दीपक मोहिते,
पुनर्विकास मार्गदर्शन शिबीर ; जनजागृतीसाठी एक चांगला उपक्रम,
वसई विरार भागात पुनर्विकासाचे आता वारे वाहू लागले आहेत,याविषयी जनतेला माहिती मिळावी,यासाठी पुनर्विकास समितीतर्फे ” स्वयं:पुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.वसईत होणाऱ्या या मार्गदर्शन शिबिराच्या निमंत्रकपदी वसईच्या आ.स्नेहा दुबे या आहेत.
वसई व नालासोपारा या दोन शहरात गेल्या काही वर्षात प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.नालासोपारा शहरातील ४१ अनधिकृत इमारतीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.समाजकंटकांनी आरक्षित जमिनीवर या इमारती उभारल्या व त्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महानगरपालिकेने दोन महिन्यापूर्वी जमिनदोस्त केल्या.त्यामुळे सुमारे ४०० कुटुंबे बेघर झाली आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर आ.राजन नाईक व आ.स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रकरणी पुढाकार घेतला आहे.अशा सर्व परिस्थितीत अनेक बिल्डर्स आता पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून आपले उखळ पांढरे करण्याच्या प्रयत्नात आहेत.नालासोपारा शहरात एका बिल्डरने पुनर्विकास योजनेत एका इमारतीमधील रहिवाशांची चांगलीच फसगत केली आहे.अवघ्या सहा महिन्यात उभारलेल्या त्या इमारतीमधील सदनिकांच्या भिंतीला तडे गेले असुन लाद्या देखील उखडल्या गेल्या आहेत.त्यासाठी अशा शिबिराची नितांत आवश्यकता आहे.सर्वसामान्य लोक सदनिका खरेदी करताना सातबारा,भोगवटापत्र,जमीन मालक व बिल्डर करारनामा, विकासकर भरणा,बांधकाम परवानगी व जमीन बिनशेती ( एन.ए.) याविषयी माहिती घेत नाहीत,त्यामुळे वसई विरार परिसरात आजवर लाखो कुटुंबाची फसवणूक झाली.आता वसई -विरार शहरातील जमिनी संपुष्ठात आल्यामुळे या समाजकंटकाची वक्रदृष्टी पुनर्विकास योजनेवर पडू लागली आहे.त्यामुळे वसईच्या पुनर्विकास समितीने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे.या माध्यमातून याविषयी लोकांमध्ये चांगली जनजागृती होऊ शकेल.त्यामुळे अशी शिबीरे अनेक ठिकाणी व्हायला हवीत.या शिबिरात आयोजकांनी खालील बाबीवर उपस्थित शिबिरार्थीना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये किमान ५१ तर झोपडपट्टी पुनर्विकासासाठी ७० % सदस्यांची संमती आवश्यक आहे.
तसेच अनेक बिल्डर्स लोकांना इमारती बांधताना किती फुटाच्या बांधकामाला परवानगी संबंधित विभागाकडून मिळाली आहे, याविषयी खातरजमा करावी. कारण आपल्या वसई तालुक्यात अनेक बिल्डर्स हे मिळालेल्या बांधकाम परवानग्यापेक्षा अधिक बांधकामे करत असतात.
पुनर्विकास करणारे बिल्डर्स इमारतीमधील रहिवाश्याना कोणत्या सोयी-सुविधा देतात, यावर बारकाईने लक्ष ठेवणे, बिल्डरला या व्यवहारात किती सदनिका मिळतात व त्याबदल्यात तो रहिवाश्याच्या सदनिकाच्या क्षेत्रफळात किती फूट वाढ करतो,गार्डन व पार्किंगची व्यवस्था,
तसेच बिल्डर हा संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना आमिषे दाखवून आपल्या गळाला लावत असतात.त्यामुळे या दोघांच्या कारभारावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
या सर्व आवश्यक बाबीवर या शिबिरात मार्गदर्शन होणे आवश्यक आहे,त्यासाठी या क्षेत्रात निष्णात असलेल्या आर्किटेक्टसना समितीने पाचारण करायला हवे.

