दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
इंडिया व महाविकास आघाडी लवकरच सरणावर जाणार…
महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे.शिवसेनेचे ( उबाठा ) मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी याविषयी नुकतेच संकेत दिले आहेत.तसेच राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीमध्येही बिघाडी झाली आहे.आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या चुली वेगवेगळ्या मांडल्या आहेत.
गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रोखण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व खा.सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन सुमारे २७ पक्षांची ” इंडिया आघाडी,” या
नावाने मोट बांधली होती.या आघाडीचे निमंत्रक म्हणून खर्गे यांची नियुक्ती झाली.पण या पदासाठी ममता बॅनर्जी उत्सुक होत्या,पण माळ मात्र खर्गे यांच्या गळ्यात पडली.तेंव्हापासून ममता बॅनर्जींनी स्वतःला या आघाडीपासून दूर राखले होते.तर दुसरीकडे पंजाब राज्यात झालेल्या विधानसभेच्या दोन पोटनिवडणुकीत केजरीवाल यांनी दोन्ही जागा लढवल्या व जिंकल्याही,त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला हात चोळत बसावे लागले.सध्या काँग्रेस,तृणमूल काँग्रेस व आम आदमी पार्टी,या तिघांमधून विस्तव जात नाही.अशीच परिस्थिती महाराष्ट्रात देखील पाहायला मिळते.विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला दारुण पराभव व लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला काँग्रेसच्या तुलनेत कमी जागा जिंकता मिळाल्या.त्यामुळे उद्धव ठाकरे तेंव्हापासून परतीचा विचार करू लागले.उद्भव ठाकरे आता मराठी भाषा व हिंदुत्व,अशा दोन मुद्द्यांवर महानगरपालिका निवडणूका लढवण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत.काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे सावरकर यांच्यावर टीकास्त्र सोडणे तसेच
प.महाराष्ट्रातील एका जागेवरून झालेल्या मतभेदांमुळे उद्धव ठाकरे महाआघाडी विकासपासून दुरावले होते.त्यातच आता मनसे सोबत त्यांची युती होत असल्यामुळे काँग्रेस देखील त्यांच्यावर नाराज आहे.उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित राहिला नाही.या सर्व घडामोडीवरून महाविकास आघाडीमध्ये लवकरच बिघाडी होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.खा.संजय राऊत यांनी स्थानिक पातळीवरील निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढवणार नाही,असे आम्ही पूर्वीच सांगितले होते,असे जाहीर करून पहिला बॉम्ब टाकला आहे.त्यामुळे महाविकास आघाडीची तिसरी घंटा वाजलीच आहे तर इंडिया आघाडी देखील आता सरणावर पोहोचण्याच्या तयारीत आहे.

