दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,”
” सुप्त पण जीवघेणी स्पर्धा,”
येत्या १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत.भाजपच्या नियमानुसार त्यांनी सेवानिवृत्त व्हावे,यासाठी दबाव वाढत चालला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत,या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुप्त संघर्ष सुरू झाला आहे.मोदी व शहा हे दोघेही सध्या संघाचे जोखड झुगारून देशाचा कारभार करत असल्यामुळे संघ व भाजपमध्ये असलेली दरी सतत रुंदावत चालली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र २०२९ मध्ये निवडणूक लढवण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत.संघाला मात्र देशाचे नेतृत्व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपवले पाहिजे,असे वाटत आहे.संघाच्या या हालचाली पाहून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काही महिन्यांपूर्वी संघाला आम्ही मानत नसल्याचे सांगून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.मात्र गेल्या आठवड्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका समारंभात प्रत्येक राजकीय नेत्याने वयाची पंच्याहत्तरी गाठली,की थांबायला हवे,असे सांगत नव्या चर्चेला तोंड फोडले.
या सर्व घडामोडी घडत असताना माजी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांना एका मुलाखतीमध्ये आजच्या घडीला देशात सक्षम नेता कोण ? असा प्रश्न विचारण्यात आला,त्या प्रश्नाला उत्तर देताना,त्यानी राहुल गांधी,असे सांगितले.त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.गांधी कुटुंबाचा विरोध अंगात ठासून भरलेला असताना राहुल गांधीबद्दल असे वक्तव्य त्यांनी केले,त्यामुळे राजकीय विश्लेषकही अचंबित झाले.गेल्या वर्षी अमेथी मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी १ लाख ६६ हजार अशा प्रचंड मतानी पराभूत केले,त्यामुळे सध्या त्या अडगळीत पडल्या आहेत.त्यांचा पराभव भाजपमधील एका गटाने घडवून आणल्याची चर्चा अमेथी येथे गेले वर्षभर सुरू आहे.आपल्याला पक्षात कोणी विचारत नाही,पाहून स्मृती इराणी या आता पुन्हा सिनेसृष्टीमध्ये परतत आहेत.एकेकाळी संसदेत विरोधकांचे होणारे हल्ले यशस्वीपणे परतणाऱ्या स्मृती इराणी बाजूला का पडल्या ? याचा शोध घेण्याची गरज आहे.२०११ ते २०२४ पर्यंत त्या संसदेच्या सदस्य होत्या.२०१९ पर्यंत त्या राज्यसभा सदस्य होत्या.२०१९ साली त्यांनी अमेथी मतदारसंघात राहुल गांधी यांचा पराभव केला व त्यांचा राष्ट्रीय स्तरावर उदय झाला.भाजपच्या राष्ट्रीय सचिव,भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष,केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री,केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री त्यानंतर महिला व बालविकासमंत्री असे एका मागोमाग अनेक पदावर यशस्वीपणे काम केले.अभ्यासू,आक्रमक स्वभाव,अनेक भाषांवर प्रभुत्व व ओघवते वक्तृत्व अशा गुणांमुळे संसदीय कामकाजात त्या उठून दिसत होत्या.संसदेत विरोधकांचे हल्ले परतवण्यात स्मृती इराणी, या नेहमीच आघाडीवर असायच्या.त्यांचे हे गुणच अखेर त्यांच्या राजकीय जीवनावर उठले व त्याना कटकारस्थान करून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पाडण्यात आले.त्यानंतर गेले वर्षभर त्या विजनवासात गेल्या.वास्तविक प्रभावी नेता निवडणुकीत पराभूत झाला की त्याला प्रत्येक राजकीय पक्ष राज्यसभेवर पाठवतात,पण भाजपने त्यांना जाणीवपूर्वक डावलले.पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत अमित शहा,नितीन गडकरी,त्यानंतर स्मृती इराणी,या देखील सामील होतील,अशा भितीमुळे त्यांच्या विरोधात कटकारस्थाने करून त्यांना पाडण्यात आले.माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही अशीच कटकारस्थाने करून.गोव्यात पाठवण्यात आले होते.तत्पूर्वी यशवंत सिन्हा,अरुण शौरी व अन्य ज्येष्ठ नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.वास्तविक आज भाजपकडे सुषमा स्वराज यांच्यानंतर स्मृती इराणी हा एकमेव आक्रमक व अभ्यासू महिला चेहरा होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन मंत्रिमंडळात असल्या तरी त्या असुन नसल्यासारख्याच आहेत.अशा स्थितीत भाजपने स्मृती इराणी यांच्या मुसक्या ज्या पद्धतीने आवळल्या,ते पाहता आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्यात ही दुकली यशस्वी ठरली आहे.मात्र या सर्व घडामोडीमुळे देशभरातील महिलांमध्ये चुकीचे संकेत गेले आहेत.त्याचे दुष्परिणाम भाजपला २०२९ च्या निवडणुकीत भोगावे लागणार आहेत.

