दीपक मोहिते,
” गंडांतर,”
पंतप्रधान मोदी विरुद्ध सरसंघचालक मोहन भागवत ; ट्वेन्टी – ट्वेंटीची मॅच सुरू…
नागपूर येथे ९ जुलै रोजी झालेल्या संघाचे ज्येष्ठ नेते मोरोपंत पिंगळे यांच्या पुस्तक प्रकाशन प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पिंगळे यांची आठवण काढताना ते म्हणाले,” मी जेव्हा उभा राहतो,तेंव्हा लोक माझ्यावर हसायचे,तेंव्हा मला वाटायचं की लोक मला आता गांभीर्याने घेत नाहीत.तुम्ही शाल दिली,पण मला त्याचा अर्थ माहीत आहे.जेंव्हा वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी खांद्यावर शाल पडते,याचा अर्थ आपण आता म्हातारे झालो आहोत आणि आता आपण बाजूला झाले पाहिजे,याची जाणीव होते.त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा अहमदाबाद येथे झालेल्या ” सहकार संवाद,” या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, ” निवृत्तीनंतर मी माझे आयुष्य वेद,उपनिषद व नैसर्गिक शेतीसाठी वाहून घेणार आहे,”असे उदगार काढले.या दोन्ही नेत्यांच्या उदगाराचे राजकीय क्षेत्रात सध्या जोरदार पडसाद उमटत आहेत.कारण,पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १७ सप्टेंबर रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पंधरा वर्षात अनेकांना वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्यावरून सक्रिय राजकारणापासून बाजूला ठेवले,त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी,मुरली मनोहर जोशी,गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल,लोकसभेच्या माजी सभापती नजमा हेपतूल्ला,राजेंद्र अग्रवाल,संतोष गंगवार,यशवंत सिन्हा,अरुण शौरी,लालजी टंडन,हुकूमदेव नारायण यादव,सत्यदेव दुबे व उत्तर प्रदेशच्या रिटा बहुगुणा यांचा समावेश होता.परंतु काही नेत्यांना मात्र या वयाच्या अटीतून वगळण्यात आले होते.त्यानंतरच्या काळात मोदी हे संघापासून दुरावले गेले आहेत.तसेच मोदी यांच्या कारभाराविषयी संघात प्रचंड नाराजी आहे.त्यामुळे सरसंघचालकांच्या या वक्तव्याला अत्यंत महत्व आले आहे.मात्र भाजपच्या संविधानात वयासंदर्भात कोणतीही तरतूद नाही,त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मोदी हे २०२९ पर्यंत पंतप्रधान पदावर राहतील,असा सूर लावला आहे.मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी देखील मोदी,हे नेहरु यांचा विक्रम मोडीत काढतील,असा निर्वाळा देत सुटले आहेत.पण दुसरीकडे संघाचे मार्गदर्शक मंडळ मात्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधानपदी बसवण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व रा.स्व.संघ,असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.या संघर्षात मोदी यांच्यामागे उद्योगपतींची लॉबी ठामपणे उभी राहील,अशी चर्चा सुरु झाली आहे.कारण देशात या उद्योगपतींचे विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत तर काही अर्धवट स्थितीत आहेत,त्यामुळे मोदी यांना रिटायर करणे,या लॉबीला परवडणारे नाही.मोदी हे साम,दाम,दंड,भेद,अशी निती वापरून प्रकल्पाला होणारा विरोध मोडून काढतात. त्यामुळे त्यांना बाजूला सारणे, उद्योग जगताला परवडणारे नाही. दुसरीकडे संघ ज्या नितीन गडकरी यांना पुढे करत आहेत,ते गडकरी चौकटीत राहून काम करणारे राजकारणी असल्यामुळे उद्योगपतीना ते परवडणारे नाहीत.

