दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
प्रदीर्घ काळानंतर जरांगे पाटील पुन्हा रणांगणात,पण डाळ शिजेल का ?
गेले वर्षभर निवांत असलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत.” सरकारने मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर त्यांना सळो की पळो करून सोडतो,” अशी सिंहगर्जना त्यांनी केली आहे.२९ ऑगस्टच्या आत आरक्षण द्या,अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि त्यास सरकार जबाबदार राहील,असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे.यापूर्वीही जरांगे पाटलांनी अनेकदा सरकारला असे निर्वाणीचे इशारे दिले होते.पण सरकारच्या दूताकडून वारंवार समोर आलेले सरबताचे ग्लास तोंडाला लावण्यात जरांगे पाटील दंग राहिल्यामुळे दोन दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्याची सरकारने फारशी दखल घेतलेली नाही.
मराठा आरक्षण प्रश्नी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायम दूर राहिले तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी आपले दूत पाठवून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली.त्यामुळे जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत आपले उपोषण अनेकदा मागे घेतले.या सर्व घडामोडीमध्ये देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून सूत्रे हलवत होते.त्यांनी जरांगे पाटील यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी नियोजनबद्ध आखणी केली होती व त्यामध्ये १०० % यशस्वी झाले.आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी आहेत,त्यामुळे जरांगे पाटील यांना ते सहजासहजी यशस्वी होऊ देणार नाहीत.फडणवीस हे राज्यातील ओबीसी समाजाला कदापि दुखावणार नाही,कारण हा समाज कायम भाजपचा पाठीराखा राहीला आहे.ओबीसी असलेल्या कुणबी,आगरी,धनगर व इतर समाजाला दुखावणे भाजपला परवडणारे नाही.एकेकाळी हे सारे समाज भाजपपासून दूर होते.तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे व स्व.प्रमोद महाजन या दोघांनी या ओबीसी समाजातील तीनही घटकांना भाजपच्या प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक काम केले.त्यांच्या या सोशल इंजिनीरिंगमुळे भाजपला सत्तेची कवाडे उघडली गेली.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला सहजासहजी आरक्षण मिळू देणार नाहीत.दुर्देवाने मराठा समाजाचे खासदार,आमदार व अन्य लोकप्रतिनिधी देखील जरांगे पाटलांच्या आंदोलनाला साथ देत नाहीत.कारण ओबीसी समाज आपल्यावर नाराज होईल व निवडणुकीत त्याचा फटका आपल्याला बसेल,अशी त्यांना भिती वाटते व ती भिती रास्तच आहे.
दरम्यान गेले वर्षभर जरांगे पाटील हे निवांत होते,त्यांनी या काळात मराठा समाजाच्या आरक्षणावर कोणतेही भाष्य केले नाही.त्यामुळे मराठा आरक्षण विषय गुंडाळला गेला की काय ? असा संशय व्यक्त करण्यात येत होता.पण आता जरांगे पाटलांनी आरक्षण प्रश्नाला पुन्हा उचलून धरले आहे.यापूर्वी त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला ग्रामीण भागात प्रचंड पाठिंबा मिळाला,पण तसा तो शहरी भागात मिळू शकला नाही.आज मराठा समाजाच्या अनेक संघटना राज्यात सक्रिय आहेत.पण त्यांचे संसार वेगवेगळे आहेत.अनेक संघटना सरकारशी संधान बांधून आहेत.जरांगे पाटलांचे आंदोलन सुरू असताना मराठा समाजाच्या अनेक नेत्यांना विविध विभागाची कंत्राटे मिळाली,त्यामुळे या नेत्यानी जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली.तर जरांगे पाटलांच्या जाहीर सभा आयोजित करण्यासाठी अनेकांनी भरमसाठ निधी गोळा केला,पण तो जरांगे यांच्या समन्वय समितीकडे दिला गेला नाही.जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले,पण लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही.अशा परिस्थितीत. जरांगे पाटील पुन्हा रणांगणात उतरत आहेत.पण महायुतीचे सरकार,त्यांची डाळ शिजू देणार नाही,हेही तितकेच खरे आहे.

