दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” नियती कोणाला सोडत नाही,आणि कोणाला अमरपट्टा देखील देत नाही,”…
नियती,ही सर्वश्रेष्ठ असून ती कोणालाही सोडत नाही,वेळ आली की भल्याभल्याना ती दणका देत आली आहे.ती पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला ” येथेच कर,आणि येथेच भोग,” अशा न्यायाने वागवत आली आहे.पण तरीही माणूस आपल्या वागण्यात सुधारणा करत नाही,त्यांच्यामधील अहंकार त्यांना तसे करू देत नाही.माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड,हे हल्लीच्या काळातील नियतीचा दणका मिळाल्याचे उत्तम व ताजे उदाहरण आहे.आज त्यांची झालेली केविलवाणी परिस्थिती लक्षात घेऊन अहंकाराने पालथे पडणाऱ्या प्रत्येक राजकारणी व्यक्तीने धडा शिकवायला हवा.
माजी उपराष्ट्पती जगदीप धनकड यांनी प.बंगालच्या राज्यपालपदी कार्यरत असताना संविधानाच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या होत्या.
त्यांनी त्याकाळात ममता बॅनर्जी सरकारला अक्षरशः ” सळो की पळो,” करून सोडले होते.हे उपद्व्याप करताना त्यांनी संविधानातील साऱ्या तरतुदी पायदळी तुडवल्या होत्या.त्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान निवासातील घरगडी म्हणून वावरत होते.त्यांच्या या अशा दळभद्री कर्तृत्वाचे त्यांना चांगले फळ देखील मिळाले.लायकी नसताना त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिदागी म्हणून उपराष्ट्रपतीपद बहाल केले.या पदावर विराजमान होताच त्यांनी अंगात भूत संचारल्याप्रमाणे धुमाकूळ घालणे सुरू केले.सभागृहात विरोधकांना बोलू न देणे,दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे,सदस्यांना तडकाफडकी निलंबित करणे,असे आपल्या पदाला न शोभणारे उपद्व्याप केले.राहुल गांधी यांना तडकाफडकी निवासस्थान खाली करायला लावून त्यांना बेघर केले.आज तशीच पाळी त्यांच्यावर आली आहे.पदावरून पायउतार होताच सरकारने ४८ तासात सरकारी निवासस्थान खाली करण्याची नोटीस बजावली.त्यानुसार ते आपल्या निवासस्थानातील बाडबिस्तरा गुंडाळायच्या कामाला लागले.हे सारे घडत असताना दुसरीकडे नियती मात्र गालातल्या गालात हसत होती.” येथेच केलंस,आता त्याचे भोग देखील येथेच भोग,” असेच ती कदाचित सुचवत असावी.राहुल गांधी यांच्यावर त्यांनी बेघर होण्याची पाळी आणली,पण राहुल गांधी सरकारच्या नाकावर टिच्चून शानमध्ये आपल्या निवासस्थानी परतले.चांगुलपणासमोर अनिती टिकत नसते,हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.दुसऱ्यासाठी खड्डा खणतांना खड्डा खोदणाऱ्याला खड्डा किती खोल खोदला आहे,हे पाहण्यासाठी त्याला स्वतःला उतरून पाहावे लागते.याचा अर्थ असा की तो खड्डा पहिला आपल्यासाठी होता,असे स्पष्ट होते.धनकड यांच्या बाबतीत हेच घडले.त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरताना अहंकाराला थारा देता कामा नये.सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहंकारामुळे अडचणीत आले आहेत.त्यांच्या लोकप्रियतेमध्ये वेगाने घसरण सुरू झाली आहे.” अबकी बार चारसो पार,” अशी गगनभेदी गर्जना करणाऱ्या मोदींचे विमान २४० वर आले आहे.यापूर्वी एकाही पंतप्रधानांची सोशल मीडियावर इतकी बदनामी झाली नाही,जेवढी मोदी यांची झाली व अजूनही ती सुरूच आहे.त्यामुळे पंतप्रधानांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा,अन्यथा त्यांचाही भविष्यात धनकड होण्याची शक्यता आहे.कारण नियतीने आजवर कोणाला अमरपट्टा दिलेला नाही.

