दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्यात गुन्हेगारीचा वेलू गगनावर…
राज्यात गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत असून आता लोकप्रतिनिधी देखील गुंडासारखे वागू लागले आहेत.” आमचं कोणी वाकडं करू शकत नाहीत,” असा एकप्रकारचा माज त्यांना व त्यांच्या मुलांना आला आहे.काल आ.संजय गायकवाड यांनी कँटीन कामगारांना जबर मारहाण केली.तर आ.सुरेश धस यांच्या मुलाने एका तरुणाला आपल्या गाडीखाली चिरडले.काही दिवसापूर्वी महसूलमंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांच्या मुलानेही आपल्या कारने एकाला उडवले होते.वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे आपले राज्य उद्योग क्षेत्रात नव्हे तर गुंडगिरीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचले आहे.
वारंवार होणाऱ्या अशाप्रकारच्या घटना ” आमचं कोण वाकडे करू शकतो,” अशा अहंकारातून घडत असतात.या अशा घटनांमध्ये आरोपींना जामिन देखील अवघ्या आठ ते दहा तासात मिळत असतात.आ.सुरेश धस यांच्या मुलाची अवघ्या सहा ते सात तासात जामिनावर सुटका झाली.यावरून आपली पोलीस यंत्रणा किती राजकीय दबावाखाली काम करते,हे स्पष्ट झाले आहे.वास्तविक राज्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वस्वी जबाबदार आहेत.त्यांचे आपल्या गृह खात्यावर बिलकुल नियंत्रण नाही,ते प्रशासकीय कामाऐवजी विरोधी पक्षाचे आमदार फोडण्याच्या ऐतिहासिक कामात व्यस्त आहेत.अशा घटना घडल्या की फडणवीस वृत्तवाहिन्यांवर येउन चौकशी समिती किंवा एसआयटी नेमण्याचे ऐतिहासिक काम करत असतात.या चौकशीचे अहवाल कधीच सार्वजनिक होत नाहीत.लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी व पब्लिक क्राय शांत करण्यासाठी केलेली ती एक खेळी असते.त्यामुळे आज आपल्या राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनली आहे.पूर्वी बिहार व उत्तर प्रदेश ही दोन राज्ये पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असायची,आता आपल्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.याला आपण प्रगती म्हणायचे की अधोगती ?
काल कँटीन कामगाराला मारहाण करणारे संजय गायकवाड हा गुंड प्रवृत्तीचा आमदार असून मिरवणुकीतील तरुणाला व शेतकऱ्याला मारहाण, राहुल गांधी विषयी केलेले जहाल वक्तव्य,शेतकरी महिलेची जमीन हडप करणे,संभाजी राजे यांच्याविषयी जाहीररित्या केलेले चुकीचे वक्तव्य,हे सारे लक्षात घेता संजय गायकवाड यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा करणे,म्हणजे खडकावर डोके आपटून घेण्यासारखे आहे.काल झालेल्या मारहाण प्रकरणात संजय गायकवाड यांचा आवेश हा ” मेरा बाल भी बाका नही होगा,” या पठडीतला होता. मुख्यमंत्री फडणवीस यावर प्रतिक्रिया देताना काय म्हणाले ते पहा..ते म्हणाले ” आमदारांनी अशाप्रकारे मारहाण करणे,योग्य नाही,असे आमदारांनी करता कामा नये.त्यांच्यावर कारवाईसंदर्भात मी विधानसभा अध्यक्षाना सांगितले आहे.अध्यक्ष योग्य ती कारवाई करतील.”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी चेंडू विधानसभा अध्यक्षाच्या कोर्टात टोलवला असून स्वतःला या प्रकरणापासून नामानिराळे ठेवले आहे.वास्तविक फडणवीस यांनी एकनाथ शिंदे याना गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यायला हवे होते.तसेच या प्रकरणी सरकारने ( पोलीस यंत्रणा ) स्वतःहून गायकवाड यांच्या विरोधात एफआयआर दाखल करणे,आवश्यक होते.पण या प्रकरणात असे काहीही झाले नाही.ज्या पद्धतीने गायकवाड यांनी कँटीन व्यवस्थापकाला अमानुष मारहाण केली ती पाहता राज्यात आता कायदा व सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडाला आहे,असे म्हंटल्यास ते वावगे ठरू नये.

