दिपक मोहिते,
” निवडणूक रणसंग्राम,”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार…
राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्यात घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त माध्यमाच्या हाती आले आहे.राज्यातील ६७६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या पाच वर्षांपासून रखडल्या आहेत.गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या निवडणूका घेण्यासंदर्भात आयोगाला निर्देश दिल्यानंतर निवडणूक आयोगाची यंत्रणा सक्रिय झाली आहे.या निवडणुका सर्वसाधारणपणे ऑक्टो.ते डिसें.दरम्यात होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडणुकीसाठी आयोगाला ६ लाख ५० हजार ईव्हीएम मशिन्सची आवश्यकता आहे.पण त्या मशीन्स सध्या उपलब्ध नसल्यामुळे आयोग या निवडणुका तीन टप्यात घेण्याचा विचार करत आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या निवडणुकीसाठी १ जुलै पर्यंतचीच मतदारयादी वापरण्याचे निर्देश दिल्यामुळे या निवडणुका तीन टप्यात तसेच लवकरात लवकर होतील,असे संकेत मिळत आहेत.या निवडणुकीच्या प्राथमिक तयारी संदर्भात जिल्हाधिकारी व राज्य निवडणूक आयोग यांच्यामध्ये नुकतीच महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत या निवडणुका ऑक्टो.ते डिसें.दरम्यान घेण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे समजते.तसेच सप्टें.महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.ही प्रक्रिया एकूण ९ टप्यात पूर्ण करण्यात येणार आहे.त्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टें.दरम्यान मुंबईसह अ,ब,क,दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडी लक्षात घेता राजकीय पक्षांचीही लगबग सुरू झाली आहे.भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) मुंबई,ठाणे,कल्याण/ डोंबिवली,उल्हासनगर, कुळगाव/बदलापूर,वसई/ विरार,या पालघर व ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या महानगरपालिका स्वतःकडे खेचून घेण्याच्या तयारीत आहेत.त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण,पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक,विवेक पंडित,उपमुख्यमंत्री/ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,खा.डॉ.श्रीकांत शिंदे,आ.संजय केळकर सक्रिय झाले आहेत.राज्य निवडणूक आयोग अधिवेशन संपल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल,असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

