दिपक मोहिते,
” अभूतपूर्व घटना,”
गृहकलह कधीही फायदेशीर ठरत नसते ; ठाकुरांनी देखील ठाकरे बंधूप्रमाणे विचार करावा,
पाण्यात कितीही जोराने काठी मारली तरी पाणी वेगळे होत नाही.काही काळ तरंग उठतात,पण पुन्हा ते एकजीव होत असतात.तसंच कौटुंबिक नात्यात घडत असतं.आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसेचे नेते राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.त्यांच्या या भेटीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी ” आज मला खूप आनंद झाला,” अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.त्यांच्या या भेटीमुळे राज्यात नवीन पर्वाला सुरुवात झाल्याचे मानण्यात येत आहे.

” हिंदी सक्ती,” च्या विषयावरून राज ठाकरे यांनी महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांना टाळी दिल्यानंतर या दोघा भावातील कटुता संपुष्टात आली.दोन्ही कुटुंबे व त्यांच्या पक्षात वेगळाच गोडवा निर्माण झाला.
आज राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मातोश्रीवर जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केल्यामुळे शिवसेना ( उबाठा ) व मनसे या पक्षात युती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या दोन दशकात राज्याची वाटचाल फॅसिझम दिशेने होत असल्यामुळे या दोघा भावांनी एकत्र आले पाहिजे,अशा निर्णयाप्रत राज्यातील जनता आली आहे.मुंबई शहरावर परप्रांतीयांची पकड निर्माण व्हावी,यासाठी काही शक्ती कामाला लागल्या आहेत.हा छुपा अजेंडा लक्षात घेऊन या दोघा भावांनी एकत्र आले पाहिजे,असे प्रयत्न करण्यात येत होते.त्यादृष्टीने गेली सतरा वर्षे या दोघांचे सहकारी व मित्रमंडळी प्रयत्न करत होते.यामध्ये बाळा नांदगावकर यांचे फार मोठे योगदान आहे.अनेकदा त्यांनी प्रयत्न केले,पण त्यांना यश मिळत नव्हते.दोन महिन्यांपूर्वी महायुतीच्या सरकारने ” हिंदी भाषे,” ची सक्ती करण्याचा निर्णय घेतला,व मराठी जनतेला आशेचा किरण दिसू लागला.सरकारच्या या सक्तीला,दोघा भावांनी कडाडून विरोध केला.कोणत्याही परिस्थितीत सरकारला हे करू द्यायचे नाही,असा ठाम निर्णय घेत,हे दोघे भाऊ एकत्र आले.त्यांच्या विरोधामुळे सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.या दोघा भावांनी घेतलेल्या संयुक्त सभेला मराठी जनतेने जो एकमुखी पाठिंबा दिला,तो लक्षात घेऊन महायुतीच्या सरकारचे धाबे दणाणले व सरकारने जारी केलेली अधिसूचना रद्द केली.

मराठी साम्राज्याला सरळ लढाईत पराभूत करता येत नाही,त्यामुळे त्यांच्यात फूट पाडून उद्दिष्ट साध्य करण्याचे षडयंत्र ब्रिटिश साम्राज्यापासून होत आले.या दोघांमध्ये बाह्य शक्तींनी फूट जरी टाकली नसली तरी त्यांच्यामध्ये असलेले शीतयुद्ध कायम तसेच राहावे,यासाठी बाह्यशक्ती प्रयत्न करत होत्या.त्यामध्ये त्या यशस्वी देखील झाल्या.पण सरकार मराठी अस्मितेच्या गळ्याला नख लावू पाहत आहे,हे राज यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उद्धव यांना टाळी दिली.या एका टाळीने महाराष्ट्राचे राजकारण पार बदलुन टाकले.या निमित्ताने मराठी जनतेच्या मनावर आजही आपलेच अधिराज्य आहे,याची दोघा भावाना जाणीव झाली.आजच्या त्यांच्या भेटीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.रक्ताची नाती,ही सहजासहजी तुटत नसतात,हे या सर्व घडामोडीवरून स्पष्ट झाले आहे.या दोघा भावांचे एकत्र येणे,हे महायुती सरकारला परवडणारे नाही.आगामी निवडणुकांमध्ये या दोघा भावांची युती सरकारला धोबीपछाड देईल,असा अंदाज व्यक्त होत आहे.गृहकलहाने काहीही साध्य होत नाही,उलटपक्षी शत्रूपक्षाला त्याचा फायदा होत असतो,हे इतिहासात आजवर घडलेल्या घटना,पाहता आपल्या लक्षात येते.पवार,अंबानी,मुंडे,मुलायमसिंग यादव,ठाकूर व असंख्य कुटुंबाचे खूप नुकसान झाले.गेल्या विधानसभा निवडणुकीत वसई तालुक्याचे आ.ठाकूर यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला.तीन दशकाची त्यांची सत्ता पार धुळीला मिळाली.आज आ.हितेंद्र ठाकूर व राजीव पाटील या दोघा भावांनी एकत्र येण्याची गरज आहे.सध्या ते एकत्र असल्याचे जरी भासवत असले तरी त्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत.ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे,हे दोघा भावांनी जाणले पाहिजे.आजच्या घडीला त्यांचा पक्ष पार विस्कळीत झाला आहे.एकेकाळी पालघर जिल्ह्याच्या राजकारणात असलेला त्यांचा दबदबा आता पाहायला मिळत नाही.अशा परिस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल देखील डळमळीत होत असते.आज ठाकूर यांच्या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते असेच डळमळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.आज ना उद्या शरद पवार व अजित पवार हे काका-पुतणे एकत्र आले आले तर तुम्ही-आम्ही आश्चर्य वाटून घेता कामा नये.या सर्व पार्श्वभूमीवर ठाकूर बंधूंनीही एकत्र आले पाहिजे,असे वसईकर जनतेला वाटते.इगोने काहीही साध्य होत नाही,हे आजवर अनेक घटनानी सिद्ध केले आहे.

