दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महायुती सरकारची लोकप्रियता उतरणीला…
राज्य मंत्रीमंडळाची सध्याची अवस्था पाहिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किमान चार ते पाच मंत्र्यांच्या हाती नारळ द्यावा लागणार आहे. मंत्रिमंडळाची सध्याची अवस्था ही ” जोकरांची सर्कस,” अशी झाली आहे.या सरकारमधील लफडेबाज मंत्र्यांची एकामागोमाग लफडी बाहेर येत आहेत.त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते पार वैतागून गेले आहेत.
कँटीन मॅनेजरला मारहाण करणारे आ.संजय गायकवाड,घोटाळेबाज मंत्री संजय शिरसाठ,घरात होमहवन करणारे व सभागृहात बाजूच्या आमदाराकडून तंबाखू घेऊन स्वतःच्या तोंडात कोंबणारे भरत गोगावले,सभागृहात मोबाईलवर रमी खेळणारे माणिकराव कोकाटे,दारूच्या आर्थिक घोटाळ्यात आकंठ बुडालेले खा.संदीपन भुमरे व आपल्या विभागाच्या निविदा घोटाळ्यात अडकलेले,संजय राठोड या सर्वांच्या उपदव्यापाने देवेंद्र फडणवीस पार त्रासून गेले आहेत.सदर बाब केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कानावर गेली असून त्यांनी महायुतीच्या तीन नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत.त्यामुळे मंत्रिमंडळाच्या फेररचनेत शिंदे व अजित पवार गटाच्या अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे.छ.संभाजीनगरमधील हॉटेल/एमआयडीसी मधील प्लॉट खरेदी व खा. संदीपन भुमरे यांचा मद्यघोटाळा,त्यांच्या पी.ए.च्या नावावर हैद्राबाद येथे उघडकीस आलेला शेकडो कोटीचा जमीन घोटाळा, त्यामुळे दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते फडणवीस यांच्यावर नाराज झाले आहेत.अमित शहा यांनी अधिवेशन चालू असताना अचानक एकनाथ शिंदे यांना दिल्लीला बोलावून घेतले व त्यांना चांगलेच फैलावर घेतले.या सर्व घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्व मंत्री व आमदाराना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.ते आपल्या भाषणात म्हणाले,” सभागृहाबाहेर आपल्या विषयी लोक काय बोलतात ते लक्षात घ्या.” हे आमदार माजले आहेत,” असे लोकांचे म्हणणे आहे.त्यामुळे नीट वागा,आपल्या वागण्यात सुधारणा करा.तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी देखील आपले मंत्री, खासदार व आमदारांची संयुक्त बैठक घेऊन सर्वाना योग्य त्या भाषेत समज दिली होती.या सर्व घडामोडीमुळे महायुती सरकारची लोकप्रियता आता उतरणीला लागल्याचे दिसून आले आहे.

