दीपक मोहिते,
” निवडणूक रणसंग्राम,”
काँग्रेसनेही महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली…
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने संकेत दिल्यानंतर राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे.काल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोकण प्रभारी यु.बी. व्यंकटेश यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.यावेळी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसच्या या बैठकीला कार्यकर्त्यांचा प्रथमच चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यानी या पूर्वीच पक्षबांधणीकडे लक्ष द्यायला हवे होते,ते न दिल्यामुळे वसई काँग्रेस गेली तीन दशके अंधारात चाचपडत राहिली.बबनशेठ नाईक,जॉन आल्मेडा व अन्य काँग्रेसजन हितेंद्र ठाकूर सोबत गेले.त्यामुळे काँग्रेस पक्षाची पार वाताहत झाली.अनेक वर्षे वसई तालुक्यात पक्षाला खंबीर असे नेतृत्व मिळाले नव्हते.दरम्यानच्या काळात मायकल फुर्ट्याडो,अशोक पेंढारी व मीरा – भाईंदरचे मुझफ्फर हुसेन यांनी पक्षाची धुरा सांभाळली पण दुर्देवाने मायकल फुर्ट्याडो व अशोक पेंढारी यांचे अकाली निधन झाले.त्यामुळे पक्ष पुन्हा विस्कळीत झाला.दहा ते पंधरा वर्षात पक्षात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता.अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाने या तालुक्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.कालांतराने बविआचे नेते विजय पाटील यांचे ठाकुरांशी तीव्र मतभेद झाले व त्यांनी बविआला राम राम ठोकला,ते काँग्रेसमध्ये स्थिरावले.पण त्याकाळी आघाडी सरकारला हितेंद्र ठाकूर यांनी पाठिंबा दिला होता.त्या पाठिंब्याच्या बदल्यात काँग्रेस वसई विधानसभेची जागा काँग्रेस,कायम ठाकुरांसाठी सोडत असायची.त्यामुळे आपल्याला या पक्षात संधी मिळू शकणार नाही,हे लक्षात घेऊन विजय पाटील हे शिवसेनेत दाखल झाले,पण तेथेही ते रमू शकले नाहीत.अखेर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.आज विजय पाटील हे पक्षात बऱ्यापैकी स्थिरावले आहेत.गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत त्यांनी लक्षणीय मते मिळवली,त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.दरम्यानच्या काळात पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी आपल्या वेगवेगळ्या चुली मांडत संसार केला.ओनील आल्मेडा,डॉमणिक डिमेलो,समीर वर्तक व अन्य काही नेत्यांनी अशा पद्धतीने आपापले संसार सुरू केले होते.त्यामुळे पक्ष दिवसेंदिवस क्षीण होत गेला.एकेकाळी जिल्ह्यात ( पूर्वाश्रमीचा ठाणे जिल्हा ) वर्तक घराण्याच्या कर्तबगारीमुळे ठाणे जिल्ह्याची ओळख ही ” काँग्रेसचा बालेकिल्ला,” अशी होती.त्या बालेकिल्ल्याला १९९० च्या दशकात उतरती कळा लागली ती आजतागायत सुरूच आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय पाटील यांना वसई विधानसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात आले.त्यांनी ही निवडणूक समर्थपणे लढवली,येथे झालेल्या तिरंगी लढतीत भाजपच्या स्नेहा दुबे,या अवघ्या अडीच हजार मतांनी निवडून आल्या.विजय पाटील यांनी सत्तर हजाराहुन अधिक मते घेतली.त्यामुळे हितेंद्र ठाकूर याना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.सहा वेळा आमदारकी पटकवणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांना प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले.तर नालासोपारा विधानसभा मतदारसंघात त्यावेळी प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या नाना पटोले यांनी अपरिचित असलेल्या उत्तर भारतीय व्यक्तीला उमेदवारी दिली आणि त्याचा दारुण तसेच लाजिरवाणा पराभव झाला व पक्षाचे सर्वत्र हसे झाले.पण आता प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी सूत्रे हाती घेताच वसई काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे.परवा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.नव्या नेतृत्वाने महानगरपालिका निवडणुकीत स्वच्छ व चारित्र्यवान तरुणांना उमेदवारी दिली तर आठ ते दहा जागा ते जिंकू शकतील.शिवसेना ( उबाठा ),मनसे यांच्या आघाडीशी युती केल्यास काँग्रेस या निवडणुकीत उत्तम म्हणता येणार नाही,पण सरस कामगिरी करू शकते.

