दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
लोकप्रतिनिधी म्हणून गांभीर्याने विचार करा…
गेल्या रवि. वसई येथे आ. स्नेहा दुबे-पंडीत यांच्या प्रयत्नातून स्वयं पुनर्विकास योजने संदर्भात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला वसईकर नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.पुनर्विकास म्हणजे नक्की काय व या योजनेचा सर्वासामान्य लोकांना कसा फायदा होतो,या दोन महत्वाच्या विषयावर नागरिकांना अवगत करण्यात आले.त्यामुळे भविष्यात या योजनेचे फायदे सर्वसामान्यजनांना होऊ शकतो.कारण वसई विरार भागातील जमिनीचा विकास पूर्ण होत आला आहे.त्यामुळे बिल्डर लॉबीची नजर जुन्या इमारतीवर पडू लागली आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली अनेक बिल्डर्सनी अनेक गृहनिर्माण संस्थांची घोर फसवणूक केली आहे.ती तशीच सुरु राहता कामा नये, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आ. स्नेहा दुबे- पंडीत यांनी पुढाकार घेतला.त्यांनी आयोजित केलेल्या शिबिराला लोकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता,ही यशस्वी होण्याची शक्यता आहे.मात्र त्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यामध्ये काम
करणारे पदाधिकारी मात्र प्रामाणिक असायला हवेत. या व्यतिरिक्त वसई- नालासोपारा शहरात विकासाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.ते सोडवण्याच्या दृष्टीने दोन्ही आमदारांनी स्वतःला झोकून दिले पाहिजे.

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या तिसरी सार्वत्रिक निवडणुक तोंडावर आली आहे.या विभागाचे सुज्ञ नागरिक गेली अनेक वर्षे डोळ्यावर झापडे ओढून बसले आहेत.निदान या निवडणुकीत तरी त्यांनी साखरझोपेतून जागे झाले पाहिजे,अन्यथा तुमच्या आमच्या पोराबाळांचे भवितव्य अंधारात सापडणार आहे.आपल्या भागातील अनेक नामचिन बिल्डर्स व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या निसर्गरम्य व हरित वसईचे अक्षरशः लचके तोडले.या विनाशाला हे दोघे जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच मतदार म्हणून आपणही जबाबदार आहोत. या लेखात आठ ते दहा एक्सक्लूसिव्ह फोटो तसेच सोबत प्रश्न विचारण्यात आले आहेत.या प्रश्नांची तुमच्याकडून उत्तरे मिळावीत, अशी अपेक्षा नाही.पण हे फोटो व छायाचित्रे तुम्ही नजरेखालून घालावीत,अशी मात्र नक्कीच अपेक्षा आहे.


१ – आजच्या घडीला पंधरा लाख लोकसंख्येच्या चार शहरातील नागरिकांना प्यायला पुरेसे पाणी नाही,
२ – चालायला धड रस्ते नाहीत,पदपथाचा फेरीवाल्यानी कब्जा घेतला आहे.पार्किंग नसल्यामुळे भररस्त्यावर वाहने उभी करण्यात येत असतात. अनधिकृत रीक्षांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे वाहतूककोंडीच्या प्रश्नाने अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केले आहे.
३ – जुनाट वीजयंत्रणेमुळे वीजपुरवठ्याचे तीनतेरा वाजले आहेत.या यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे आजवर नागरिकांचे बळी गेले.नागरी सुविधा उपलब्ध नसताना राज्यसरकारने सत्तर दशकात या तालुक्यातील जमिनी नागरिकरणासाठी मोकळ्या केल्या व अल्पावधित निसर्गरम्य वसईचे कॉक्रीट जंगलात रूपांतर झाले.

४ – निसर्गरम्य वसईला धारावी बनवण्याचे पाप कोणाचे ? हा प्रश्न देखील वर्षानुवर्षे अनुत्तरितच आहे.अनधिकृत बांधकामाचे जंगल उभारण्याला नगरसेवक,मनपा अधिकारी,अनधिकृत बांधकाम व्यवसायिक हे सारेच जबाबदार आहेत.
५ – १५ लाख लोकसंख्येच्या या उपप्रदेशाला डम्पिंग ग्राऊंड नाही,वसई विरार शहर महानगरपालिका हजारो कोटी रु. च्या भ्रष्टाचारात आकंठ बुडाली आहे.लोकप्रतिनिधी, मनपा अधिकारी,ठेकेदार या सर्वानी या महानगरपालिकेचे लचके तोडले,त्यामुळे सर्वप्रथम महानगरपालिकेचे पैश्याला चटावलेले भ्रष्ट ठेकेदारांची हकालपट्टी करा, तरच कोसळलेला कारभार पुन्हा उभा राहू शकतो.
६ – नालेसफाईची बोगस कामे, मनपाच्या प्रत्येक विभागात करदात्यांच्या पैश्याची होत असलेली लूट,बाजारकर, बोगस गटारांची बांधकामे, तलावाचे सुशोभीकरण आदी विकासकामे या मंडळीसाठी चराऊ कुरणे बनली आहेत.याची पाळेमुळे खणून काढा, भ्रष्टाचाराची ही साखळी नेस्तनाबूत करण्याचे ऐतिहासिक काम तुमच्याकडून होऊ द्या.ते जर झाले तर या उपविभागातील १५ लाख लोकांचे आशीर्वाद तूम्हाला मिळतील.
या व्यतिरिक्त विकासाचे अनेक प्रश्न व समस्या आजही ” जैसे थे, ” अवस्थेत आहेत.या निवडणुकीत तूम्हा – आम्हाला प्रेक्षकाची भूमिका घेऊन चालणारे नाही.गांभीर्याने विचार करा,कारण या परिस्थितीला आपण सारे जबाबदार आहोत व आपल्या कुटुंबियांना भविष्यात अनेक अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. परिसराचे जनसेवक या नात्याने करदाते तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत.स्वच्छ कारभार व सर्वसामान्य जनतेला न्याय अशा दोन वचने विधानसभा निवडणुकीच्यावेळी तुम्ही उभयतांनी दिली होती, त्याचा विसर पडू देऊ नका,एवढच तुम्हाला सांगणे आहे.

