दीपक मोहिते,
राज्याची विनाशाकडे वाटचाल,
बहिणी लाडक्या झाल्या,आता सरकार भावोजीना” बेवडे,” करण्याच्या तयारीत…
वर्षभरापूर्वी राज्य सरकारने आपल्या लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागावा,यासाठी ” लाडकी बहीण,” योजना आणली.या बहिणीच्या माध्यमातून महायुतीने विधानसभा निवडणुका जिंकल्या.आता मात्र त्याच सरकारने,आपल्या भावोजीना ” बेवडे,” बनवण्यासाठी नवीन मद्य धोरण अमलात आणले आहे.महिलांच्या मतासाठी सरकारने आपल्या तिजोरीतील पैसा अक्षरशः लुटला.त्यामुळे आज राज्याच्या डोक्यावर १० लाख कोटींचे कर्ज आहे.आज ना उद्या या कर्जाचे व्याज देणे,देखील सरकारला शक्य होणार नाही.आपले राज्य आर्थिक व उद्योग क्षेत्रात क्रमांक १ वर असल्याचा ढोल सतत वाजत असतो.पण प्रत्यक्षात आपले राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.
राज्य सरकारचे अनेक विभागाकडे आजच्या घडीला निधीची कमतरता असल्यामुळे राज्यातील विकासकामे ठप्प झाली आहेत.अनेक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दोन ते तीन महिने रखडत आहे,ठेकेदारांची कोट्यवधी रु.देयके थकली आहेत,त्यामुळे ठेकेदारांनी कामे करणे बंद केले आहे.लाडक्या बहिणींना देखील आता दरमहा मिळणारे १५००/ रु.आता रखडू लागले आहे.त्यांना हप्ते देताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे.ही योजना बंद झाली तर आपली अब्रू वेशीवर टांगली जाईल,अशा भितीमुळे सरकारने आपल्या भावोजीना आता ” बेवडे,” बनवण्याचे धोरण आखले आहे.त्यासाठी सरकारने सत्तरच्या दशकापासून बंद असलेले दारूचे परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारच्या नवीन मद्य धोरणामुळे आता किरकोळ मालाच्या दुकानामध्ये दारू उपलब्ध होणार आहे.महसूलवाढीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला असला तरी तो राज्यातील कोट्यवधी कुटुंबांना विनाशाकडे नेणारा आहे.सध्याचे सरकार मतांच्या लाचारीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे यावरून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील महिला आपले नवरे दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत असल्यामुळे ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव करत असतात,मोर्चे काढून दारू विक्री करणाऱ्या दुकानांना टाळी ठोकत आहेत,तर दुसरीकडे हे सरकार आपल्या लाडक्या बहिणीचे संसार उजाडू पाहत आहेत.अर्थमंत्री अजित पवार व खा.सुनील तटकरे या दोघांचा पूर्व इतिहास पाहता ते राज्याचा की त्यांचा स्वतःचा महसूल वाढवणार आहेत,याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने विशेष करून लाडक्या बहिणींनी करायला हवा.अन्यथा तुमच्या सारख्या कोट्यवधी महिलांचे संसार रस्त्यावर येणार आहेत.सरकारच्या या मद्यधोरणाला विरोध करण्यासाठी या लाडक्या बहिणींनी कंबरेला पदर खोचून रस्त्यावर उतरून सरकारचे डोके ताळ्यावर आणले पाहिजे.आपल्या पोराबाळांचे भवितव्य अंधारात ढकलणाऱ्या या सरकारला आता या लाडक्या बहिणींने आपले रणरागिणीचे रूप दाखवायची वेळ आली आहे.

