दीपक मोहिते,
नवनिर्वाचित आमदारांचे प्रगती पुस्तक,
वसईच्या आ.स्नेहा दुबे – पंडित अव्वल क्रमांकावर…
नवनिर्वाचित आमदारांच्या कारकिर्दीला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत.या सहा महिन्यांच्या काळात आमदारांनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने किती प्रयत्न केले,याविषयीचा लेखा – जोगा,त्यांना मतदान केलेल्या मतदारांसमोर मांडायला हवा.त्यासाठी हा लेखप्रपंच होय.आपला वसई तालुका वसई, नालासोपारा व बोईसर अशा तीन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे.या तीनही मतदारसंघात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे सारे प्रश्न एकमेकांपासून भिन्न स्वरूपाचे आहेत.मात्र हे सारे प्रश्न येथील मतदारांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत.त्यामुळे आ.स्नेहा दुबे-पंडित,आ.राजन नाईक व आ.विलास तरे,या तिघांच्या एकूण कामकाजाचा आढावा घेणे,क्रमप्राप्त होते.तो आढावा आम्ही नुकताच घेतला.या सर्व्हेक्षणानंतर जे प्रगतीपत्रक आम्ही तयार केले,त्यामध्ये वसईच्या आ.स्नेहा दुबे – पंडित या अव्वल क्रमांकावर आल्या आहेत.त्यांना त्यांच्या प्रगती पुस्तकात १० पैकी ०८ गुण मिळाले आहेत,तर आ. राजन नाईक हे ०६ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर स्थिरावले आहेत.बोईसरचे आ.विलास तरे याना केवळ ०४ गुण मिळाले आहेत.ते अनुत्तीर्ण झाले आहेत.तर राजन नाईक हे काठावर उत्तीर्ण झाले आहेत.
आपल्या मतदारसंघातील विकासकामे,समस्या व मतदारांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी,याची जाण व त्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न,अशा तीन स्तरावर हे सर्वेक्षण करण्यात आले.श्रमजीवी संघटनेत काम केलेल्या आ.दुबे यांनी कारकिर्दीला सुरुवात करताना संवेदनशील प्रलंबित विकासकामांचा अभ्यास केला.याकामी त्यांना आपले वडील विवेक पंडित,संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ मिळाली.विधानसभा निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढाईत त्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यासारख्या दिग्गज आमदारांचा पराभव केल्यामुळे त्यांचा विश्वास दुणावला व त्यांनी वसईकरांची सहानुभूती देखील मिळवली.त्यांच्या उमेदवारीमुळे त्या निवडणुकीत विजय पाटील यांचे आमदार होण्याच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला तर ठाकूर यांनाही चांगलाच धक्का बसला.राजकारणात कधीही मतदारांना कायम गृहीत धरून राजकारण करणे शक्य नसते,हेच खरे असते.दोन दिग्गजांचा पराभव करत व पहिल्याच प्रयत्नात आमदार झालेल्या स्नेहा दुबे – पंडित यांच्याकडून लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत.त्या पूर्ण करण्यासाठी त्या गेल्या सहा महिन्यांपासून कठोर परिश्रम घेत आहेत.
नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे राजन नाईक यांना यापूर्वी नगराध्यक्ष व आमदारपदाने हुलकावणी दिली होती.पण या निवडणुकीत मतदारसंघाच्या विविध समस्या व अडचणीसंदर्भात तत्कालीन आ.क्षितिज ठाकूर यांचे झालेले दुर्लक्ष,हे नाईक यांच्या पथ्यावर पडले.वास्तविक अनेक निवडणुका हरणारे नाईक यांना झालेले मतदान हे क्षितिज ठाकूर यांच्याविषयी असलेली नाराजी व्यक्त करणारी होती.ती ईव्हीएम मशीनमधून व्यक्त झाली.त्याला आपण नकारात्मक मतदान,असे म्हणू शकतो.गेल्या सहा महिन्यात काही किरकोळ अपवाद वगळता नाईक यांचा बहुतांश वेळ कार्यकर्त्यांच्या भेटी व सत्कार घेणे,यातच निघून गेला.वास्तविक वसई तालुका लोकसंख्येच्या बाबतीत कोकणात क्रमांकावर आहे. तालुक्यात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्यामध्ये पाणी, आरोग्य व वैद्यकीय सेवा,स्वच्छता,शिक्षण, वाढती अनधिकृत बांधकामे,वाहतूककोंडी, अशा अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत.सहा महिन्यांपूर्वी बदल झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या,पण नाईक,हे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत.या सगळ्यातून त्याना बाहेर पडावे लागणार आहे,अन्यथा लोकांच्या नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो.
तिसरे आ.विलास तरे यांनाही गेल्या सहा महिन्यात फारसे काही करता आलेले नाही.यापूर्वी दोनदा आमदार म्हणून ते निवडून आले होते.त्यांना आपल्या मतदारसंघातील प्रश्न,समस्या तसेच विकासाचे प्रलंबित प्रश्न यांची चांगली जाण असताना त्यांच्याकडून होत असलेले दुर्लक्ष त्यांना त्रासदायक ठरणारे आहे.अगोदरच्या आमदारांच्या पाच वर्षांच्या निष्क्रियतेचा तुम्हाला या निवडणुकीत फायदा झाला,तो टिकवून ठेवणे तुमच्या हातात आहे.ते जर तुम्हाला जमत नसेल,तर ते तुमचे दुर्देवच म्हणावे लागेल.गेल्या सहा महिन्यात तुमच्या निष्क्रीयतेमुळे तुम्हाला सर्वात कमी गुण मिळाले आहेत.त्यामुळे उत्तीर्ण होता आले नाही.हा ठपका दूर व्हावा,असे जर तुम्हाला वाटत असेल तर आतापासून कामाला लागा.आपण निष्क्रीय राहिलात तर भविष्यात आपलीही गत गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या आमदारासारखी होईल,हे लक्षात घ्या व वेळीच कामाला लागा.

