दीपक मोहिते,
महाविकास आघाडीसमवेत बविआने युती केल्यास फटका बसण्याची शक्यता…
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका बहुजन विकास आघाडी व महाविकास आघाडी एकत्रितपणे लढतील,असे संकेत मिळत आहेत.गेल्या काही दिवसापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील व माजी आ.हितेंद्र ठाकूर यांची जवळीक वाढत चालल्यामुळे आगामी निवडणुका आ.ठाकूर महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवतील,अशा चर्चाना उधाण आले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजय पाटील यांना वसई मधून लक्षणीय मते मिळाली होती.तर महायुतीच्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांना केवळ अडीच ते तीन हजार मताचे मताधिक्य मिळाले होते.विजय पाटील व हितेंद्र ठाकूर यांना मिळालेल्या मतांची बेरीज ही स्नेहा दुबे यांना मिळालेल्या एकूण मतापेक्षा कैक पटीने अधिक होती.ती स्थिती लक्षात घेऊन पाटील व ठाकूर यांची जवळीक वाढली आहे.भाजपला रोखण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे,असे या दोघांना वाटत आहे.
पण आजवर वसईतील मतदार लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी वेगळा विचार करत आले.मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदारांनी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीचा निकष लावत बहुजन विकास आघाडीला धोबीपछाड दिला.यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीतही येथील मतदार भाजपकडेच वळतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.हा अंदाज गृहीत धरून हितेंद्र ठाकूर हे महाविकास आघाडीचे बोट धरतील,अशी शक्यता आहे.पण,जागावाटपामध्ये
काँग्रेस,शिवसेना ( उबाठा ) व बहुजन विकास आघाडीमध्ये समझोता होण्याची शक्यता कमी आहे.२०१५ साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने एकूण ११५ जागांपैकी १०५ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व राखले होते.त्यामुळे हितेंद्र ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) याना जागा देताना त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याची शक्यता अधिक आहे.तसेच मागच्या दोन निवडणुकांमध्ये झालेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस यंदा जागावाटपाच्या वेळी अधिक सावधगिरी बाळगेल.त्यामुळे यांच्यामध्ये युती झाली तरी जागावाटपाच्या वेळी खडाजंगी होण्याची दाट शक्यता आहे.बहुजन विकास आघाडी,आपल्या सिटिंग जागाबाबत कॉम्प्रोमाईस करणार नाही.अशात जर बंडखोरी झाल्यास ती भाजप व शिंदे गटाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.या बंडखोरीचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे.

