दीपक मोहिते,
समाधानाची बाब,
वसई-विरारच्या प्रलंबित विकासकामाबाबत सरकार सकारात्मक,
भाजपच्या दोन्ही आमदारांनी आपल्या वसई व नालासोपारा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा सातत्याने पाठपुरावा चालवला आहे.नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात या दोघांनी तारांकित व लक्षवेधी,अशी आयुधे वापरत तालुक्याच्या अनेक समस्यांकडे सरकारचे लक्ष
वेधले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तोंडावर ज्या वेगाने या दोघांनी प्रलंबित विकासकामांचा पाठपुरावा चालवला आहे,त्याचा त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत फायदा होऊ शकतो.काल आ.स्नेहा दुबे पंडित,आ.राजन नाईक व खा.डॉ.हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन प्रलंबित विकासकामासंदर्भात सविस्तर चर्चा केली.सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत जि.प.च्या ११६ प्राथमिक शाळा,३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १२ उपकेंद्रे,
महानगरपालिकेकडे हस्तांतर करणे,
महानगरपालिका क्षेत्रातील ७ उड्डाणपूल व रस्त्याची कामे,अनेक वर्षे मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे प्रस्तावित आहेत,ती त्वरेने सुरू करावीत,तसेच चार शहरांना जोडणारा रिंग रोड मार्गात अनेक बांधकामे झाली असून त्या रस्त्याचे पुन्हा सर्वेक्षणाची गरज असल्याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले, एसटी महामंडळाच्या जमिनीचा पिपीपी ( पब्लिक, प्रायव्हेट व पार्टनरशिप ) तत्वावर विकास करून शहरी भागात वाहनतळ उभारणे, ज्या इमारतींना अद्याप ओसी देण्यात आली नाहीत,ती त्वरित देण्यात यावी,जेणेकरून त्याना नळ कनेक्शन मिळू शकतील.त्यासाठी वसई विरार क्षेत्रात अभय योजना लागू करणे,इ.ज्वलंत प्रश्न उभयतांनी मुख्यमंत्र्यासमोर मांडले.आमदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या मागण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे वसई-विरारच्या नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येतील,अशी अपेक्षा वसईकर नागरिक व्यक्त करत आहेत.

