दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
एकनाथ शिंदे अडचणीत ; त्यांच्या गटाचे अनेक मंत्री व आमदारांचे पाय खोलात…
महायुती सरकारमधील संजय शिरसाट,संजय गायकवाड, संजय राठोड व भरत गोगावले,या चार सहकाऱ्यामुळे शिंदे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत.शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाठ व संजय राठोड हे दोन मंत्री आर्थिक गैरव्यवहार,तर आ.संजय गायकवाड हे गुंडगिरी व भरत गोगावले मंत्रिपदावर असताना रस्त्यावर उतरून आंदोलन करणे व टायर जाळणे,असे प्रकार करत असल्यामुळे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री फडणवीस शिंदे यांच्यावर नाराज झाले आहेत.त्यांनी शिंदे गटाच्या संजय राठोड यांना अलीकडेच दणका दिला आहे.मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांच्या मालिकांमुळे धनंजय मुंडे यांच्यानंतर मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा कोणाचा क्रमांक लागणार याची कुजबूज आता आमदारांमध्येच सुरू झाली आहे.
शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्यावर गेले काही दिवस सातत्याने आरोप होत आहेत. एमआयएमचे माजी खा. इम्तियाज जलिल यांनी शिरसाट यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवून दिली आहे.त्यांची व त्यांच्या कुटुंबाची अनेक प्रकरणे जलील यांनी वेशीवर टांगली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीसाठी हॉटेल लिलावाची किंमत कमी करण्यात आल्याचा आरोप झाला होता.त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यवहाराच्या चौकशीचा आदेश दिला.त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाल्याबद्दल दोनच दिवसांपूर्वी प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचे स्वत: शिरसाट यांनीच मान्य केले आहे.
शिवसेना खा.संजय राऊत यांनी शिरसाट यांची दोन दिवसापूर्वी चित्रफीतच व्हायरल केली.त्यात शिरसाट स्वतःच्या घरात बनियन व चड्डीवर बसले असताना त्यांच्या बाजूला असलेल्या बॅगेत नोटांची बंडले दिसत आहेत.शिरसाट यांच्यावर होणारे आरोप,त्यांच्या विरोधात सारी कागदपत्रे विरोधकांच्या हाती लागणे,मुख्यमंत्र्यांनी दिलेला चौकशीचा आदेश यातूनच शिरसाट यांच्या मागे कोण लागले आहे,याची सर्वत्र चर्चा होत आहे.शिरसाठ यांच्या कारनाम्याची गोपनीय कागदपत्रे विरोधकांना कुठून मिळतात,हे वेगळं सांगायला नको.आजच्या घडीला जे काही घडत आहे,ते पाहता शिरसाठ यांचा लवकरच धनंजय मुंडे व एकनाथ खडसे होण्याची शक्यता आहे.
जलसंधारणमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात महायुतीचेच आमदार अधिवेशनात खाजगीत अत्यंत वाईट शब्दात बोलत असतात. जलसंधारण खात्यातील बदल्या यंदा चांगल्याच गाजत आहेत.या जलसंधारण खात्यातील कामांना देण्यात आलेली सुधारित प्रशासकीय मान्यताच मुख्यमंत्र्यांनी रद्द केली त्यामुळे राठोड यांना चांगलाच दणका बसला.कारण सुधारित मान्यतेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यावहार झाल्याचे आरोप महायुतीचे आमदारच करत आहेत.मुख्यमंत्र्यांचे नागपूरमधील विश्वासू आमदार संदीप जोशी यांनीच राठोड यांच्या खात्यातील गैरव्यवहार आणि बदल्यांमधील गोंधळ यावरून अनेक आरोप केले आहेत.
संजय शिरसाट आणि संजय राठोड,या दोन ” संजय,” मुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. शिंदे स्वपक्षीयांना कोणालाही दुखावत नाहीत.पक्षप्रमुख म्हणून त्यांचा वचकही दिसत नाही.त्यामुळे मंत्री व आमदारांचे चांगलेच फावले आहे.
भरत गोगावले हे मंत्री आपल्याला रायगडचे पालकमंत्रिपद मिळत नसल्याच्या कारणामुळे आपल्याच सरकारविरोधात कायम उचापती करत असतात.राष्ट्रवादी अजित पवार गटाने गोगावले यांच्या विरोधात मोहिमच हाती घेतली आहे.गोगावले यांचे वादग्रस्त छायाचित्र राष्ट्रवादीने अलीकडेच प्रसिद्धीस दिले होते.परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना मीरा-भाईंदरमधील मराठी मोर्चाच्या वेळी परिस्थिती योग्यपणे हाताळता आली नाही,असे शिंदे गटाच्या नेत्यांचेच मत झाले आहे. आ.संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील उपहारगृहात केलेल्या मारहाणीमुळे पक्षाची प्रतिमा अधिक डागळली गेली,असे त्यांचे म्हणणे आहे.
एकूणच सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाचे मंत्री व आमदार वादात सापडले आहेत.शिरसाट यांच्यावर तर दररोज आरोप होत आहेत.राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यावर असेच आरोप झाले होते.शेवटी प्रकरण तापताच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांवर अशीच पाळी येण्याची शक्यता आहे.त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यानंतर राजीनामा देणारा मंत्री कोण याचीच चर्चा सध्या विधान भवनात होत आहे.या सर्व घडामोडीमुळे एकनाथ शिंदे सध्या खूप त्रासलेले पाहायला मिळत आहेत.अशा परिस्थितीत शिंदे यांनी आपल्याला पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे,यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.त्यासाठी तडकाफडकी दिल्ली गाठली व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपला संपूर्ण पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची तयारी दर्शवली,पण अमित शहा यांनी त्यांच्या या प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही.या सर्व घडमोडीची कुणकुण फडणवीस यांना लागल्यानंतर त्यांनी शिंदे गटाचे मंत्री व आमदारांची भ्रष्ट प्रकरणे चव्हाट्यावर वाणण्याचे सत्र आरंभले.भाजपकडे आजच्या घडीला १३७ आमदाराचे संख्याबळ आहे,त्यांना स्वबळावर सरकार बनवण्यासाठी केवळ आठ ते दहा आमदारांची गरज आहे,ती गरज ते शिंदे व अजित पवार गटाचे आमदार फोडून भागवू शकतात. त्यामुळे शिंदे गटाला ते एकामागोमाग दणके देत सुटले आहेत.

