दीपक मोहिते,
मुख्यमंत्री फडणवीस मंत्रीमंडळातील चौघांना बाहेरचा रस्ता दाखवणार ; आ. स्नेहा दुबे पंडीत यांची वर्णी लागणार…
राज्य मंत्रीमंडळातील चार मंत्र्यांच्या डोक्यावर सध्या हकालपट्टीची तलवार लटकत आहे.संजय शिरसाठ,माणिकराव कोकाटे,योगेश कदम व संजय राठोड,या चार मंत्र्यांचा त्यामध्ये समावेश आहे.तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याला सध्या राज्यमंत्री नाही,त्यामुळे तीन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशी पाच पदे भरावी लागणार आहेत.त्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाची फेररचना करतील,अशी शक्यता आहे.या फेररचनेत वसई तालुक्याला राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.त्यासाठी सुशिक्षित व अभ्यासू आमदार अशी ओळख असलेल्या वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांचे नाव आघाडीवर आहे.राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.त्यांचे वडील विवेक पंडित यांचा भाजपमध्ये चांगला दबदबा असून ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे जिवलग मित्र आहेत.फडणवीस यांनी एका शासकीय समितीच्या प्रमुखपदी वर्णी लावली असून त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांवर टांगती तलवार आहे,ते संजय शिरसाठ,योगेश कदम व संजय राठोड हे तिघे शिंदे गटाचे आहेत.माणिकराव कोकाटे हे अजित पवार गटाचे आहेत.या चौघांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज आहेत.या चौघांमुळे सरकारची बदनामी होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.याविषयी त्यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांना आपल्या मंत्र्यांना योग्य ती समज द्यावी,असे सांगितले आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेही या चौघांच्या वागण्याबाबत तक्रारी गेल्या आहेत.त्यामुळे शिंदे व पवार या दोघांना त्यांनी दिल्लीत बोलावून घेतले होते व त्यांना शहा यांनी खडेबोल सूनावल्याची चर्चा मंत्रालयात होत आहे.संजय शिरसाठ यांच्या बेडरूममधील नोटांची बॅग,त्यांच्या मुलाचे हॉटेल विट्स खरेदी प्रकरण,योगेश कदम यांचे वाळू पकडणे व आईच्या नांवावर असलेला डान्स बार,माणिकराव कोकाटे यांची बेलगाम वक्तव्ये,अधिवेशन सुरू असताना भर सभागृहात त्यांचे रमी खेळणे व संजय राठोड यांचा निविदा घोटाळा,अशा एकामागोमाग घडलेल्या घटनांमुळे महायुती सरकारची चांगलीच बदनामी झाली.यापूर्वी धनंजय मुंडे यांना गुन्हेगारी प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.तसेच शिंदे गटाचे आ.संजय गायकवाड यांच्याकडून कँटीन कामगारांना झालेली जबर मारहाण,अशा विविध प्रकरणामुळे महायुती सरकारची चांगलीच बदनामी झाली.त्यामुळे देवेंद्र फडणवीस सध्या पार वैतागून गेले आहेत.ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन मंत्रिमंडळाची फेररचना करण्याच्या निर्णयाप्रत ते आले आहेत.या घडामोडी घडत असताना गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना दिल्लीला बोलावून घेतले होते.या दौऱ्यानंतर शिंदे यांनी राज्यात परतल्यानंतर सह्याद्री शासकीय विश्रामगृहात आपल्या गटाच्या मंत्र्यांची बैठक घेतली व या बैठकीत कलंकित मंत्र्यांची चांगलीच कानउघाडणी केली.शिंदे गटाचे खा.संदीपन भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या जमीन घोटाळ्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेतल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.त्यामुळे लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वसई तालुक्याला राज्यमंत्रीपद मिळेल,अशी चर्चा मंत्रालयाच्या वर्तुळात होत आहे.नगरविकास खात्याला सध्या राज्यमंत्री नाही,त्यामुळे ते पद वसई तालुक्याला मिळेल,अशी चर्चा सुरू झाली आहे.

