दीपक मोहिते,
“हल्लाबोल,”
भाग क्र.२,( अंतिम )
जनसुरक्षा विधेयक २०२५ ; मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना गुंडाळले,
काल कोणताही गोंधळ न होता,जनसुरक्षा विधेयक २०२५ बहुमताने संमत झाले.मार्क्स.कम्यु.पक्षाचे कॉ.विनोद निकोले या एकमेव आमदाराने या विधेयकाला सभागृहात विरोध केला.विरोधी पक्षाचे सर्व आमदारांनी या विधेयकाला मूक संमती दिली.त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे शब्दांचा धूर्त खेळ करत विरोधकांना आपल्यासमोर लोटांगण घालायला लावले.
या विधेयकातील अनेक तरतुदी,या लोकशाहीला मारक असून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली सरकारला अमर्याद अधिकार मिळणार आहेत.”अर्बन नक्षलवाद,” वाढत असल्याची भिती दाखवत सरकारने हे विधेयक आणले आहे.”अर्बन नक्षलवाद रोखणे,” हा एकमेव उद्देश असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असले तरी या विधेयकात या दोन्ही शब्दाचा साधा उल्लेख नाही.त्यामुळे विधेयकाच्या विश्वासार्हतेविषयी शंका उपस्थित होत आहे.या विधेयकामध्ये ” व्यक्ती आणि संघटना,या दोन शब्दाचा उल्लेख आहे.पण त्यांची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही.सरकारला जर नक्षलवादाचा बिमोड करायचा असेल तर त्यांनी नक्षलवादी संघटनांचा तसा स्पष्ट उल्लेख करायला हवा होता.या विधेयकामुळे सरकारच्या विरोधात आंदोलन किंवा नाराजी व्यक्त करणाऱ्यांना बेकायदा ठरवून अटक करण्याचे अधिकार आता सरकारला मिळणार आहेत.हे अत्यंत धोकादायक असून ” मागच्या दाराने सरकार आणीबाणी आणू पाहत आहे.” केंद्र सरकारने अन्य राज्यातही अशी विधेयके संमत करून घेतली आहेत.वास्तविक सरकारने ” अर्बन नक्षलवाद ” दोन शब्दाचीही व्याख्या करण्याची गरज होती.गेल्या सहा वर्षात सरकारने अनेक सामाजिक कार्यकर्ते,साहित्यिक,लेखक व पत्रकारांना सुरक्षिततेच्या नावाखाली गजाआड केले.पण न्यायालयाने त्यांची सुटका केली.पण त्या लोकांना पाच ते सहा वर्षे कारावास भोगावा लागला.
आपल्या राज्यात अदानी व अन्य उद्योग समूहाचे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत, ( धारावी पुनर्बांधणी,डहाणू – वाढवण येथील महाकाय प्रकल्प व बुलेट ट्रेन,मुंबई – वडोदरा जलदगती मार्ग,फ्रेट डेडिकेटेड व अन्य ) त्यास स्थानिक भूमिपुत्र व सामाजिक संघटनांनी विरोध करू नये, यासाठी सरकारने हे विधेयक आणले आहे.या विधेयकातील त्रुटी दूर करण्यासाठी सरकारने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभागृहातील सदस्यांची संयुक्त समिती नेमली होती.त्यामध्ये रावसाहेब दानवे,जितेंद्र आव्हाड,जयंत पाटील,भास्कर जाधव व विरोधी पक्षाचे अन्य सदस्य होते.पण त्यांनी समितीच्या पाच बैठकीत काय केले,हे स्पष्ट होत नाही व कालही त्यांनी या
विधेयकामधील त्रुटीवर चकार शब्द काढला नाही.त्यांचे हे मौन संशयास्पद असेच होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी मात्र आपल्या भाषणात या सर्व त्रुटीकडे सभागृहाचे लक्ष वेधले.सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयक एकमताने संमत झाले,असे जाहीर केले,पण मार्क्स.कम्यु.पक्षाचे आ.निकोले यांनी उभे राहून या विधेयकाला माझा विरोध असल्याचे सांगितले.त्यामुळे नार्वेकर यांनी हे विधेयक ” बहुमताने,” संमत झाले, असे जाहीर.या सर्व घडामोडीवरून एक बाब स्पष्ट झाली की एरवी सरकारवर तुटून पडणारे विरोधक आज ” तेरी भी चूप,मेरी भी चूप,” अशा भूमिकेत कसे काय पाहायला मिळाले ? देवेंद्र फडणवीस यांनी काय कमाल की विरोधी पक्षाचे सारे आमदार त्यांच्या गळाला लागले ? या प्रश्नाचे उत्तर तुम्हा – आम्हाला कधीच मिळणार नाही.
( अंतिम )

