दीपक मोहिते,
पळा,पळा,कोण पुढे पळे तो…
राजकारणात आता नीतिमत्ता,तत्व विचारधारा व स्वाभिमान,यांस काडीचीही किंमत उरली नाही.सत्ता प्राप्त करण्यासाठी ” काय पन,” ही नवीन संस्कृती उदयाला आली आहे.भाजपने तर ” कंबरेचे सोडून डोक्याला बांधले, ” आहे.यापूर्वी काँग्रेसने देखील हेच केले होते.त्यांच्या काळातच आयाराम – गयाराम संस्कृतीला खतपाणी घालण्यास सुरुवात झाली होती.आता फक्त बाजू बदलली गेली आहे.त्या काळात भाजप ” आम्ही इतरापेक्षा वेगळे,” ( party with difference,) अशी पोपटपंची करत असत,आज त्याच भाजपने मळकटलेली अंतर्वस्त्रे धुण्यासाठी भलेमोठे वॉशिंग मशीन आणले आहे. त्याकाळी काँग्रेसजनांना सत्तेशिवाय श्वास घेववत नव्हता,आज तशीच स्थिती भाजपची झाली आहे.पक्षांतर कायदा भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी मोडीत काढला आहे.दर दिवशी इकडून तिकडे उड्या मारण्याचा खेळ जोरात सुरू आहे.
भाजपने २०१४ च्या निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ” काँग्रेस मुक्त भारत,”
निर्माण करण्याची घोषणा केली होती.या घोषणेनंतर काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या गळाला लागले.अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहून सत्तापदे भोगल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपची शाल आपल्या अंगावर पांघरण्यास सुरुवात केली.आजही काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) चे अनेक नेते कुंपणावर बसून आहेत.बाहेरून येणाऱ्यांच्या वाढत्या गर्दीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.कारण सध्याचे नेतृत्व प्रामाणिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या आयाराम गयारामांना सत्तेच्या राजकारणात सामावून घेत आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे माधव भंडारी होय.वर्षानुवर्षे स्वतःला पक्ष उभारणीमध्ये झोकून देणारे माधव भंडारी सध्या भाजपमध्ये उपेक्षित जीवन जगत आहेत.अनेक जण नाराज असतानाही भाजपच्या नेत्यांनी आपले प्रवेशद्वार बंद ठेवले नाही.आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले रे वाजले की,भाजपचे हे प्रवेशद्वार सताड उघडे ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर काँग्रेस व शिवसेनेचे माजी नगरसेवक यांच्यामध्ये ” पळा,पळा,कोण पुढे पळे तो,” अशा मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होईल,या पळापळीत कदाचित चेंगराचेंगरी होण्याचीही दाट शक्यता आहे.
प्रत्येक राज्यातून विरोधी पक्षांना हद्दपार करण्याचे जे स्वप्न मोदी व शहा या जोडगोळीने पाहिले आहे,ते प्रत्यक्षात उतरवण्याकामी खोक्यासाठी आसूसलेले विरोधी पक्षातील नेते व माजी नगरसेवक आता मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.या सर्व घडामोडीवरून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे राजकारणात नितीमत्ता,तत्व,विचारधारा व स्वाभिमान यांस आता काडीची किमत उरलेली नाही. लोकशाही व्यवस्थेला मारक असलेली ही प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे.त्याचे विपरीत परिणाम भविष्यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

