दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
एकनाथ शिंदे व अजित पवार,या दोघांना खूप काही सहन करावे लागणार….
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर त्यांना एकनाथ शिंदे व अजित पवार गटाची फारशी आता गरज उरलेली नाही.त्यामुळे या दोन्ही गटाला दिल्ली दरबारी मिळणारा मानमरातब सध्या उतरणीला लागला आहे.आपल्याला हल्ली सतत डावलण्यात येत असल्यामुळे एकनाथ शिंदे हे आपल्या गावी शेतीत रमत असतात तर अजित पवार हे मुकाट्याने ” तोंड बांधून,बुक्क्याचा मार,” सहन करत आहेत.या दोघांना सत्तेशिवाय श्वास घेता येत नाही.भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून ते नाराज आहेत,पण दिल्लीतील नेत्यासमोर आपले काही चालणार नाही,हे माहीत असल्यामुळे त्यांनी स्वस्थ बसणे,यामध्येच आपले हित असल्याचे ओळखले आहे.एकनाथ शिंदे यांचे उठसुठ गावी जाण्यामुळे त्यांची पक्षावरील पकड ढिली झाली आहे.त्यांचे अनेक मंत्री व आमदार गेल्या काही महिन्यांपासून स्वैर वागण्यात धन्यता मानत आहेत.
त्यांच्या पक्षाचे संजय शिरसाठ,संजय गायकवाड,संजय राठोड,संदीपन भुमरे,भरत गोगावले,ही नररत्ने पक्षाची प्रतिमा मलिन करण्यात कोणतीच कसर शिल्लक ठेवत नाहीत.परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या नररत्नांचे आर्थिक घोटाळे व उचापतीविषयी चौकशी समित्या नेमण्याचा धडाका लावल्यामुळे शिंदे सावध झाले.त्यांनी आपल्या सर्व आमदारांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या कानपिचक्या दिल्या.यावेळी त्यांनी उपस्थित सर्व आमदाराना भावनिक आवाहन केले. आपल्याला मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन देऊनही आपल्या तोंडाला दिल्लीश्वरानी पाने पुसली,त्यामुळे शिंदे देखील नाराज आहेत.पण ईडीच्या भितीमुळे त्यांना सारे काही सहन करावे लागत आहे.आजच्या घडीला भाजपकडे १३७ आमदार आहेत,त्यांना स्वबळावर सरकार बनवायला केवळ ८ आमदाराची गरज आहे.भाजप आपली ही गरज शिंदे व अजित पवार गटाचे १० ते १५ आमदार केव्हाही फोडून सहज भागवू शकतात,याची शिंदे व पवार या नेत्यांना माहीत आहे.त्यामुळे शिंदे व पवार हे दोघेही सध्या सारे काही मुकाट्याने सहन करत आहेत.अजित पवार गटाला सोबत घेणे,हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांना कधीच मान्य नव्हते.या गटामुळे आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत चालली आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.या दोन्ही गटांनी जर भविष्यात ताणून धरले तर भाजप या दोन्ही गटात ” लोटस ऑपरेशन,” करण्यासही मागे पुढे बघणार नाही.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या आड येणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे अनेक प्रकल्प रद्द केले आहेत.तर दुसरीकडे शिंदेंची झालेली अवस्था पाहून अजित पवार देखील मर्यादेच्या चौकटीत राहून काम करत असतात.

