दीपक मोहिते,
” जनतेच्या पैश्याची उधळपट्टी,”
तीन इंजिनच्या निर्लज्ज सरकारने राज्य भिकेला लावायचे ठरवले आहे…
” गतिमान सरकार,” व ” महाराष्ट्र आता थांबणार नाही,” अशा दोन गोंडस टॅगलाईनचा आधार घेत देवेंद्र फडणवीस सरकारने जनतेच्या पैश्याची कशी उधळपट्टी चालवली आहे,हे ” मुख्यमंत्री लाडकी बहीण,” योजनेतील गैरव्यवहारातुन समोर आले आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी तीन इंजिन सरकारने ” मुख्यमंत्री लाडकी योजना,” धुमधडाक्यात सुरू केली.अपेक्षेप्रमाणे सरकारला त्या निवडणुकीत प्रचंड फायदा झाला.पण आता या योजनेत झालेले आर्थिक घोटाळे पाहून दस्तुरखुद्द फडणवीस देखील चक्रावून गेले आहेत.
ही योजना बहिणीसाठी लागू असताना १४ हजार २८९ लाडक्या भावांनी २१ कोटी रु.वर डल्ला मारत सरकारला चांगलीच टोपी घातली आहे.सार्वजनिक पैश्याची कशी उधळपट्टी सुरू आहे,हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.सरकारी पैसा सर्वच लुटतात,हे पाहून सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेत आपले हात धुवून घेतले.राज्यात तब्बल २ हजारहुन अधिक सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघड झाले आहे.योजना सुरू झाली तेंव्हा राज्यातील २ कोटी ३४ लाख बहिणींना पहिला लाभ देण्यात आला. त्यानंतर ही संख्या कमी- जास्त होत गेली.त्यामुळे सरकारने लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी करण्याचा निर्णय घेतला.या छाननीमध्ये सरकारची चांगलीच फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.सरकार आता या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात बोंबलत सुटले आहे.या सर्व घडामोडीवरून देवेंद्र फडणवीस यांचे सरकार किती ” गतिमान,” आहे,याचा अनुभव महाराष्ट्रातील जनतेला आला.तसेच ” महाराष्ट्र आता थांबणार नाही,” या त्यांच्या टॅगलाईनचा अनुभव देखील पावलोपावली घ्यावा लागत आहे,आणि आणखी साडेचार वर्षे घ्यावा लागणार आहे.या योजनेसाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी सरकार अनेक विभागाचा निधी महिला व बालकल्याण विभागाकडे वळवत आहे.त्यामुळे अनेक विभागाची विकासकामे ठप्प झाली आहेत.ठेकेदाराची ४६ हजार कोटीची बिले थकली आहेत.आपले बिल मिळत नसल्याच्या कारणावरून एका तरुण ठेकेदाराने आत्महत्या केली,पण या निर्लज्ज सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नाही.शेतकरी दिवसागणिक आत्महत्या करतोय,पण सरकार आपल्याच मस्तीत वावरत आहे.” सरकार कसे नसावे,” अशी स्पर्धा ठेवली तर आपले तीन इंजिनचे सरकार हमखास प्रथम क्रमांक पटकावेल.अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात ६० हजार कोटी रु.च्या पुरवण्या मागण्या सादर करते.हे प्रगतिशील,गतिमान व न थांबणाऱ्या सरकारला शोभेसे नाही.पण ज्या सरकारने ” कंबरेचे सोडून डोक्याला बांधले,” आहे.त्यांना सांगणार कोण ? पण हे जे काही चालले आहे,ते फार काळ चालणार नाही,कारण प्रत्येक गोष्टीला अंत हा ठरलेलाच असतो.

