दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज यांचे वक्तव्य ; शिवसेना व मनसेमध्ये संभ्रमाचे वातावरण,
उद्धव व राज हे ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर शिवसेना व मनसे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्र येऊन लढवतील,असे अंदाज व्यक्त झाले होते.पण काल राज ठाकरे यांनी युतीविषयी संभ्रम निर्माण होईल,असे वक्तव्य केल्यामुळे चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.जाहीर सभा पार पडल्यानंतर त्यांनी मनसेच्या पदाधिकारी व सैनिकांनी युतीबाबत बाहेर चर्चा करू नये,असे आदेश दिले होते.त्यानंतर काल त्यांनी ती जाहीर सभा केवळ मराठी मुद्द्यासाठी होती.युतीसंदर्भात नोव्हे.डिसें.नंतर निर्णय घेऊ असे स्पष्ट केले आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुवया वर गेल्या आहेत.यापूर्वीही राज ठाकरे यांनी आपली भूमिका वारंवार बदलल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मनात काहीतरी वेगळे चालले आहे,अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेपासून ( उबाठा ) वेगळे झाल्यानंतर राज ठाकरे यांनी गेल्या १७ वर्षात आपली राजकीय भूमिका वारंवार बदलली.कधी मोदींच्या कारभारावर सडकून टीका,तर कधी मोदी यांच्या वायब्रन्ट गुजरातचे तोंडभरून कौतुक,त्यानंतर त्यांच्या विकसित गुजरातवर पुन्हा खरपूस टीका,लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेणे,हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर केंद्र व राज्यसरकारवर शरसंधान,त्यानंतर आता त्यांनी युती संदर्भात नोव्हेंबर किंवा डिसेंबर नंतर पाहू,असे म्हंटले आहे.तत्पूर्वी त्यांनी याविषयी कोणीही बाहेर चर्चा करू नका,असा आदेश आपल्या सैनिकांना दिला होता.त्यांच्या या अशा वागण्याकडे राजकीय क्षेत्रात कायम संशयाने पाहण्यात येत असते.यापूर्वी त्यांच्या बांधकाम व्यवसायातील गैरप्रकारासंदर्भात सक्तवसुली संचलनालयाने त्यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांची तोंडभरून स्तुती
करण्यास सुरुवात केली होती.केवळ स्तुती करून ते थांबले नाही,तर मोदी यांचे वायब्रन्ट गुजरात पाहण्यासाठी थेट अहमदाबाद गाठले होते.वारंवार बदलणाऱ्या भूमिकेमुळे त्यांच्या सभेला होणाऱ्या प्रचंड गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होत नाही.त्याचे फळ त्यांना नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळाले.मुंबई शहरात माहीम विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपले चिरंजीव अमित ठाकरे यांना उभे केले होते.पण अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला.त्यावेळी शिंदे गटाचे उमेदवार सदानंद सरमळकर हे माघार घ्यायला तयार होते.पण त्यांचा अहंकार आडवा आला.त्यांनी सरमळकर यांना भेट नाकारली.त्यामुळे शिवसेनेच्या ( उबाठा ) उमेदवाराला येथे झालेल्या तिरंगी लढतीमध्ये मतविभागणीचा फायदा होऊन विजयश्री गळ्यात पडली.आपल्या होमग्राउंडवर झालेला आपल्या मुलाचा पराभव,त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला.ज्या शिवतीर्थावर त्यांच्या प्रचंड सभा होत असतात,तेथे त्यांचा पराभव होतो,याचा अर्थ कसा काढायचा ? राजकारणात स्थिर व राजकीय परिस्थितीचे भान ठेवून वागावे लागते.सतत भूमिका बदलणे,हे त्रासदायक ठरत असते.आताही त्यांनी अचानक वेगळी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या सभेला गर्दी करणाऱ्या त्यांचे समर्थक व सैनिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

