दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याची कारणे अद्याप गुलदस्त्यातच….
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या अचानक राजीनामा देण्यावरून देशातील राजकारण तापले असून याविषयी होणारी चर्चा शिगेला पोहोचली आहे.या राजीनाम्याच्या मागे कोणती कारणे आहेत,हे शोधणे सत्ताधारी,विरोधक व प्रसिद्धी माध्यमांना देखील शक्य झालेले नाही.त्याची नेमकी कारणे केवळ तीन व्यक्तींनाच माहीत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा व स्वतः जगदीप धनकड होय.या तिघांशिवाय इतर कोणालाही या राजिनाम्यामागची नेमकी काय कारणे आहेत ते माहीत नाही.अवघ्या चार तासात पडद्याआड जे काही घडले,ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना कळू देण्यात आले नाही.
माजी उपराष्ट्रपती धनकड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु याना पाठवलेल्या राजीनामा पत्रात प्रकृतीच्या कारणावरून मी राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे.पण ते खरे कारण नाही.कारण राजीनामा देण्यापूर्वी ते ज्या उत्साहाने काम करताना दिसले,त्यावरून हे खरं कारण नाही,स्पष्ट झाले आहे.त्यांचा राजीनामा अत्यंत तडकाफडकी घेण्यात आला.धनकड यांनी काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाला अंगावर घेतले होते.” संविधानापेक्षा संसद श्रेष्ठ,” या विषयाला त्यांनी तोंड फोडले होते,त्यांच्या या कृतीला अनेक राज्यातील न्यायालये व विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता.त्यानंतर केंद्र सरकार संविधानाची मोडतोड करण्याच्या तयारीत असल्याची देशभरात ओरड सुरू झाली होती.तेथून पंतप्रधान मोदी व त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.या सर्व घडामोडीनंतर धनकड यांची विरोधी पक्षाशी जवळीक वाढली होती.विरोधी पक्षाच्या नेत्यांना राज्यसभेच्या कामकाजात अपेक्षेपेक्षा जास्त अवधी मिळू लागला होता.लोकसभेत मात्र सभापती ओम बिर्ला विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू देत नव्हते.विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनाही भाषणासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता.राज्यसभेत मात्र नेमकी उलटी स्थिती पाहायला मिळत होती.धनकड यांचे वागणे पूर्णपणे बदलले होते. त्याचा फायदा घेत विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ले चढवले. जगदीप धनकड यांचा पूर्व इतिहास देखील फारसा चांगला नव्हता.प.बंगालचे राज्यपाल म्हणून काम करताना त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी थेट पंगा घेतला होता.लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवत राज्यसरकारच्या विरुद्ध त्यांनी कारवाया केल्या होत्या.सध्या त्यांनी मोदीना अंगावर घेतले होते.राज्यसभेतील खेळीमेळीचे वातावरण व त्यांच्याकडून विरोधकांना मिळणारे झुकते माप,अशी दोन कारणे त्यांच्या पायउतारामागे असावीत,असा अंदाज सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहेत.ही कारणे जरी असली तरी तडकाफडकी राजीनामा घेण्यापूर्वी पडद्यामागे चार तासात झालेल्या हालचाली लक्षात घेता या घडामोडीमागे आणखी काही कारणे असावीत.त्यांचे राजीनामपत्र हे देखील उपराष्ट्रपती भवनात तयार झाले नाही,तर ते पीएमओ कार्यालयात तयार करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.वास्तविक धनकड हे दुसऱ्या दिवशी आपल्या पदाचा राजीनामा देणार होते.पण त्यांना अवघ्या चार तासात आपला गाशा गुंडाळावा लागला.त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामागे फार मोठे कारण असावे,पण याविषयी कुठेही चर्चा होत नसल्यामुळे माध्यमे देखील सध्या संभ्रमावस्थेत सापडली आहेत.

