दीपक मोहिते,
अनधिकृत बांधकामाचा हव्यास,
वसई,विरार परिसर दरवर्षी जलमय का होतो ? आम्ही वसईकरांनी जगायचं तरी कसं ?
वसई,विरार,नालासोपार्याचा भाग एकेकाळी हरितपट्टा म्हणून ओळखला जात होता. या भागातील ताज्या भाज्या, फळे,फुले याची शेती / बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबईची बाजारपेठ जवळचहोती. मुंबईपासून अवघ्या पन्नास कि.मी.अंतरावर असलेल्या वसई-विरारच्या हरितपट्ट्याला पर्यावरणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व होते. समुद्र,खाड्या,नारळी पोफळीच्या बागा,शेती, बागायती,पानवेली,वसईची केळी,फुले व भाज्या,ही या भागाची खासियत होती. तथापि,गेल्या तीन दशकांत या हरित पट्ट्यात अनिर्बंध बांधकामे उभी राहिली.चाळी, इमारतींची नवनवी निवासी संकुले आकार घेऊ लागली. त्यात समुद्र किनारे,खाड्या, खारफुटीची जंगले,मिठागरे व गावेच्या गावे नष्ट झाली.या हरितपट्ट्यात सिमेंट कॉंक्रिटची जंगले उभी राहिली. एकेकाळी शांत,सुंदर,अशी ओळख असलेल्या निसर्गरम्य प्रदेशाची अवघ्या काही वर्षात राखरांगोळी झाली.
९० च्या दशकात उपप्रदेशात अस्ताव्यस्त झोपडपट्ट्या पसरू लागल्या.दलदलीच्या जमिनीवर कच्च्या पायावर इमारती उभ्या राहू लागल्या. उल्हासनगर,डोंबिवली, कल्याणमधील तकलादू बांधकामांप्रमाणेच या उपप्रदेशातही प्रचंड संख्येने नागरी संकुले उभी राहिली.लोकवस्ती वाढत गेल्याने रस्ते,वीज,आरोग्य, पाणी,शिक्षण यासारख्या पायाभूत सोयीसुविधा कमी पडू लागल्या.लोकवस्तीचा रेटा प्रचंड प्रमाणात वाढला,त्याच्या तुलनेत जलनि:सारण, मलनि:सारणाची व्यवस्थाच निर्माण झाली नाही.खाड्या आकुंचित होत गेल्या.नदी,नाल्यांची गटारे झाली.जल,वायु प्रदूषण कमालीचे वाढले.पायाभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे नागरिकांवर किड्यामुंग्यांप्रमाणे जगण्याची वेळ आली.स्वस्तात घरे मिळताहेत,म्हणून मुंबईतील रहिवाशांनी आपला मोर्चा वसई,विरार,नालासोपारा, पालघरकडे वळवला.गेल्या काही वर्षांत या हरित पट्ट्यात अनिर्बंध अनधिकृत बांधकामे उभी राहिली. खाड्या बुजवल्या.खारफुटीची जंगले नष्ट केली.परिणामी, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचे सारे नैसर्गिक मार्ग गायब झाले.त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात सलग तीन दिवस पाऊस पडला की या भागात हाहाकार उडतो. सखल भागातील व्यापाऱ्यांची दुकाने,चाळी,इमारतीमध्ये पुराचे पाणी शिरते.घरादारात पाणी शिरत असल्यामुळे कित्येकांच्या संसाराची धुळदाण होत असते.घरातील अन्नधान्य, किमती फर्निचर शिरलेल्या पाण्यात नष्ट होत असते.रहिवाशांना अंगावरील कपड्यानिशी घराबाहेर पडण्याची वेळ येते.या अशा अस्मानी संकटात राजकीय नेते,स्थानिक प्रशासन थातूर मातुर मदत करत असते.या काळात पिडीत नागरिकांना दूध,ब्रेड,अन्नधान्य,औषधे देखील मिळू शकत नाहीत.नागरी संकुलाच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये दूषित पाणी जात असल्यामुळे या काळात लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागते.या महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा ही केवळ कागदावरच पाहायला मिळते. गेली तीस वर्षे हे दुष्टचक्र असेच सुरु आहे.या महानगरपालिकेत केवळ ” ओरबाडणे,” हा एकमेव कार्यक्रम राबवण्यात येत आहे.या पालिकेच्या प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे.येथे सक्रिय असलेल्या अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या टोळीमध्ये नगरसेवक,मनपा अधिकारी,ठेकेदार,यांचा समावेश आहे.हरितपट्टा नष्ट झाल्यामुळेच या भागातील नागरिकांवर दरवर्षी असे नैसर्गिक संकट कोसळत असते.लोकवस्तीचा वाढता ताण लक्षात घेऊन या भागात पावसाळी पाणी निचरा होणारे मार्ग,जलनि:सारण,मलनि:सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.तसेच,या पट्ट्यातील पावसाळी पाण्याचा वेगाने निचरा कसा होईल, याविषयीची कारणे जाणून घेऊन खबरदारीच्या उपाययोजना करायला हव्यात. वसई-विरार उपप्रदेशाला दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीच्या पाण्यात ढकलण्याचे काम चौफेर झालेल्या अनधिकृत बांधकामांनी केले आहे.या माफियांना जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे काहीही सोयरसुतक नाही. वसई-विरारमधील अनिर्बंध बांधकामामुळेच शहरी भागाचे नियोजन पार कोलमडून पडले आहे.वसई विरारचा हरितपट्टा नष्ट करण्यास कॉंक्रिटची जंगले जबाबदार असून त्याची कटू फळे आता वसई-विरारवासीयांना भोगावी लागत आहेत.पर्यावरणाचा र्हास मानवाला कसा रसातळाला घेऊन जातो,याचे वसई-विरार हे उत्तम उदाहरण आहे.

