दीपक मोहिते,
” समाधानाची बाब,”
विधानसभा सभागृहात वसई व नालासोपारा दिसू लागले,लोकांमध्ये समाधानाचे वातावरण,
हल्ली विधानसभा सभागृहात वसई व नालासोपारा मतदारसंघाचे आ.स्नेहा दुबे व राजन नाईक सतत आपल्या मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न,समस्या व लोकांच्या अडचणीबाबत प्रश्न मांडत असतात,ही एक समाधानाची बाब तर आहेच,पण लोकामध्येही चांगले संकेत जात आहेत.गेल्या सहा महिन्यात त्यांनी अधिवेशनात या दोन्ही मतदारसंघाच्या प्रश्नाकडे सरकारचे वारंवार लक्ष वेधले.सरकारही त्यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत असल्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील विकासकामांना वेग येण्याची शक्यता आहे.
आजवर विधानसभा सभागृहात या दोन्ही मतदारसंघाचे प्रश्न व समस्या कधीही हिरिरीने मांडले गेले नव्हते.त्यामुळे सरकारने देखील या भागाच्या विकासाकडे आजवर कधीच लक्ष दिले नाही.त्यामुळे मंत्रालयापासून अवघ्या ४० कि.मी.अंतरावर असलेला हा तालुका विकासाच्या बाबतीत कायम उपेक्षित राहिला.माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी काही वर्षांपूर्वी या उपप्रदेशाचा भविष्यातील ” तिसरी मुंबई,” असा उल्लेख केला होता,ती ” तिसरी मुंबई,” या भागातील नागरिकांना कधीच पाहायला मिळाली नाही.आजही पाणीटंचाई,लोडशेडिंग,
शाळा,हॉस्पिटल्स,वाहतूक कोंडी,रेल्वेच्या असुविधा,महानगरपालिकेतील भ्रष्टाचार,ठेकेदाराकडून होणारी लूट,अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, बिल्डरांकडून गोरगरिबांची होणारी फसवणूक,सरकारी व आरक्षित जमिनिवरील
अतिक्रमणे इ.समस्यांमुळे करदाते हवालदिल झाले आहेत.पुरेसे पाणी उपलब्ध नसतानाही भरमसाठ बांधकाम परवानग्या
देण्यात आल्यामुळे गेल्या काही वर्षात या उपप्रदेशात समस्यांचा डोंगर उभा राहीला.महानगरपालिका आल्यानंतर येथील
नागरिकांचे जीवन सुसह्य होईल,असा अंदाज होता,पण प्रत्यक्षात उलटेच घडत गेले.नागरिकांना जगणं कठीण होऊन बसले,त्यांचे जीवन सुसह्य होण्याऐवजी असह्य बनले.लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्ती अभावी प्रशासकीय यंत्रणा मुर्दाड बनली.कोणाचा पायपोस, कोणाच्या पायात राहिला नाही.यामध्ये सर्वसामान्य करदाता अक्षरशः पिचला गेला.गेल्या पाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी महानगरपालिका साफ धुवून पुसून खाल्ली.पूर्वी नगरसेवक,मनपा अधिकारी व ठेकेदार हे त्रिकुट ” आपण तिघे भाऊ भाऊ,एकत्र मिळून खाऊ,” या न्यायाने महानगरपालिकेची तिजोरी लुटत होते.प्रशासकीय राजवटीत अधिकारी व ठेकेदारांनी हीच निती वापरत लुटालूट केली.त्यांची ही लुटालूट मोगलानाही लाजवणारी अशीच होती.या सर्व गैरप्रकाराकडे सरकारही कानाडोळा करत होती.त्यामुळे जनतेला मरणप्राय यातना सहन कराव्या लागत होत्या. नव्याने आमदार झालेल्या स्नेहा दुबे आणि राजन नाईक यांनी गेल्या सहा महिन्यात तालुक्याचे अनेक प्रश्न व समस्या विधानसभेच्या पटलावर मांडल्या व त्याचा ते पाठपुरावा करत आहेत,सदर बाब नक्कीच समाधानाची आहे.येणाऱ्या काळात या उपप्रदेशाला चांगले दिवस येतील,असे समजायला हरकत नाही.त्यांच्या या कामामुळे लोकांमध्ये चांगले संकेत जात असून त्यांच्या पक्षाला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत नक्कीच फायदा होऊ शकतो.

