दीपक मोहिते,
” लाज वाटते,”
विधानसभेचा दर्जा दिवसेंदीवस खालावत चाललाय….
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे काल सुप वाजले.यंदाचे हे अधिवेशन पंधरवडाभर चालले,या अधिवेशनात फारसा गोंधळ न झाल्यामुळे कामकाज तहकूब करण्याची पाळी विधानसभा अध्यक्षावर आली नाही.ही समाधानाची बाब असली तरी प्रत्यक्षात जनहिताची कामे किती झाली,याविषयीचा लेखा – जोगा मांडायलाच हवा.या अधिवेशनात आरोप – प्रत्यारोप,अर्वाच्च भाषेत टीका – टिप्पणी,टोमणे व अपशब्दांचा सर्रास वापर,असे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळाले.
गेल्या काही वर्षात जवळपास प्रत्येक अधिवेशनात आमदारांचा आक्रस्ताळेपणा,खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे,एकमेकांच्या अंगावर धावून जाणे,असे प्रकार वाढीला लागले आहेत.पूर्वी सभागृहात अनेक दिग्गज नेत्यांची अभ्यासपूर्ण
भाषणे होत असत.सत्ताधारी व विरोधक या दोघांमध्ये वादविवाद व लोकांच्या प्रश्नावर आमने सामने सामना होत असत,पण त्यामध्ये कधीही कटुता निर्माण झाल्याचे अनुभवायला मिळाले नाही.यशवंतराव चव्हाण,कृष्णराव धुळूप,केशवराव धोंडगे,मृणाल गोरे, वसंतदादा पाटील,वसंतराव नाईक,राजरामबापू पाटील,स.का.पाटील,बॅ.अ. र.अंतुले,शंकरराव चव्हाण,स.गो.वर्टी,
गणपतराव देशमुख,अशा दिग्गज नेत्यानी जनतेच्या प्रश्नावर सभागृहात अभ्यासपूर्ण भाषणे. केली.मृणाल गोरे,केशवराव धोंडगे व कृष्णराव धुळूप यांच्या तडाखेबाज भाषणामुळे त्याकाळी सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी होत असे.मात्र त्यांच्या भाषणात कधीही किंतु परंतु नसायचा,आणि ही मंडळी कधीही हातचं राखून टीका करत नसत.त्यांची सारी भाषणे ही जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर असायची.त्यामध्ये कधीही शत्रुत्व व कटुता नव्हती.पण आज परिस्थिती बदलली आहे.एकाही आमदाराला जनतेच्या प्रश्नाशी कसलेच देणे – घेणे नाही.हाणामाऱ्या,टोमणे मारणे,एकमेकांच्या अंगावर धावून जाणे,उणी – दुणी काढणे,एकमेकांच्या वैयक्तिक जीवनात डोकावणे,कुटुंबियांना लक्ष्य करणे,असे प्रकार सर्रास वाढीला लागले आहेत.अशा प्रकारामुळे
आपली लोकशाही व संसदीय प्रणाली यांचे सध्या धिंडवडे निघत आहेत.अधिवेशनामध्ये हल्ली २५ % ही कामकाज होत नाही.शेकडो कोटी रु.अधिवेशनावर खर्च होत असतात,मात्र फलित शून्य..हे अत्यंत घातक आहे,पण या लोकप्रतिनिधींना सांगणार कोण ? एकंदरीत ही परिस्थिती लक्षात घेता,विधानसभेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे.विधानसभा आवारात जर गँगवार होत असेल तर आपण याला लोकशाहीचे मंदिर म्हणायचं का ?

