची विकेट कधी पडते याची..
ईडीने या साखळीत असलेली प्रत्येक कडी तोडायला हवी.कारण वसई विरार शहर महानगरपालिका ही अधिकारी,ठेकेदार व माजी नगरसेवकांनी चराऊ कुरण
बनवले आहे.लोकांचा पैसा लुटून खाणाऱ्यांना भोगायला लागले पाहिजे,अशी प्रतिक्रिया करदाते व्यक्त करत आहेत.

