दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” देवाभाऊंनी महाराष्ट्राचा बिहार केला….”
काल महाराष्ट्राच्या विधिमंडळ आवारात जे काही घडलं ते पाहून प्रत्येक मराठी माणसाची मान शरमेने खाली गेली आहे.आपण महाराष्ट्रात राहतो की बिहार/उत्तर प्रदेशात ? असा प्रश्न आपल्या मनात उभा राहतो.विरोधी पक्षाला नामोहरम करण्यासाठी या देवभाऊनी गेल्या पाच ते सहा वर्षांत जे गुंड पोसले,जे हवशे नवशे गोळा केले.त्यामुळे महाराष्ट्र राज्य आज रसातळाला गेले आहे.देवाभाऊंच्या राज्यात कोणी सुरक्षित नाही.या अशा स्थितीमुळे पुरोगामी राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचा चेहरा काळवंडला गेला आहे.
पवार कुटुंबाच्या विरोधात कायम गरळ ओकणारा आ.गोपीचंद पडळकर याने सध्या कंबरेचे सोडून डोक्याला बांधले आहे.शरद पवार व सुप्रिया पवार यांच्याबाबतीत अश्लाध्य भाषेत टीकाटिप्पणी करणारा गोपीचंद पडळकर आणि आ.जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून नळावरील भांडण व वादावादी सुरू आहे.काल त्याचे पर्यवसान त्यांच्या समर्थकाच्या हाणामारीत झाले.विधानसभेच्या लॉबीमध्ये दोन्ही गटाच्या समर्थकांनी एकमेकांवर जोरदार हल्ले चढवले.त्यांना इतरांनी सोडवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.पण अशा पद्धतीने लोकशाहीच्या मंदिरात गुंडगिरी होत असेल तर कालांतराने या मंदिराकडे सर्वसामान्य नागरिक फिरकणार देखील नाहीत.आपल्या राज्यात गेल्या पाच वर्षात गुन्हेगारीने कळस गाठला आहे.त्यावर आता नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे.एकेकाळी कायद्याचे राज्य अशी ओळख असलेले आपले राज्य देवभाऊनी पार नासवून टाकले.बदलापूर बलात्कार,संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या,सूर्यवंशी पोलीस कोठडीत हत्या,मुंडे यांची हत्या,अशा एक ना अनेक घटना गेल्या सहा महिन्यात घडल्या.त्यामुळे राज्यात सरकार आहे की नाही ? असा प्रश्न रयतेच्या मनात उभा ठाकला आहे.देवाभाऊंच्या या राज्यात आमदार देखील हाणामाऱ्या करू लागले आहेत.या लोकांना आपले लोकप्रतिनिधी बोलायला आता लाज वाटायला लागली आहे.पोलीस आता राजकारणी मंडळींचे वेठबिगार म्हणून दावणीला बांधले गेले आहेत.राज्य सरकारचे गृहखाते असून नसल्यासारखे आहे.कोण मशिदीत घुसून मारण्याची भाषा करतो तर कोणी लुंगी-बनियन घालून थेट कँटीनमध्ये कँटीन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करतो.त्यानंतर माध्यमांसमोर येऊन निर्लज्जपणे म्हणतो,मी यापुढेही अशीच मारहाण करणार,हे चित्र अत्यंत निराशाजनक असेच आहे.बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी शिंदे याचाएन्काऊंटर केल्यानंतर,” करून दाखवले,” अशा आशयाचे देवाभाऊंच्या हातात रिव्हॉल्व्हर असलेली छायाचित्रे असलेले फलक लागतात.पण त्या एन्काऊंटर प्रकरणी न्यायालयाने देवाभाऊंच्या सरकारला चांगलेच फटकारले होते,पण तरीही देवभाऊच्या अंधभक्ताचा उन्माद संपुष्टात आला नाही.उलट तो अधिक वाढत चालला आहे.काल विधानसभेच्या आवारात झालेल्या हाणामारीच्या प्रकरणाने राज्यातील गुन्हेगारी कोणत्या थराला पोहोचली आहे,हे स्पष्ट करणारे आहे.ही सर्व परिस्थिती लक्षात घेता,देवभाऊचे सरकार हे राज्य चालवायला नालायक ठरले आहे,असे म्हणता येईल.

